‘‘मुलांनो, निराश होऊ नका. अपयशानं खचून जाऊ नका. पुन्हा नव्या जोमानं तयारीला लागा. यश जरूर मिळेल.’’ क्रिडा स्पर्धेत हरलेल्या विद्यार्थ्यांना गुरुजी धीर देत होते. त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगत होते. ‘‘ एक लक्षात ठेवा ‘प्रॅक्टिस मेक्स अमॅन परफेक्ट’; तेव्हा तयारी, अभ्यास चालू ठेवा. या अभ्यासाबद्दलची एक गोष्ट सांगतो.. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा पृथ्वीवर महाभयंकर दुष्काळ पडला. पाऊस न पडल्यामुळे तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली. लोक, गुरं, ढोरं, पक्षी, झाडं पाण्यासाठी तहानले. एकेकाळची हिरवीगार दिसणारी, फळाफुलांनी वृक्षलतांनी बहरलेली धरती ओकी बोकी दिसायला लागली. नदी-नाले आटल्यानं सर्वत्र वैराण, रखरखीत भूप्रदेश नजरेस पडू लागला.’’
‘‘अशा भयंकर दुष्काळात एक शेतकरी आपल्या शेतात दुबळ्या बैलांच्या साथीनं प्रामाणिकपणे नांगरणी करीत होता. वास्तविक पाऊसपाणी नसताना जमीन नांगरणं म्हणजे इतरांच्या दृष्टीनं तो शुद्ध मूर्खपणा होता. तद्दन वेडेपणाच! बघणारे लोक तसे म्हणतदेखील. परंतु तो शेतकरी मात्र इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून इमानेइतबारे आपलं शेत नांगरण्याचं काम करीतच राहिला. एखाद्या गवयानं रोज नेमानं रियाझ करावा, किंवा खेळाडूनं खेळाचा भरपूर सराव करावा तसा. लोक त्या शेतकऱ्याला पाहून बडबडत, हसत, कुचेष्टा करीत, पण शेतकरी नेमानं आपलं काम करीत राहिला.’’
‘‘योगायोगानं एकदा त्या रस्त्यावरून भगवान विष्णू आणि लक्ष्मी पृथ्विभ्रमणाला चालले होते. दोघाही देवतांनी खेडूत पती-पत्नीचं रूप धारण केलं. सुकलेल्या वैराण भूमीत नांगरणी करणाऱ्या त्या शेतकऱ्याला पाहताच लक्ष्मीला हसू आलं. मोठय़ा कुतूहलाने लक्ष्मी त्या शेतकऱ्याला बघत राहिली. ’’
‘‘काय पाहतेस एवढं तिकडे?’’ भगवान विष्णूंनी विचारलं.
‘‘गंमत पाहतेय!’’ लक्ष्मी हसली.
‘‘मग आम्हालाही दाखवा ना ती गंमत?’’ विष्णूंनी उत्सुकता दाखवली.
‘‘जरा या डाव्या बाजूला पाहा. तो शेतकरी वेडाच दिसतोय.’’
लक्ष्मीनं डाव्या बाजूच्या उजाड, रखरखीत शेतात पाण्याअभावी शेत नांगरणारा तो शेतकरी दाखवला. विष्णूंनी वळून त्या बाजूला पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं.
‘‘कमाल आहे? चल आपण त्याची चौकशी करू.’’ असं म्हणत ती दोघं त्या शेतकऱ्याजवळ गेली.
