मनूचे आणि तिचे फोन मात्र चालत. त्यावरून ती मनूची चौकशी व त्याला सूचना करत असे. हे सगळं आठवलं तसा तो अंथरुणातून झटकन उठला. पाय बेडजवळ पडलेल्या चेंडूवर पडून मनू पडणारच होता. त्याने रागाने चेंडूवर लाथ मारून तो उडवून दिला. इतक्यात आईचा फोन आला. तिने काही महत्त्वाच्या सूचना केल्या. आजोबांच्या तब्येतीत भरपूर सुधारणा होत आहे हे सांगितलं आणि जबाबदारीने वागण्याविषयी पुन्हा पुन्हा बजावून फोन ठेवला. तसाच चालत चालत मनू हॉलमध्ये आला, तर हॉलभर त्याचे मेकॅनोचे पिसेस्, दारातच उडवलेले शूज आणि सॉक्स, टीव्हीसमोर चक्क सायकल, त्यावर कपडय़ांचे आणि टॉवेलचे बोळे, कोचवर अस्ताव्यस्त पडलेल्या अनेक वस्तू, विशेष म्हणजे त्या सगळ्या मनूच्याच. त्यात रंग, कागद, विखुरलेलं कंपासपेटीतलं सामान इ. इ. त्याने हॉलमध्ये एक नजर टाकली, तर एक जागा अशी नव्हती की, जिथे मनूची एखादी वस्तू नव्हती. कॉम्प्युटरवर तर त्याचा टी-शर्ट लोंबत होता.
हे सारं पाहून तो जरासा हादरलाच. तस्साच किचनमध्ये गेला, तर तिथे फक्त ओटा आणि गरजेपुरतं टेबल आईने आवरून ठेवलं होतं. आणि खाणंपिणं व्यवस्थित मांडून ती गेली होती, पण बाकी उल्हासच होता. म्हणजे टेबलवर गोष्टींची पुस्तकं, जमिनीवर फुटबॉल, इकडेतिकडे पडलेले खडूचे रंग, त्यात काल मनूने खेळायला घेतलेली रितूची खेळणी, काल अधेमधे खाण्यासाठी वापरलेल्या वाटय़ा, चमचे, डिश.. हे सगळं मनूच्या डोळ्यांसमोर गरगरू लागलं. त्याला जाणवलं की, हा सगळा पसारा आपणच केलेला आहे. म्हणून त्याने घरात इतरत्रही नजर टाकली, तर एकही ठिकाण असं सापडलं नाही की तिथे मनूची कोणती ना कोणती वस्तू पडलेली नाही. एवढं सगळं रोज आई आवरते असं लक्षात येऊन त्याला गलबलंच. त्याचबरोबर मनूला आजोबांचीही आठवण झाली. ते नेहमी सांगायचे, मनू, सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात म्हणजे घरही नीटनेटकं राहतं आणि पाहिजे तेव्हा त्या वस्तू लगेचच मिळतात, पण मनू ते कानाआडच करायचा. आईही त्याबद्दल रागवायची तेव्हाही तो दुर्लक्षच करायचा. आईचा पारा फार चढला की, वातावरण निवळण्यासाठी आजोबा म्हणायचे, ‘‘अगं, तो ते सारं जागच्या जागी न ठेवता फक्त जिथल्या तिथे ठेवतो, जाऊ दे ना.’’ आणि आपणच खो खो हसायचे, पण आज मनूच्या जागच्या जागी आणि जिथल्या तिथे यातला फरक व्यवस्थित लक्षात आला होता. त्यावरून त्याने काही निश्चय केला आणि तोंड धुऊन, दूध पिऊन कामाला लागला. घरातल्या सगळ्या वस्तू त्याने जागच्या जागी लावल्या होत्या. हे आवरत आलं असतानाच जवळजवळ बारा वाजता आईचा फोन आला. आजोबांना घरी सोडलं होतं म्हणे. ते ऐकून मनूला खूप आनंद झाला आणि तो फोनवर ओरडलाच, ‘‘आजोबांना सांग बरं का, पटकन घरी या, कारण मनू आजपासून जागच्या जागी आहे, जिथल्या तिथे नाही.’’ काही न समजून आई पलीकडून काय? असं ओरडत होती आणि मनू खो खो हसत सुटला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा