गोष्ट आहे मनू आणि तिच्या वर्गाची! मनू म्हणजे पाच-साडेपाच वर्षांची शाळेत रोज उड्या मारत, मजेत जाणारी गोड मुलगी; आणि तिचा वर्ग म्हणजे तिच्यासारख्याच उड्या मारणाऱ्या मुलामुलींचा शेवंती वर्ग! मनू तिच्या शेवंती वर्गात आवडीनं यायची. कारण तिची वर्गताई म्हणजे प्रणालीताई मुलांचा अभ्यास म्हणजे रोज नवे खेळ घ्यायची, भरपूर चित्रं काढायला द्यायची, गाणी म्हणायची, गोष्टी ऐकवायची. रोज वर्गात गंमत असायची. शाळा भरताना शेवंती वर्गाच्या दारात प्रणालीताई मुलांची वाट पाहायची. मनूला शाळेच्या गेटमधूनच तिचा शेवंतीवर्ग आणि दारात उभी असलेली प्रणालीताई दिसायची. ती तिथूनच ताऽऽऽई अशी जोरदार हाक मारायची. नाचत बागडत वर्गाकडे यायची आणि प्रणालीताईला घट्ट मिठी मारायची. प्रणालीताईही तिच्या हाकेची आणि तिच्या मिठीची अगदी आतुरतेनं वाट पाहात असायची. एकदा मनू वर्गात नेहमीपेक्षा जास्त आनंदात आली. कारण ती आईबरोबर चार दिवस आजी-आजोबांच्या घरी राहायला जाणार होती. त्यादिवशी मनूची सतत बडबड सुरू होती. आजी-आजोबांबरोबर काय मजा करायची हे ताईला सांगण्यातच ती दंग होती. नंतर पुढचे चार दिवस शेवंतीवर्ग थोडा शांत होता. मनूची बडबड नव्हती. सारखं काहीतरी सांगणं नव्हतं. ताईलाही चुकल्यासारखं झालं होतं. पण पुढे चार दिवसांपेक्षा जरा जास्तच दिवस मनू शाळेत आली नाही. जवळजवळ आठ दिवसांनी ताईला गेटमधून मनू येताना दिसली. ताईला वाटलं आलं वादळ! आता ताऽऽऽई अशी हाक कानावर पडणार असं तिला वाटलं. पण मनूनं हाक मारलीच नाही. ती उड्याही मारत आली नाही. तिनं ताईला मिठीही मारली नाही. प्रणालीताईला काय झालं कळेना. मनू अजिबात उत्साही नव्हती. ताईला जाणवलं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. मधेच वर्गात एकदोनदा मनू इतकी घाबरली की ताईला काळजीच वाटली. ताईनं विचारलं, ‘‘काय झालंय? कोणी ओरडलंय, मारलंय का?’’ त्यावर मनू न बोलता लांब पळून गेली. मनूचा मूड सुधारण्यासाठी ताईनं तिच्या आवडीचा पकडापकडीचा खेळ वर्गात घ्यायला सुरुवात केली. पण राहुल मनूला पकडायला आला तर मनू घाबरून जोरात ‘‘नको, सोड सोड’’ करायला लागली. राहुलला कळेना आपल्याशी नेहमी मस्ती करणारी मनू आज आपल्याला का घाबरली! त्यामुळे तोही घाबरला. मनू घाबरून खालीच बसली होती. सगळा शेवंतीवर्गच घाबरल्यासारखा झाला. ताईनं सगळ्यांनाच शांत केलं. तो दिवस शेवंतीवर्गाचा अगदी वेगळाच गेला. गडबड करणारा, नाचणारा शेवंतीवर्ग आज जरा गप्प, घाबरलेला होता.

