‘आज आपण.. ए, ऐक नं’ हे ज्यांचं पालुपद आहे त्यांच्याबाबत विचार करणार आहोत. जसं काहीजण बोलण्याची सुरुवात ‘आता बघा हं’ अशी करतात, तसेच काहीजण ‘आता ऐका हं’ अशी करतात. ‘ऐकतेस/ऐकतोस ना, ऐका हं’ वगरे म्हणायची सवय आहे का तुम्हाला? त्याचबरोबर इतर गोष्टींचाही विचार करायला हवाच, नाही का? सीरियल चालू असेल आणि सीरियलमधले संवाद अगर म्युझिक पीस तुमच्या जास्त चांगले लक्षात राहतात का? पाहा नं आठवून जरा. आणि असंही करा हं, बसमधून जाताना किंवा रांगेत उभं राहिल्यावर समोरच्या व्यक्तीशी बोलायला जास्त मजा येते का, याचाही विचार करा. नव्याने ओळख झालेल्या माणसाला तुम्ही चेहऱ्याने ओळखण्यापेक्षा नावाने ओळखता का लवकर? मोबाइलवरून पलीकडल्या व्यक्तीशी बोलत असताना ती जे काही बोलत असते त्यावर खूप बारकाईने लक्ष देत असता का? तुम्ही त्याचबरोबर एखाद्या ठिकाणचा पत्ता सांगताना खूप वर्णन करून सांगण्यात अगर पत्ता आठवताना कुणीतरी केलेलं वर्णन आठवण्यात तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटतं का ते आठवून पाहा जरा. वर्गात शिकताना तुम्हाला शिकवलेलं ऐकण्यात जास्त गंमत वाटते का? आणि अजूनही एक पाहा बरं, परीक्षेचा पेपर लिहिताना तुम्ही वर्गात झालेला एखादा विनोद आठवून गालातल्या गालात हसता का. किंवा त्या वेळी खाल्लेला ओरडा आठवून थोडेसे नाराज होता का.. असं सगळंच काही घडत नसेल, पण काय काय घडतं याची नोंद ठेवा आणि थोडं थांबा. कारण पंधरा दिवसांनी भेटायचं आहेच ना. तोवर बाय..
मेघना जोशी joshimeghana.23@gmail.com