‘‘काय हो शेतकरीदादा, सध्या तर गावात भयंकर दुष्काळ पडलाय. तोंडात घालायला पाण्याचा थेंब नसताना तुम्ही शेतात ही नांगरणी का करीत आहात?’’ विष्णूंनी विचारलं. त्याबरोबर शेतकऱ्यानं बैलांचे कासरे ओढून बैलांना थांबवलं. नांगर जागीच उभा करून ठेवला. आणि डोक्याच्या जीर्णमुंडाशानं कपाळावरचा घाम पुशीत त्या दोघांजवळ येत नम्रपणे म्हणाला- ‘‘हे बघा दादा, दुष्काळ पडलाय हे माहीत असूनही रखरखीत शेतात नांगरणी करतोय म्हणून मी तुम्हाला वेडा वाटलो असेन. पण या वर्षी दुष्काळ पडलाय म्हणून नांगर चालविला नाही तर नांगर चालवायचा माझा अभ्यास सुटेल ना? मी नांगर चालवणं पूर्णपणे विसरून जाईन. काय हाय दादा, कोणत्याही गोष्टीची माणसाला सवय म्हणा, अभ्यास म्हणा, सराव म्हणा असायलाच हवा. मी म्हणतो आवश्यकच आहे. त्यामुळे आपण सज्ज असतो. पाऊस पडेल, मग नांगरणी करू हे कसं चालेल? ते मग आग लागल्यावर विहीर खणण्यासारखं होईल. म्हणून मी शेत नांगरून एक प्रकारे माझा अभ्यासच करीत असतो. काय सांगावं पाऊस कधीही पडेल. आपण तयार असलेलं बरं.’’
शेतकऱ्याचं बोलणं ऐकून विष्णू-लक्ष्मीचं समाधान झालं. ‘‘शेतकरीदादा तुम्ही योग्य तेच करीत आहात. माणसाला एखाद्या गोष्टीचा सराव, अभ्यास असणं अगदी महत्त्वाचं आहे.’’ लक्ष्मी म्हणाली. आणि शेतकऱ्याचा निरोप घेऊन ती दोघं पुढं निघाली.
काही अंतर चालल्यावर लक्ष्मीला राहवलं नाही. ती पटकन विष्णूंना म्हणाली, ‘‘स्वामी, गेल्या कित्येक दिवसांत आपण आपला शंख वाजवला नाहीए. आपण शंख वाजवण्याचं विसरलात तर नाही ना? कारण आपण शंख वाजवला की वरुणराजा पर्जन्यवृष्टी करतो हे मला पूर्ण ठाऊक आहे, पण आपण शंख वाजवण्याचा अभ्यास सोडून बरेच दिवस झालेत. तेव्हा शंख वाजवण्याचा सराव करा. म्हणजे पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी होईल. आणि आपल्यालाही कळेल की आपण शंख वाजविण्याचं विसरलो नाहीए. तेव्हा वाजवा तुमचा शंख?’’
‘‘तू म्हणतेस ते खरं आहे. मी हल्ली शंख वाजवणं पूर्ण विसरून गेलोय. माझी ती सवय, तो अभ्यास थांबलाय. आणि अभ्यासाशिवाय सगळं व्यर्थ आहे.’’
‘‘अहो, मग उशीर कशाला? आत्ताच शंख वाजवून तुमचा अभ्यास पुन्हा सुरू करा!’’ लक्ष्मी चटकन म्हणाली.
‘‘होय. वाजवतोच शंख. होऊ दे पर्जन्यवृष्टी. समस्त गावांना, झाडं झुडपांना, पशुपक्ष्यांना पाणी तरी मिळेल. वाजवतोच शंख!’’
भगवान विष्णूंनी तोंडाला शंख लावून जोरानं फुंकला. त्याबरोबर जादू झाली. शंखाच्या ध्वनिलहरी आकाशभर पसरल्या. आकाशात काळ्या मेघांची एकच दाटी झाली. थंडगार वारे वाहू लागले. कडाऽऽड  कड् विजा चमकू लागल्या, आणि बघता बघता आभाळ अमृतधारा बरसू लागलं. आकाशातून पडणारं पाणी भूमी अधाशासारखं पोटात रिचवू लागली. झाडंझुडपं सुखावली, पक्ष्यांनी चोची भरभरून पाणी घेतलं. शेतात बैलांसह शेत नांगरणारा शेतकरी आनंदला. त्यानं प्रसन्नतेनं आकाशाकडे पाहून कृतज्ञतेनं हात जोडले. ‘‘देवा, तुझी लीला अगाध आहे बाबा. अशीच कृपादृष्टी असू दे!’’ तो पुटपुटला आणि समाधानानं शेत नांगरू लागला..
तेव्हा मुलांनो, अपयशानं निराश होऊ नका. नेमानं अभ्यास करा.

Story img Loader