गजाभाऊ घरात येऊन जरा विसावतात तोच बन्या, टिन्या आणि बबली धावत धावत घरात शिरले आणि गजाभाऊंना त्यांनी गराडाच घातला.
‘‘काका, एक कोडं घालू?’’ टिन्या धापा टाकत म्हणाला.
‘‘नाही, मी.’’ बन्या त्याला मागं ढकलत म्हणाला.
‘‘अरे, अरे, जरा दम तरी खा आणि भांडताय काय कोडं घालण्यासाठी?’’ गजाभाऊंनी दोघांनाही आवरलं, ‘‘बोल टिन्या, काय कोडं घालायचंय मला?’’ गजाभाऊंनी टिन्याला प्राधान्य दिलं.
‘‘एका घरात किन दोन बाप आणि दोन मुलगे राहात असतात. आणि त्यांच्याकडे संध्याकाळी तीनच भाकऱ्या शिल्लक असतात. त्यांच्यापकी कोणालाही एकापेक्षा कमी भाकरी मोडून वगरे मिळालेली चालत नाही. तर ते तीन भाकऱ्या कशा खातील? सांगा काका.’’ बन्या-बबलीच्यात ‘सांगू नको बरं का!’ अशा चाललेल्या खुणा बघून गजाभाऊंना हसू आलं. हसू आणखी एका कारणासाठी आलं.. त्यांना कोडय़ाचं उत्तर माहीत होतं. पण मुलांना आनंद मिळावा यासाठी त्यांनीही नाटक केलं थोडंसं. उत्तराचा विचार करण्याचं आणि मग हार मानण्याचं.
‘‘अहो बाबा, ते चार जण थोडेच होते? तिघंच तर असतात ते..’’ बन्या उद्गारला.
‘‘ते कसं काय? टिन्या तर म्हणतो दोन बाप आणि दोन मुलगे म्हणजे झाले चार, मग तू तीन कसे म्हणतोस?’’ गजाभाऊंनी मुद्दामच विचारलं.
‘‘अहो काका, बन्या सांगतोय ते खरंच आहे. आजोबा, बाबा आणि नातू हेच ते तिघे. म्हणजे बघा हं, आजोबा आणि बाबा बाप-लेक तसेच बाबा आणि नातू हे बाप-लेक, झाले की नाही दोन बाप आणि दोन मुलगे!’’ टिन्यानं उत्साहात खुलासा केला आणि गजाभाऊ हसत हसत म्हणाले, ‘‘अरे लबाडांनो असं आहे होय.. मग तीन भाकरी तिघांना नक्कीच मिळणार अख्ख्या. ’’ मग सारेच गजाभाऊंच्या हास्यात सामील झाले.
‘‘या भाकऱ्या वाटून घेण्यावरून संपत्तीची वाटणी करू पाहाणाऱ्या एका वयस्कर जोडप्याची गोष्ट मला आठवलीय. सांगू का?’’ गजाभाऊंनी असं विचारायचा अवकाश, तिघेही गोष्ट ऐकायला समोर फतकल मारून बसले.
‘‘एका गावात राघू नावाचा धनाढय़ व्यापारी राहात होता. त्याची बायको मना आणि पाच मुलगे. चहाचा घाऊक व्यापार. आसाम, केरळसारख्या ठिकाणी चहाचे मळे. राहायला मोठी हवेली, घोडागाडय़ा, नोकर- चाकर अगदी छान सुखी कुटुंब. राघू-मनेचं आपल्या मुलांवर खूप प्रेम. पण शिक्षण, शिस्त याबाबतीत अगदी काटेकोर. स्वत: कामापुरतं शिक्षण झालेला राघू पसे वसुलीला मात्र वाघ होता. पाचही मुलं आई-वडिलांचा आदर करीत. मोठा मुलगा मोरू खूप हुशार. उद्योगाचा कारभार सांभाळून नफा-तोटा सांगायचा. वडिलांना त्याची खूपच मदत व्हायची. कारण वयोमानाप्रमाणे राघूला आता व्यवसायाकडे जास्त लक्ष देणं होत नव्हतं, पण राघू मोरूच्या प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवून असायचा. मनेलाही मोरूच्या व्यवहारज्ञानाचं कोण कौतुक.
हळूहळू लहान भावंडंही मोठी होऊन आपापल्या पायावर उभी राहिली. मोरूचं लग्न थाटामाटात झालं. त्याच्या भावांचीही लग्नं झाली किंवा ठरू लागली. आता राघू आणि मना यांना वाटू लागलं की आपण काय पिकली पानं, केव्हा गळून पडू काय नेम! आता हीच वेळ आहे आपल्या संपत्तीच्या वाटण्या करण्याची. मग त्यांनी आपले मळे, घरं, दागदागिने, गाडय़ा यांची यादीच केली आणि मोरूला कोणाला काय काय देणार ते लिहायला सांगितलं
सगळं वाटून झालं. आता त्यांचे बॅंकेतले पसेच वाटायचे राहिले होते. पंचवीस लाख रुपये. त्यांनी एके दिवशी आपल्या सगळ्या मुलांना नाश्ता करताना ही गोष्ट सांगितली आणि मोरूला म्हणाले, ‘‘हे पसे तुम्हा पाचजणांमध्ये समान वाटायचे आहेत बरं का.’’
सगळ्या मुलांनी आज्ञाधारकपणे मान डोलावली.
