दोन आठवडय़ांपूर्वी सोमवारी सकाळी नदीकाठी त्या पाटय़ा आणि मागच्या सोमवारी शिल्पे यामुळे एकदम इंट्रेस्टिंग करून टाकला. अर्थात, इंट्रेस्टिंग झाला, पण मजेशीर नाही. नदीवरच्या पाटय़ा आणि ती शिल्पे जे सांगत होती ते विचार करायला लावणारे होते. किरकोळ वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम फारच मोठा आहे. रोज ऑफिसमध्ये चहा प्यायला पेपर कप वापरला तर एका वर्षांत आपण कमीत कमी साडेचारशे पेपर कप वापरतो? बापरे!!
पेपर कप, बाटलीबंद पाणी, प्लॅस्टिक टिफिन, कचरा आणि नदीचं प्रदूषित पाणी सगळय़ांनी विचार करायला भाग पाडले होते. रेस्टॉरंटमध्ये लोक बाटलीबंद पाण्याला नाही म्हणून आवर्जून साधं पाणी मागू लागले. ऑफिसमध्ये आपण साधे कप का ठेवत नाही अशी ऑफिस अॅडमिनकडे विचारणा होऊ लागली. अनेक लोक ऑफिसने बदल करायची वाट न बघता स्वत:चा कप घेऊन येऊ लागले होते. चहा प्यायचा, कप धुऊन ठेवून द्यायचा.
कॉलेज युवक-युवती स्वत:च्या कपातून कटिंग चहा पीत होते आणि त्याची इन्स्टास्टोरी करत होते. स्वत:ची स्टीलची बाटली वापरणे कॉलेजमध्ये फॅशनेबल झाले.
नदीवरच्या पाटय़ांमुळे नदीकडे लक्ष गेले होते. नदीत वाहणाऱ्या, नदीकाठावर पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे तुटके चमचे, ताटल्या हे दृश्य त्रासदायक होतं. हे सगळं टाळणं किती सोपं आहे. मोबाइल विसरत नाही, पाकीट विसरत नाही, मग एक कापडी पिशवी घ्यायची लक्षात राहणं काही अवघड आहे का? फेसबुकवर अशा पोस्ट सुरू झाल्या.
रोज गुड मॉर्निग मेसेज पाठवणारे लोक व्हॉटस्अॅपग्रुपवर, ‘सुप्रभात’च्या जोडीने घरातून बाहेर पडताना आपला कप, बाटली आणि पिशवी विसरू नका असे मेसेज पाठवायला लागले.
एका शाळेने नियम केला की नवीन वर्षांपासून पाठय़पुस्तकांना प्लास्टिकचे कव्हर घालायचे नाही. दुसऱ्या एका शाळेत पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू होती. शाळेच्या प्रवेशद्वाराशी ठेवलेल्या फळय़ावर नियम लिहिले होते- शाळेची वेळ, गणवेश याबरोबर एक नियम होता की शाळेत केवळ स्टीलचा डबा आणि स्टीलची बाटली वापरणे बंधनकारक आहे, प्लास्टिक टिफिन आणि प्लास्टिकची पाण्याची बाटली चालणार नाही.
एका हॉटेलने बाहेर मोठी पाटी लावली की, आम्हाला तुमची आणि निसर्गाची काळजी आहे म्हणून बाटलीबंद पाणी आम्ही ठेवत नाही. लोक समाजमाध्यमांचा वापर कल्पकतेने करत होते. चांगल्या स्थितीत, पण वापरात नसलेल्या गोष्टींची देवाणघेवाण करणारा एक ग्रुप सुरू झाला. प्लॅस्टिकच्या एकदा वापरून कचरा ठरणाऱ्या ताटल्या आणि चमचे न वापरता पुन्हा वापरता येतील अशा स्टीलच्या ताटल्या आणि चमचे एकमेकांना वापरायला देणारे गट तयार झाले. पेपरमध्ये या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती येत होती. ते वाचून त्यापासून प्रेरणा घेऊन आणखी नवीन उपक्रम सुरू होत होते.
संपूर्ण शहर झोपेतून जणू जागे झाले होते. प्रत्येक कृतीचा नव्याने विचार करत होते. प्रत्येक कृती जागरूकपणे करत होते. एकदा ठरवले की करणे किती सोपे असते हेही त्यांना जाणवत होते.
अशातच एका वृत्तपत्रात घोषणा झाली. पुणे शहराचा जाहीरनामा, लवकरच..
बस्स, एवढंच.. काही तपशील नाहीत, काही नाही.
आता हे काय नवीन?
aditideodhar2017@gmail.com