मुलांच्या विश्वात चित्रकलेला वेगळं स्थान आहे. चित्रांमधून मुलांचं भावविश्व उलगडतं. मुलांच्या भावविश्वातील चित्रकलेचं स्थान लक्षात घेऊन ‘चित्रपतंग’ने श्रीनिवास आगवणे यांचं ‘आय हेट कलरिंग बुक’ हे अनोखं पुस्तक बाजारात आणलं आहे. हे पुस्तक सात वर्षांपुढील वयोगटातील मुलांसाठी आहे. हे पुस्तक हातात घेताक्षणी चित्रकलेतील अन्य पुस्तकांपेक्षा असलेलं वेगळेपण जाणवतं. विशेष म्हणजे चित्रकलेचे भारतातील हे पहिले द्वैभाषिक पुस्तक आहे.
बाजारात उपलब्ध असलेली ‘चित्रे रंगवा’ छापाच्या पुस्तकांमुळे मुलांना आहे ते चित्र कशा पद्धतीने रंगवावे, याचे जुजबी ज्ञान मिळते. तेथे त्यांच्या कल्पनाशक्तीला फारसा वाव नसतो. मुलं जेव्हा स्वत: चित्र काढायला लागतात तेव्हा त्या चित्रांमधून त्यांची कल्पनाशक्ती खऱ्या अर्थाने फुललेली दिसते. याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी हे पुस्तक पूरक ठरते.
या पुस्तकात अर्धवट चित्रे दिली आहेत. या अर्धवट चित्रांमधून मुलांनी उर्वरित चित्र पूर्ण करायचे आहे. या चित्रासोबत चित्र पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. उदा. तुटलेली अर्धवट मूर्ती तयार करा, जादूगाराच्या पेटाऱ्यातून काय निघाले? अशा प्रकारच्या सूचना अर्धवट चित्रांच्या खाली दिल्या आहेत. मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून ती पूर्ण करायची आहेत. एका पुस्तकात एकूण १५ चित्रे आहेत.
अशा प्रकारच्या पुस्तकांमुळे मुलांमध्ये दडलेल्या सर्जनशीलतेला उत्तम प्रकारे वाव मिळेल. ही चित्रे पूर्ण करण्यासाठी पालकांचीही सोबत आवश्यक आहे. या चित्रांमधून मुलाचं भावविश्व, चित्रकलेतील सफाई दिसून येईल, हे निश्चित. व्यवस्थित पूर्ण कलेलं चित्र  प्रकाशकाकडे पाठवून एक भेटही मिळवायची आहे.
या पुस्तकातून मुलांना व पालकांना जे मिळेल ते खरोखरंच अनोखं असेल, यात शंका नाही. मुलांमध्ये दडलेल्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी या पुस्तकाचा कल्पकतेने उपयोग करून घेता येईल.
– ‘आय हेट कलरिंग बुक’,
श्रीनिवास आगवणे,
चित्रपतंग प्रकाशन,
मूल्य : २०० रुपये.

Story img Loader