माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमाच्या रसभरीत कहाण्या आपण खूपदा ऐकतो. मग त्याला पुराण वा ऐतिहासिक असा कुठलाच काळ अपवाद नसतो. अनेकदा त्या माणसामाणसांतील प्रेमापेक्षाही हृद्य असतात. या कहाण्या माणूस आणि प्राण्यांच्या नात्यांमधील भावबंध अलवारपणे उलगडणाऱ्या असतात. यातील काही कहाण्यांत तर ‘माणसांपेक्षा प्राण्याची साथसंगत बरी’ असंच म्हणायला लावणाऱ्या असतात. त्यातही कुत्र्याच्या प्रामाणिकपणाची गोष्टच वेगळी. प्राण्यांच्या प्रामाणिकपणाविषयी बोलताना कवयित्री बहिणाबाईही म्हणतात-
मतलबासाठी
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठी
कुत्रा शेपूट हालये.
विद्या डेंगळे यांची ‘करामती गुगी’, ‘गुगी पुराण’ ही पुस्तके त्यांच्या गुगी कुत्र्याच्या प्रेमाने भारलेली पुस्तके आहेत. लेखिकेने सांगितलेल्या गुगीच्या सुरस कथा आणि रेश्मा बर्वे आणि दयाळ पाटकर यांची आकर्षक चित्रे वाचनाचा आनंद द्विगुणित करतात. ‘करामती गुगी’ या पुस्तकात सुरुवातीलाच प्रदर्शनातल्या जर्मन शेफर्ड असलेल्या गुगीची गंमत वाचायला मिळते. त्याच्या जोडीला रॅंबो, टिना आणि लिओ या त्याच्या दोस्त मंडळींच्या करामती वाचताना हसू येतं. ध्यानस्थ गुगी तर बहार आणतो. क्रिकेट मॅच बघना घरातलं वातावरण शब्दांकित करताना गुगीला करावी लागलेली कसरत वाचून वाचक हरखून जातो. तसंच ‘अतिरेकी’, ‘शर्यत’ या गोष्टी वाचताना गंमत वाटते.
‘गुगी पुराण’ म्हणजे गुणीच्या सुरस कथाच. आणि या कथा गुगीच सांगतोय. गुगीचं घरात झालेलं आगमन, त्याचा वाढदिवस, त्याचं ट्रेनिंग.. गुगीची पार्टी, गुगीचं गाणं म्हणणं, त्याची डिटेक्टिव्हगिरी, परिसरातील कुत्र्यांची मिळून काढलेली सहल अशा अनेक गोष्टींमध्ये गुगी आणि त्याचं मित्रमंडळ बहार उडवून देतं. या गोष्टी वाचताना लहानग्यांना तर मजा येईलच, पण मोठी मंडळीही त्यांचा आस्वाद घेतील आणि गुगी व त्याच्या मित्रमंडळींच्या प्रेमात पडतील यात शंका नाही.
खूप लाघवी, प्रेमळ आणि घरातल्या मंडळींना भरभरून प्रेम देणारा, त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणाऱ्या गुगीच्या गोष्टी वाचकालाही आपलंसं करतात आणि नकळत त्यात गुंतायला भाग पाडतात. बघता बघता हा गुगी आपल्याशीच संवाद साधतोय आणि तो आपल्याच घरातला एक सदस्य असल्यासारखं वाचकाला वाटतं. कुत्र्यांचं वेगळं विश्व या कथांमधून उलगडतं.
‘करामती गुगी’, ‘गुगी पुराण’- विद्या डेंगळे, अनुक्रमे- ऊर्जा प्रकाशन, उत्कर्ष प्रकाशन, पाने- अनुक्रमे- ४४, ७१, किंमत- अनुक्रमे- ४५, ६०