प्रणालीताईला काहीतरी वेगळं झालं आहे असं जाणवलं. तिनं मनूच्या आईबाबांना ताबडतोब शाळेत बोलवलं. त्यांनाही मनूमध्ये बदल जाणवला होताच. तेही काळजीत होते. ते तिला अनेक प्रकारे विचारण्याचा प्रयत्न करत होते. ती त्यांनाही काही सांगत नव्हती. पण ती ‘सोड सोड’ म्हणतेय याचा अर्थ कोणीतरी तिला अयोग्य स्पर्श केला होता हे नक्की होतं. पण कधी, काय, कुठे आणि कोणी मनूला धरलं होतं हे मात्र कळण्यास काहीच मार्ग नव्हता. नशिबानं मनूला काही इजा झाली नव्हती. प्रणालीताईनं ठरवलं, आता मनू आणि शेवंतीवर्गातील तिच्या मित्र-मैत्रिणींना ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ म्हणजे काय, याची पुन्हा जाणीव करून द्यायची. तसंच कोणी ‘वाईट स्पर्श’ केला तर कसा प्रतिकार करायचा हेही सांगायचं.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’

हेही वाचा : सुखाचे हॅशटॅग : तुच तुझा सुखकर्ता

दुसऱ्या दिवशी प्रणालीताई मुलांना म्हणाली, ‘‘आज मी तुमच्यासारख्याच लहान मेधाची गोष्ट सांगणार आहे. तिला तुमच्यासारखंच खूप खेळायला आवडायचं. एकेदिवशी ती खेळायला शेजाराच्या घरात गेली. तिथे तिच्या ओळखीचा एक दादा बसला होता. दादानं तिला चॉकलेट देऊ केलं. ते घ्यायला ती दादाजवळ गेली. तर त्यानं तिला एकदम जवळ घेतलं. मेधाला ते अजिबातच आवडलं नाही. ती जोरात ओरडत बाहेर निघून गेली. दादानं दिलेलं चॉकलेटपण तिथेच टाकलं. धावत ती आईबाबांकडे गेली. त्यांना जाऊन दादाचं नाव सांगितलं. मग तिच्या आईबाबांनी दादाला शिक्षा केली.’’

राहुल म्हणाला, ‘‘हो, असं जायचं नसतं कुणाजवळ. माझी आई सांगते मला.’’ अजून चारपाच जणांनी, ‘आम्हालाही असंच सांगितलं आहे’, असं सांगायला सुरुवात केली. ताईला जाणवलं अर्धवट अशी माहिती सर्वांनाच होती. ताई सगळ्यांनाच समजावत म्हणाली, ‘‘आई-बाबां जवळ घेतात ते आवडतं नं?’’ सगळ्यांनी मनापासून माना डोलवून ‘हो’म्हटलं. तोच धागा पकडत प्रणालीताई म्हणाली, ‘‘आई-बाबांप्रमाणेच, मावशी, आजी, आजोबा जवळ घेतात तेपण आपल्याला आवडतं. हो नं. त्याला म्हणायचं चांगला स्पर्श. पण काही काही लोकांनी जवळ घेतलेलं मात्र आपल्याला आवडत नाही. त्याला म्हणायचं वाईट स्पर्श. असा स्पर्श करणारे अनोळखी किंवा कधीकधी ओळखीचे काका, मामा, दादा किंवा आजोबा असतात. अशा लोकांजवळ आपण अजिबात थांबायचं नसतं.’’ प्रणालीताईला जाणवलं की मुलांना अजून नीट कळलं नाही. म्हणून प्रणालीताईनं जमिनीवर मुलाचं चित्र काढलं आणि एकएक करत त्यांतील अवयव विचारले. मग ताई म्हणाली, ‘‘यातील खांदा, कान, हात, गाल यांना कोणी हात लावला तर चालेल. त्याला चांगला स्पर्श म्हणायचं. पण ओठ, छाती, दोन पायांच्या मधे आणि आपल्या कंबरेच्या खाली कोणी हात लावला तर मात्र अजिबात चालणार नाही. आपले आई-बाबा आणि आई-बाबांच्या देखत डॉक्टर यांच्याशिवाय कुणा म्हणजे कुणाला या अवयवांना हात लावू द्यायचा नाही. असा जर कोणी हात लावला आणि तो आपल्याला आवडला नाही तर त्याला म्हणायचं वाईट्ट स्पर्श.’’ आता मुलांच्या डोळ्यांत थोडी समज जाणवली.

