गोष्ट आहे मनू आणि तिच्या वर्गाची! मनू म्हणजे पाच-साडेपाच वर्षांची शाळेत रोज उड्या मारत, मजेत जाणारी गोड मुलगी; आणि तिचा वर्ग म्हणजे तिच्यासारख्याच उड्या मारणाऱ्या मुलामुलींचा शेवंती वर्ग! मनू तिच्या शेवंती वर्गात आवडीनं यायची. कारण तिची वर्गताई म्हणजे प्रणालीताई मुलांचा अभ्यास म्हणजे रोज नवे खेळ घ्यायची, भरपूर चित्रं काढायला द्यायची, गाणी म्हणायची, गोष्टी ऐकवायची. रोज वर्गात गंमत असायची. शाळा भरताना शेवंती वर्गाच्या दारात प्रणालीताई मुलांची वाट पाहायची. मनूला शाळेच्या गेटमधूनच तिचा शेवंतीवर्ग आणि दारात उभी असलेली प्रणालीताई दिसायची. ती तिथूनच ताऽऽऽई अशी जोरदार हाक मारायची. नाचत बागडत वर्गाकडे यायची आणि प्रणालीताईला घट्ट मिठी मारायची. प्रणालीताईही तिच्या हाकेची आणि तिच्या मिठीची अगदी आतुरतेनं वाट पाहात असायची. एकदा मनू वर्गात नेहमीपेक्षा जास्त आनंदात आली. कारण ती आईबरोबर चार दिवस आजी-आजोबांच्या घरी राहायला जाणार होती. त्यादिवशी मनूची सतत बडबड सुरू होती. आजी-आजोबांबरोबर काय मजा करायची हे ताईला सांगण्यातच ती दंग होती. नंतर पुढचे चार दिवस शेवंतीवर्ग थोडा शांत होता. मनूची बडबड नव्हती. सारखं काहीतरी सांगणं नव्हतं. ताईलाही चुकल्यासारखं झालं होतं. पण पुढे चार दिवसांपेक्षा जरा जास्तच दिवस मनू शाळेत आली नाही. जवळजवळ आठ दिवसांनी ताईला गेटमधून मनू येताना दिसली. ताईला वाटलं आलं वादळ! आता ताऽऽऽई अशी हाक कानावर पडणार असं तिला वाटलं. पण मनूनं हाक मारलीच नाही. ती उड्याही मारत आली नाही. तिनं ताईला मिठीही मारली नाही. प्रणालीताईला काय झालं कळेना. मनू अजिबात उत्साही नव्हती. ताईला जाणवलं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. मधेच वर्गात एकदोनदा मनू इतकी घाबरली की ताईला काळजीच वाटली. ताईनं विचारलं, ‘‘काय झालंय? कोणी ओरडलंय, मारलंय का?’’ त्यावर मनू न बोलता लांब पळून गेली. मनूचा मूड सुधारण्यासाठी ताईनं तिच्या आवडीचा पकडापकडीचा खेळ वर्गात घ्यायला सुरुवात केली. पण राहुल मनूला पकडायला आला तर मनू घाबरून जोरात ‘‘नको, सोड सोड’’ करायला लागली. राहुलला कळेना आपल्याशी नेहमी मस्ती करणारी मनू आज आपल्याला का घाबरली! त्यामुळे तोही घाबरला. मनू घाबरून खालीच बसली होती. सगळा शेवंतीवर्गच घाबरल्यासारखा झाला. ताईनं सगळ्यांनाच शांत केलं. तो दिवस शेवंतीवर्गाचा अगदी वेगळाच गेला. गडबड करणारा, नाचणारा शेवंतीवर्ग आज जरा गप्प, घाबरलेला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा