विद्या डेंगळे
‘‘अहो, तुम्हाला आमचा कॅस्पर दिसला का कुठे?’’ रश्मीनं विचारलं.
‘‘हो, आताच घोगरे काकांबरोबर मी त्याला मारुतीच्या देवळाच्या दिशेनं जाताना पाहिला.’’ भावे काका म्हणाले.
‘‘हल्ली सारखं ऐकायला मिळतंय कॅस्पर देवळात जातो आणि घरी यायला तयार नसतो म्हणून. ऐकावं ते नवीनच!’’ रश्मी म्हणाली.
‘‘खायला मिळत असणार तिथे.’’ ते म्हणाले.
‘‘त्याला आवडतं ते देवळात कसं मिळेल?’’ रश्मी हसत म्हणाली.
‘‘तेही खरं आहे!’’ असं म्हणत ते निघून गेले.
बऱ्याच वेळानं घोगरेकाका आणि कॅस्पर घरी परतले. घोगरेकाका आणि कॅस्परचं कपाळ बुक्का, गुलाल आणि शेंदूरनं भरलं होतं. ते पाहून रश्मीनं कपाळाला हात लावला तर काका म्हणाले, ‘‘ताई तुमच्यासाठीपण आणणार होतो बुक्का, गुलाल, पण विसरलो. उद्या नक्की आणीन.’’
‘‘नको नको, तुमच्यापुरताच ठीक आहे.’’ म्हणत रश्मी कॅस्परला घेऊन घरात गेली.
कॅस्पर देवदर्शन घेऊन आल्यामुळे थोडा वेगळाच वागत होता. नेहमीच्या त्याच्या आवडत्या जेवणाला तोंड लावत नव्हता. त्यामुळे रश्मी थोडी काळजीत पडली. पण तिची आई म्हणाली, ‘‘काही हरकत नाही एक दिवस जेवला नाही तर. अलीकडे त्याचा हवरटपणा वाढलाच आहे. लठ्ठ झालाय नुसता. इतकं देव देव करतोय तर करूदेत उपास.’’ असं म्हणून कॅस्परकडे दुर्लक्ष करून सगळे आपापल्या कामाला लागले.
रात्री जेवायला सगळे जमले तेव्हा मात्र कॅस्परचा वाडगा धुतल्यासारखा स्वच्छ होता. ते पाहून घरातल्या सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण त्यानंतर कॅस्पर रोज संध्याकाळी फिरून घरी उशिरा येऊ लागला. कपाळावर कधी शेंदूर तर कधी बुक्का असायचाच. घोगरेकाका आणि कॅस्पर दोघेही भक्तिरसात बुडाले होते. पण कॅस्पर लॅब्रेडोर कुत्रा होता, त्यामुळे उपासाचं नाटक एकच दिवस घडलं.
हेही वाचा >>> बालमैफल : नव्या म्हणींचं राज्य
‘‘आई, कॅस्पर घोगरेकाकांमुळे देवभक्त झाला आहे बरं का! काका त्याला देवळात नेतात आणि बाहेर बांधून ठेवून स्वत: आत जाऊन नमस्कार, गप्पा वगैरे करून घरी आणतात. मी त्यांना सांगणार आहे की कॅस्परला आजीआजोबांसारखं देवळात बसवून ठेवू नका. त्याला मैदानात नेऊन त्याच्याबरोबर बॉल टाकून खेळवा. जरा बारीक होईल तो.’’ रश्मी म्हणाली. आई आजीच होती त्यामुळे नुसती हसली.
असेच काही दिवस गेले. कॅस्परचं बुक्का-शेंदूर लावून येणं आता रोजचंच झालं होतं.
‘‘कॅस्पर प्रसाद मिळतो की नाही देवळात? खाऊनच येत असशील सगळा!’’ रश्मीनं त्याला विचारलं.
एके दिवशी गंमतच झाली. कॅस्पर डोक्याला बुक्का- शेंदूर फासून आणि गळ्यात झेंडूच्या फुलांचा हार घालूनच आला. गल्लीतली सगळी मुलं त्याच्या भोवती फेर धरून टाळ्या वाजवून नाचू लागली. मज्जाच मजा आली. हळूहळू मोठी माणसंही जमू लागली. कामवाल्या बाया डोक्यावरून पदर घेऊन चक्क कॅस्परच्या पाया पडू लागल्या. हे नवीन नाटक पाहून कॅस्पर खूपच घाबरला. इतका घाबरला की त्यानं गळ्यातल्या हाराचे तुकडे केले. मुलांनी धरलेल्या रिंगणातून बाहेर पडून तो पळत रस्त्यावरच्या गर्दीत मिसळून गेला.
रश्मी गाडी काढून त्याला शोधायला गेली. आसपास बरीच देवळं होती. कुठल्या देवळात जायचं या संभ्रमात रश्मी गाडीतून फिरत राहिली. पण त्या दिशी कॅस्पर काही सापडला नाही. ‘‘अगं रश्मी, कुत्रा आहे तो, नक्की वास घेत रस्त्यानं परत येईल बघ. नको काळजी करूस.’’ सगळे तिची समजूत काढत होते.
रात्र तशीच काळजीत गेली. सकाळी रश्मीनं गल्लीतल्या काही जबाबदार मुलांना बरोबर घेतलं आणि गाडी काढून ती कॅस्परला शोधायला गेली. अनेक देवळांत चौकशी केली, पण तिथले लोक म्हणाले, ‘‘अहो देवळाबाहेर खूप कुत्री पहुडलेली असतात. तुमचा कुत्रा आला होता का नाही ते आम्हाला कसं कळणार!’’
हेही वाचा >>> बालमैफल: प्रॉजेक्टचा फज्जा
एव्हढय़ात रश्मीला कोणीतरी म्हणालं, ‘‘तो दत्त मंदिरात असेल बघा. तिथे गायी, कुत्रे घोटाळत असतात.’’ रश्मी ताबडतोब दत्त मंदिरात पोचली. तिथले पुजारी म्हणाले, ‘‘एक कुत्रा गाभाऱ्यात यायचा प्रयत्न करत होता मगाशी, पण त्याला आम्ही नाही आत येऊ दिलं.’’
तोपर्यंत रश्मीचे डोळे पाण्याने भरले. मुलं रश्मीला म्हणाली, ‘‘रश्मीताई, आपण मारुतीच्या देवळात जाऊन बघुयात. तिथे नसला तर मात्र पोलिसात तक्रार नोंदवू आणि पेपरमध्ये ‘हरवला’ सदरात फोटो देऊ. सर्व फौज लगेचच मारुतीच्या देवळाकडे रवाना झाली. तिथे देवळाच्या बाहेर रस्त्यावर खूप गर्दी दिसली. शनिवार तर नव्हता, मग एवढी गर्दी कशी? कॅस्परला काही झालं नसेल ना? रश्मीला चिंता वाटली. धडधडत्या अंतकरणानं ती आणि मुलं गर्दी सारत आत गेली आणि अवाक् झाली. मारुतीच्या देवळाबाहेर कॅस्पर पुढचे पाय जोडून नमस्कार पोज घेऊन बसला होता. त्याच्या मागे चार कुत्रेही त्याच पोजमध्ये बसले होते. गर्दीतले लोक अचंब्याने पाहात होते.
‘‘याला म्हणतात भक्ती! कमाल आहे बुवा! काहीतरी आगळंवेगळं नाही का!’’ लोक कुजबुजू लागले. अचानकच कॅस्परचं लक्ष भक्तिभावातून उडालं. त्याला रश्मीचा वास आला आणि तो तिच्या दिशेने धावत जाऊन तिच्या अंगावर उडय़ा मारत तिला चाटू लागला. लोकांचे मोबाइल व्हिडीओ घ्यायला सरसावलेच होते. तेवढय़ात रश्मीचा मोबाइल वाजला. आईचा फोन होता.
‘‘कॅस्पर सापडला का? तात्काळ घरी आण त्याला. शेजारी चोरी झाली आहे. पोलीस आले आहेत. ते म्हणताहेत की तुमचा कुत्रा लॅब्रेडोर आहे तर मदत होईल त्याची चोर पकडायला. तो वास घेऊन चोर शोधेल.’’
‘‘ काय माहीत मदत होईल का नाही ते! कॅस्पर सध्या वेगळ्याच मूडमध्ये आहे.’’ रश्मी कपाळाला हात लावत मनात म्हणाली.
हेही वाचा >>> बालमैफल : अति परिचयात अवज्ञा!
सगळे घरी पोचले आणि कॅस्परने गाडीतून पटकन् उडी मारली. जमिनीला नाक लावत वास घेत घेत तो स्वत:च्या घरी न जाता शेजारच्यांच्याच घरात घुसला. सोन्याच्या बांगडीचा वास घ्यायला लावून घोगरेकाकांनी त्याला ‘गो फाइंड’ अशी ऑर्डर दिली. कॅस्पर सबंध घरभर वास घेत सुटला. आणि काय आश्चर्य! पलंगावर चढून उशीखालून त्यानं सोन्याची बांगडी शोधून दिली. सगळेच आश्चर्यचकित झाले. कॅस्परचा भाव वाढला.
गल्लीतली मुलं ‘‘कॅस्पर हीऽऽऽरो, कॅस्पर हीऽऽऽरो’’ असं म्हणत नाचू लागली.
‘‘जा बाबा रोज देवळात जा, असं उत्तम काम घडणार असेल तुझ्या हातून तर रोज जा.’’ रश्मीची आई कॅस्परला जवळ घेत म्हणाली.
रश्मीचं मन कॅस्परच्या हुशारीनं भरून आलं. ती त्याला एक टपली देत म्हणाली, ‘‘अजिबात रोज देवळात जाऊन बसायचं नाही. त्यापेक्षा चटपटीत राहून कामं कर. Bravo कॅस्पर!
vidyadengle@gmail.com