हेही वाचा : बालमैफल : वर्षाचं बक्षीस

प्रणालीताईनं मुलांना जवळ घेत पुढे सांगितलं, ‘‘चांगला म्हणजे सुरक्षित स्पर्श आपल्याला प्रेम देतो, आपली काळजी घेतो, पण वाईट म्हणजे असुरक्षित स्पर्श मात्र आपल्याला दुखवतो, इजा करतो. तसंच असुरक्षित स्पर्श करणारी व्यक्ती घाबरवू शकते, मारू शकते. गप्प राहायला सांगू शकते. पण त्यावेळी तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. कारण तुम्हाला असं करणारा माणूसच घाबरलेला असतो. त्याला भीती असते तुम्ही कोणाला काही सांगितलंत तर. असा स्पर्श होण्यात तुमची काहीच चुकी नसते. तुम्ही अशावेळी अजिबात गप्प बसायचं नाही. असा स्पर्श झाला तर काय करायचं याचा मी एक मंत्र देणार आहे. तो मंत्र आहे ‘नाचाओधासां.’’’
मुलांना ‘नाचाओधासां’ हा नवीन गमतीदार शब्द फारच आवडला. पण ताई मंत्र देणार म्हणजे नक्की काय देणार हेच त्यांना कळेना. तर ताईने चक्क छान गाणं त्यांना म्हणून दाखवलं.
‘‘नाचाओधासां मुलांनो नाचाओधासां,

मंत्र सुरक्षेचा लक्षात हा ठेवा,

एखाद्याचा नाही स्पर्श आवडला

ठामपणे त्याला नो, नाही म्हणा

चावा, ओरडा, धावा आणि सांगा हो सांगा

नाचाओधासां मुलांनो नाचाओधासां

मंत्र सुरक्षेचा लक्षात हा ठेवा

नाचाओधासां म्हणजेच ठामपणे म्हणा ‘नाही, चावा, ओरडा, धावा आणि सांगा.’’
शीतल म्हणाली, ‘‘नाही म्हणा, चावा, ओरडा हे कळलं, पण धावायचं कुठे?’’ ताईनं सांगितलं, ‘‘खूप लोक असणाऱ्या ठिकाणी धावत जायचं.’’
शर्वरीनं विचारलं, ‘‘आणि ताई सांगायचं कोणाला?’’ प्रणालीताई या प्रश्नाची वाटच पाहात होती. ती म्हणाली, ‘‘आपल्या भोवती आपले आई-बाबा, आपले आजी-आजोबा आणि आणि घरातले ताई-दादा यांचं एक वर्तुळ असतं, तिथे खूप सुरक्षित वाटतं. त्याला म्हणायचं सुरक्षित वर्तुळ. तिथेच जाऊन सांगाचयं.’’

हेही वाचा : बालमैफल: प्रसाद… डबल डबल!

‘नाचाओधासां’असे म्हणतं शेवंतीवर्ग नाचायला लागला. मनूही मंत्र म्हणत गाण्याच्या तालावर नाचत होती. ती नक्की यातून बाहेर येईल अशी ताईला खात्री वाटली. मुलांच्या घराघरात ‘नाचाओधासां’ हा मंत्र पोहोचला. काही दिवसांनी शाळा भरताना प्रणालीताई दारात उभी होती. तिला मनू गेटमधून शिरताना दिसली आणि ताऽऽऽई अशी जोरदार हाक ऐकू आली. मनूनं जवळ येत पूर्वीसारखीच ताईला घट्ट मिठी मारली. ताईच्या डोळ्यांत पाणीच आलं. मनू म्हणाली, ‘‘मी आता कोण्णाकोण्णाला घाबरत नाही. कारण मला माहीत आहे- नाचाओधासां, ठामपणे नाही म्हणा, चावा, ओरडा, धावा आणि सांगा.’’
ताई आणि मनू दोघीही हसायला लागल्या आणि एकदम म्हणाल्या, ‘‘नाचाओधासां मुलांनो नाचाओधासां!’’
ratibhosekar@ymail.com