‘‘प्रत्येकाला चौदा लाख रुपये मिळतील.’’ पुन्हा सगळ्या मुलांनी मान डोलावली.. फक्त मोरू सोडून. त्याला धक्काच बसला ते ऐकून. पंचवीस लाख रुपये पाचजणांत समान वाटायचे आणि प्रत्येकाला चौदा लाख? काहीतरी गडबड होतेय हिशेबात. त्यानं आई-वडिलांना समजावून सांगितलं की ‘‘प्रत्येकाला फक्त पाच लाखच देता येतील. प्रत्येकाला चौदा लाख दिले तर ते सगळे मिळून सत्तर लाख होतात. पुन्हा करून बघा पंचवीस आणि पाचाचा भागाकार .’’
आता मात्र राघूला वाटू लागलं की मोरू जरा जास्तच शहाणपणा करतोय. त्यानं एक फळाच मागवला. आपला ब्लॅकबोर्ड रे शाळेत असतो तो.. आणि त्याच्यावर खडूनं त्यानं भागाकारच मांडला-
५)२५ (१४
पंचवीसला पाचनं भागताना त्यानं पहिल्यांदा मांडले ‘पाच एके पाच’.. म्हणून आला १.
ते पाच पंचवीसच्या पाचाखाली लिहून वजा केले पंचवीसातून. आता राहिले वीस.
पाच चोक वीस.. म्हणून मांडले ४ त्या आधीच्या १ पुढे. ‘झाले की नाही १४’ राघूनं मोरूकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. मोरूला हसावं की रडावं कळेना. आता तो खडू घेऊन फळ्यावर लिहू लागला.
१४ गुणिले ५.
पहिल्यांदा पाचनं गुणलं चाराला. पाच चोक वीस.. म्हणून विसातला शून्य बाजूला ठेवला. हातचे घेतले २. आता पाच एके पाच अधिक हातचे २ म्हणजे आले ७.. ते जोडले शून्याच्या आधी..‘बघा किती आलं उत्तर.. हे आलं सत्तर. एवढे द्यायला आहेत का तरी पसे.’ मोरू समजून देऊ लागला.
आता मनाबाई पुढे झाल्या मोरूला शिकवायला. तिनं काय केलं, फळ्यावर लिहिलं-
१४ गुणिले ५.
तिनं पहिल्यांदा पाचनं चाराला गुणलं. घ्या.. पाच चोक वीस.
मग पाचानं १४ मधल्या एकाला गुणलं. पाच एके पाच. ते मांडले वीसच्या आकडय़ाखाली आणि मारली बेरीज दोघांची.. घे, आले की नाही पंचवीस. म्हणून १४ गुणिले ५ पंचवीसच होतात रे बाळा. ‘मोरूचा ‘आ’ वासलेला राहिला.
आता राघूही उत्साहानं मनेची री ओढायला सरसावला.
त्यानं तर १४ हा आकडा पाच वेळा एकाखाली एक लिहूनच काढला.
मग त्यानं प्रत्येक आकडय़ातल्या चाराची बेरीज केली.. हे आले वीस.
..आता त्यात मिळवला प्रत्येकातला १ म्हणजे – २० अधिक एक २१ अधिक एक २२ अधिक एक २३ अधिक एक २४ अधिक एक २५ .. ‘आले की नाही पंचवीस !’ राघू आणि मना विजयी चेहऱ्यानं आपापल्या आसनावर विराजमान झाले.
आता मात्र मोरू चक्कर येऊन पडण्याच्याच बेतात होता. पण त्यानं स्वत:ला सावरलं आणि पंचवीस खडू मागवले.
त्यानं त्यातले १४ खडू धाकटय़ा भावाला दिले आणि राहिलेले ११ खडू स्वत:ला घेतले आणि आई-वडिलांना म्हणाला, ‘‘ आता द्या बाकीच्यांना चौदा-चौदा खडू कुठून देताय ते.. आणि माझेही राहिलेले ३ खडू पाहिजेत बरं का मला.’’ राघू आणि मना बसले एकमेकांच्या तोंडाकडे बघत.
इतकं सांगून गजाभाऊ मुलांच्या प्रतिक्रियांकडे पाहू लागले. पण त्यांनी आधीच कागद पेन्सिल घेऊन राघू आणि मनानं केलेल्या गणिताच्या कोलांटउडय़ा मांडून बघायला सुरुवातही केली होती. गजाभाऊ पाणी प्यायला थांबले होते. तेव्हढय़ात बन्या आणि टिन्या एकमेकांच्या हातावर टाळ्या देत राघू-मनेच्या अचाट भागाकार- गुणाकारावर धो धो हसत सुटले होते.
‘‘गजाभाऊंनी त्यांना थांबवत विचारलं, ‘‘आता तुम्ही सांगा बघू, पंचवीस लाखांतले पाच भावांपकी प्रत्येकाला जास्तीत जास्त किती पसे देता येतील ?’’
‘‘पाच लाखच.’’ बन्या आणि टिन्यानं एकदम बरोब्बर उत्तर दिलं.
हिशेबची भागमभाग
गजाभाऊ घरात येऊन जरा विसावतात तोच बन्या, टिन्या आणि बबली धावत धावत घरात शिरले आणि गजाभाऊंना त्यांनी गराडाच घातला. ‘‘काका, एक कोडं घालू?’’ टिन्या धापा टाकत म्हणाला. ‘‘नाही, मी.’’ बन्या त्याला मागं ढकलत म्हणाला.
आणखी वाचा
First published on: 09-09-2012 at 01:21 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids kids story kids stories