काळ्या ढगांनी भरलेलं आकाश, अधूनमधून रिमझिमणारा पाऊस, वैशाखातल्या कडक उन्हाकडून ज्येष्ठातील हिरवाईकडे चाललेला निसर्ग आणि त्यातूनच आलेली वाऱ्याची झुळूक बातमी घेऊन आली, ‘‘उद्यापासून शाळा सुरू होतेय रे.. उद्यापासून..’’ शाळेच्या गेटपासून शाळेमागच्या मदानातील बास्केटबॉलच्या बास्केटपर्यंत प्रत्येकाच्या कानावर ही बातमी घालून झुळूक शीळ घालत निघूनही गेली; पण क्षणात शाळेचा सारा परिसर उल्हसित करून गेली. उद्यापासून थव्याने येणारे विद्यार्थी, उमटणारे प्रार्थनेचे सूर, अनंत ध्वनिलहरींनी निनादणारा परिसर, यांच्या विचारानेच प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. खेळाचं ओकंबोकं मदान उद्यापासून सुरू होणाऱ्या चिवचिवाटाच्या विचारानं एकदम आनंदून गेलं. प्रयोगशाळेतील साहित्यानं स्वत:चं आंबलेलं अंग हळूच झटकून हलकं केलं. चित्रकला वर्गातले रंग आणि ब्रश खुद्कन हसले. संगीत वर्गातील पेटी-तबल्यांनी सुरातालांची एकवार उजळणी केली. सारं वातावरण उद्याच्या विचारानं क्षणांत चतन्यमय झालं.
थव्याथव्यानं येणारी मुलं, त्यांना पोहोचवायला येणारे पालक, मुलांच्या काळजीनं चिंताक्रांत झालेले त्यांचे चेहरे अन् पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेणाऱ्या चिमण्यांचे भेदरलेले, पण औत्सुक्यानं भरलेले चेहरे, हे सगळं शाळेच्या इमारतीच्या नजरेसमोर आलं आणि ती एकदम आनंदित झाली. मनोमन हरखली. शाळेचं गेट आपली बंद कवाड उघडण्यासाठी उतावीळ झालं. उद्यापासून दप्तर पाठीला अडकवून गप्पा मारत येणारे छोटे दोस्त कधी एकदा येतील, अशी असोशी लागली.
िभती रंगवून, त्यावर अनेक ज्ञानपूर्ण सुविचार लिहून बाईंनी त्या आधीच बोलक्या बनवल्या होत्या. पण उद्यापासून मुलं तो मजकूर मोठमोठय़ांनं वाचून एकमेकांना सांगतील, हसतील, टाळ्या देतील या विचारांनी त्या बोलक्या िभती त्यांच्या स्वत:च्या नकळतच त्यांच्यावर लिहिलेल्या गाण्यांच्या ओळी केव्हा आळवू लागल्या ते त्यांनाच कळलं नाही.
त्या स्वरांच्या आवाजानं वर्गात बॉक्समध्ये बसलेले इवलेसे खडू एकदम जागे झाले. त्यांनी फळ्याकडे चौकशी केली, ‘काय झालं रे? फळ्याने उद्यापासून शाळा सुरू होणार असल्याची सुवार्ता सांगितली मात्र, खडू एकदम आनंदाने खडबडले. परत एकदा ज्ञानदानासाठी शरीर झिजवण्यासाठी सज्ज झाले. ते पाहून फळा गालातल्या गालात हसला. यांचा जीव केवढा नि आनंद केवढा, असंच वाटलं त्याला. पण नंतर मात्र विचारात पडला, खरंच किती राबतो हा मुलांसाठी. त्यांना ज्ञान देण्यासाठी माझ्या अंगावरून अलगद फिरतो, कधीही कुरकुर करत नाही की आळस करत नाही. याचा वापर करून मुलांनी अवघड गणित सोडवलं की मुलांएवढाच आनंद यालाही झालेला मी पाहिलाय. याचे रंग मुलांना शाळेकडे आकर्षति करण्यासाठी किती मोलाचा वाटा उचलतात. पण हा बिचारा मुलांसाठीच आपलं सारं आयुष्य खर्च करत असतो. फळ्याला एकदम गाढवाला शेपटी काढण्याच्या खेळाची आठवण येऊन हसूच फुटलं. हा कुठेकुठे फिरतो आणि कायकाय गमती करतो तेव्हा सगळ्या वर्गात हास्याचे कसे पाट वाहतात, या आठवणीने हसू फुटलेल्या फळ्याने एकवार सभोवताली पाहिलं, तर बेंच, टेबल, खुर्ची सारेजण आळोखे पिळोखे देत होते. कपाट आपले दोन्ही हात फैलावून मुलांच्या वह्य़ा, पेपर्स, स्टेशनरी, अभ्यासाच्या सी.डीज्, बाईंचे शालोपयोगी कागद ठेवण्यासाठी अगदी तय्यार होतं. बेंच आणि डेस्कच्या नजरेत उद्यापासून नव्याने येणाऱ्या बेंचमेटबाबत औत्सुक्य ओघळत होतंच, पण त्याबरोबर मारामाऱ्या, चिडवाचिडवी, भांडणं, रडणं, धुसफूस, गळाभेट, ऑफ तासाला केलेली मज्जा हे आणि यासारखं सग्गळं सग्गळं परत अनुभवायला मिळणार म्हणून ते दोघेही सज्जतेने ताठ बसले होते.
बाईंचं मनही आता शाळेकडे निघालं होतं, त्यांची आवडती चिमणीपाखरं त्यांना भेटणार होती, खूप साऱ्या गप्पा सांगणार होती. नवनवीन गाणी, गोष्टी, उपक्रम राबवताना मज्जा येणार होती. स्पर्धा, स्नेहसंमेलन, क्रीडास्पर्धा याबरोबरच रोजचा अभ्यासही हसतखेळत शिकवताना त्यांनाही खूप मज्जा येणार होती. त्या विचारानेच त्या खूश झाल्या होत्या.
पण खरी गंमत काय होती माहीत आहे का? शाळेत जाणाऱ्या छोटुकल्यांना हे सारं एवढं माहीतच नव्हतं, तरीही शाळेचं प्रसन्न वातावरण त्यांना खुणावत होतं. नवा युनिफॉर्म, नवी पुस्तकं, नवा वर्ग, नव्या बाई या साऱ्या नव्याची नवलाई अनुभवण्यासाठी ही बच्चेकंपनी उतावीळ झाली होती. हातात हात गुंफून आनंदाने शाळेकडे निघाली होती आणि मजेत गात होती.. शाळेला चाललो आम्ही.. शाळेला चाललो आम्ही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा