अदिती देवधर
‘‘दादा, पुस्तकाला प्लॅस्टिक कव्हर घालायचं नाही हा विचार आहे, तसा ‘मुळातच पुस्तकाला कव्हर घालायचीच गरज आहे का’ असा प्रश्न आपण विचारला तर? नुसतं कव्हरच्या बाबतीत नाही, सगळीकडेच ‘याची खरंच गरज आहे का?’ हा प्रश्न म्हणजे खरा ‘लिव्हरेज पॉइंट’ आहे.’’ गणेश म्हणाला.
सगळे विचारात पडले. गणेश पुढे म्हणाला, ‘‘एक चॉकलेट मिळायचं, त्याच्याबरोबर खेळणं असायचं. छोटसं काही तरी- प्लॅस्टिकची भिंगरी, कुत्रा, पंखा वगैरे.
‘‘आमच्या शाळेत जायच्या रस्त्यावर आता ती खेळणी पडलेली दिसतात- मातीत, गवतात, झुडपात, ओढय़ात. मी आणि शैलेशनेसुद्धा हट्ट करून ती चॉकलेट्स आणली होती. आता आठवतसुद्धा नाही खेळणी कुठे गेली. रस्त्याच्या कडेची, ओढय़ातली खेळणी बघून मला वाटतं आमची खेळणीसुद्धा अशीच कुठे तरी पडली असतील.
‘‘दोन-तीन दिवस खेळलो त्यांच्याशी आणि काही हजार वर्षे ती पर्यावरणात राहतील. चॉकलेटची किंमतही नेहमीच्या चॉकलेटपेक्षा जास्त होती. आता वाटतंय, नक्की काय मिळालं? पैसे गेले, कचरा तयार झाला. त्यामुळे ‘याची मला खरंच गरज आहे का?’ हा प्रश्न विचारला पाहिजे, असं मला वाटतं.’’
‘‘वा!! गणेश, छान मुद्दा मांडलास.’’ सारंग म्हणाला.
‘‘बरोबर आहे गणेश!’’ नेहा म्हणाली, ‘‘मागच्या आठवडय़ात आईने सांगितलं की गेल्या वर्षभरात जे वापरलं नाही ते बाजूला काढायचं. वर्षभर त्याच्याशिवाय जगलो म्हणजे त्याची खरं तर गरज नाहीये आपल्याला. बऱ्याच गोष्टी निघाल्या आवरताना. आपण या का घेतल्या असा प्रश्न पडला.’’
‘‘वापरल्या जाणाऱ्याही सगळय़ा गोष्टी गरजेच्या असतात असं नाही. जसे- ‘नवा व्यापार’ आपल्या सगळय़ांकडे आहे. तो काही एकटय़ाने खेळण्याचा खेळ नाही. खेळणार तेव्हा आपण एकत्रच खेळणार, वापरणार एकच संच, म्हणजे बाकीचे उगीचच घेतले. त्यापेक्षा ठरवून वेगवेगळे खेळ घेतले असते ना.’’ संपदा म्हणाली.
‘‘अमेरिकेत लग्न करणारं जोडपं, त्यांना काय गोष्टी हव्या आहेत याची यादी करतं. लग्नाला आमंत्रित लोक त्या यादीतून आपापल्या बजेटप्रमाणे भेट देतात. त्यामुळे जे गरजेचं आहे तेच जोडप्याला मिळतं. नको त्या किंवा त्याच त्याच भेटवस्तू टळतात.’’ सारंगने वेगळी माहिती पुरवली.
‘‘या वर्षीच्या वाढदिवसाला मी असं केलं. मला फास्टर फेणेच्या पुस्तकांचा संपूर्ण संच हवा होता. आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी आणि मित्र-मैत्रिणींना मी हे सांगितलं. त्यामुळे सगळय़ांनी एक-दोन असं करत फास्टर फेणेची पुस्तकं भेट दिली. उरली ती आई-बाबांनी आणली. इतकं मस्त वाटलं तो पूर्ण संच बघून.’’ यश म्हणाला.
‘‘भारी!!’’ इति गणेश.
‘‘आम्ही कॉलेजला गेल्यावर वाढदिवसाला भेटवस्तू देणं-घेणं बंदच केलं. पण तुम्ही लहान आहात, भेटवस्तू नसेल तर वाढदिवसाची मजा काय? पण यशची कल्पना मला खूप आवडली.’’
‘‘आम्ही सोसायटीत ठरवून ‘रिटर्न गिफ्ट’ प्रकार बंद करून टाकला. सगळं असतंच आपल्याकडे. कित्येकदा त्या पाकिटातून काढल्याही जात नाहीत.’’ यतीन म्हणाला.
‘‘बघा, आपल्याला खरंच याची गरज आहे का? हा विचार तुम्ही आधीच करत आहात. जेवढे जास्त लोक हा प्रश्न विचारतील तेवढं चांगलं.’’ सारंग म्हणाला.
aditideodhar2017@gmail.com