केदार प्रसाद गोखले
उन्हाळी सुट्टीत आई-बाबा आणि मी देशात कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जायचं ठरवलं. सर्व विचार करून आम्ही हिमाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची निवड केली. तेथील चिंडी, शोजा, शांगढ, नगर, रेवलसार या ठिकाणी एक – एक दिवस राहण्याचं नक्की केलं. बांद्रा टर्मिनस ते चंदिगढ असा ट्रेननं प्रवासाला सुरुवात केली. ही ट्रेन वडोदरा, अहमदाबाद, महिसाना, आबू रोड, अजमेर, रेवाडी, दिल्ली कॅट, अंबाला मार्गे चंदिगढ येथे पोहोचली. तिथून आम्ही रिक्षानं किशनगढ भागातील एका खासगी हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही तेथून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या सुखना तलावाला भेट दिली. या विभागातील हा सर्वात मोठा तलाव. तलाव परिसरात पायडल बोट, शिकार बोट व स्पेसिअस क्रूझची व्यवस्था आहे. परंतु या सर्व प्रकारच्या बोटींचे दर खूपच जास्त असल्याचे जाणवले. तलाव परिसरात बर्ड पार्क, गार्डन ऑफ सायलेन्स तसेच मुलांसाठी अम्युजमेंट पार्क व खाण्यापिण्याच्यादेखील सोयी आहेत. आम्ही तिथे छोले भटुरे, पनीर कटलेट, आइसक्रीमचा आस्वाद घेतला. तसेच सुखना लेकच्या काठावर फेरफटका मारला.

दुसऱ्या दिवशी सकाळी चंदिगढहून निघालो व कुणिहार, आर्की मार्गे सुमारे पाच ते सहा प्रवास करून चिंडी या ठिकाणी पोहोचलो. हे गाव सुमारे १५०० मी. उंचीवर वसलेलं आहे. तिथे हिमाचल पर्यटन विकास निगमच्या हॉटेल मामलेश्वर येथे आमचा मुक्काम होता. चिंडीपर्यंतच्या प्रवासात आम्ही जॅकारॅंडा (जांभळी फुले) तसेच गव्हाची शेती, विविध प्रकारची गुलाबाची फुलं बघितली. या प्रवासातील अर्धा भाग घाटातील वळणावळणाचा होता. चिंडीला हॉटेल मामलेश्वरपासून १० मिनिटांच्या पायी अंतरावर दुर्गादेवीचं लाकडी कोरीवकाम असलेलं स्थानिक शैलीतील एक देखणं मंदिर आहे. तिथं दर्शन घेतल्यावर आम्ही तेथील दोन-तीन स्थानिक लोकांशी संवाद साधला. मंदिराच्या बाजूलाच जिल्हा परिषदेची प्राथमिक हिंदी शाळा आहे ती बघितली. चिंडी परिसरात सफरचंदाच्या बागा आहेत. त्या भागात कधी कधी गारपीट होते, त्यापासून रक्षण करण्याकरिता सफरचंदाच्या झाडावर एक प्रकारचं आवरण घातलेलं असतं. तसंच सफरचंदाच्या झाडांच्या खोडांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये थोडं पाणी घालून त्यात सफरचंदाच्या दुसऱ्या झाडाची फुलं असलेली छोटी फांदी ठेवलेली असते. परागीभवन म्हणजेच पॉलिनेशनसाठी त्याचा उपयोग होतो. त्या भागात विविध पक्ष्यांचं दर्शन झालं व किलबिलाट ऐकू आला. बुलबुल, पोपट, हुप्पी, मॅगपाई असे अनेक पक्षी दिसले.

दुसऱ्या दिवशी जरा लवकर उठून आम्ही हॉटेलच्या आजूबाजूच्या देवदार वृक्षातून फेरफटका मारला. नंतर सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास आम्ही चिंडी ते शोजा या प्रवासाला सुरुवात केली. कारसोगा येथील कामाक्ष मंदिर व मामलेश्वर मंदिर बघितलं. मामलेश्वर मंदिरात एका काचेच्या पेटीत ठेवलेला गव्हाचा मोठा दाणा (धान) बघितला. त्यानंतर आम्ही मंदिराच्या जवळच एक छोटी हातमागाची फॅक्टरी बघितली. तिथे एक व्यक्ती हातमागावर खादीचे कापड विणत होता. त्यानंतर आम्ही केलाघाट, कोटलू, आनी, खनाग मार्गे जालोडी ज्योत ( jalori pass ) येथे पोहोचलो. या मार्गात आम्हाला पाईन, देवदाराची जंगले लागली तसेच घायपात (agave) भुरांश व दाढुची झाडेही दिसली. जलोडी ज्योतला छोटं मंदिर आहे, तसंच चहा, मॅगीचे स्टॉल, लोकरी उत्पादनं व स्थानिक वस्तूंचे काही स्टॉल्स आहेत. मला हे ठिकाण खूप आवडलं, कारण येथून हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांचं दर्शन झालं. पुढे शोजा मार्गे बंजर व्हॅलीतील जिभी या ठिकाणी जाताना आम्हाला रस्त्यात काही ठिकाणी साचलेला बर्फही दिसला. जिभी हे ठिकाण घनदाट जंगलात नदीच्या कडेला वसलेलं आहे. तिथं काही खासगी हॉटेल्स व होम स्टेच्या सुविधादेखील आहेत. तेथील एका खासगी हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केला.

आम्ही जिभीहून प्रवासाला सुरुवात केली व लारजी मार्गे सैंज व्हॅलीत प्रवेश केला. सैंज व्हॅली नदीकाठी वसलेलं आहे. तसंच तिथे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारा पार्वती हा मोठा जलविद्याुत प्रकल्प आहे. सैंज व्हॅलीपासून सुमारे १० ते १२ किमी अंतरावर अधिक उंचीवर शांगढ हे ठिकाण आहे. तेथून जवळच एक मोठं हिरवंगार गवताळ मैदान ( meadow ) आहे. शुंगचूल महादेव हे प्राचीन मंदिर आहे. हा भाग अतिशय निसर्गसंपन्न आहे. देवदार व पाईनच्या वृक्षांनी वेढलेला आहे. मैदानाच्या पार्श्वभूमीला हिमालयाच्या पर्वतरांगा अप्रतिम दिसतात. होम स्टेच्या बाजूला हिंदी माध्यमाची प्राथमिक व माध्यमिक शाळा होती, त्यामुळे लहान मुलांची लगबग दिसून येत होती. तिथे आम्ही सिद्दू हा स्थानिक खाद्याप्रकार खाल्ला. गव्हाच्या पिठाचे आवरण व त्यात अक्रोड व इतर गोष्टींचे सारण असते. त्याला चटणी किंवा साजूक तुपाबरोबर खाल्ले जाते.

आम्ही शांगढवरून निघालो आणि परत सैंज व्हॅली, लारजी मार्गे एका मोठ्या लांबलचक बोगद्यातून प्रवास करत औटला पोहोचलो. तेथून आता मनालीपर्यंत चौपदरी ( four lane) रास्ता आहे. त्यामार्गे कुल्लू व्हॅली भुंतर (विमानतळ), रायसेन मार्गे नग्गर दिशेने निघालो. रायसेन या ठिकाणी प्याराग्लाइडिंग, रिव्हर राफ्टिंग अशा विविध साहसी खेळांची सोय आहे. तेथून अर्ध्या तासात आम्ही नग्गरला पोहोचलो. तेथे रोइरिक (रोजेरीच) आर्ट गॅलरी व आजूबाजूचा परिसर बघितला. निकोलस रॉयरिक हा रशियन अभ्यासक, चित्रकार होता. त्याने हिमालयातील सर्व भागातील अनेक ठिकाणांची उत्तम चित्रे काढली होती, ती व इतर अनेक गोष्टींचा संग्रह या आर्ट गॅलरीत आहे. या परिसरात रॉयरिक यांचं जुनं घरही आहे तेही पर्यटकांना बघता येतं. त्या दिवशी आर्ट गॅलरी परिसर बघताना वातावरण ढगाळ होतं व पावसाचा हलका शिडकावा झाला. तेथून जवळच नग्गरचा. छोटा राजवाडा ( castle) आहे. त्याचं हिमाचल पर्यटक निवासात रूपांतर करण्यात आलं आहे. आम्ही हा पूर्ण राजवाडा आरामात बघितला.

आम्ही दुपारी १२ च्या सुमारास पराशर लेकला पोहोचलो. त्याच्या एका कडेला पराशर ऋषींचे प्राचीन मंदिर आहे. रीवालसर हे ठिकाण तेथील सरोवर, बुद्ध गोम्पा व प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या मध्यभागी पवित्र सरोवर आहे. तेथील बाजारातून आम्ही हिमाचल टोप्या विकत घेतल्या. आम्ही रीवालसरहून निघालो. या मार्गात बॉटलब्रश, जॅकारॅंडाची अनेक झाडं फुललेली दिसली. रीवालसरहून सिमल्यालाला आलो. तिथल्या प्रसिद्ध मॉल रोडला भेट दिली. मॉल रोडवर सुप्रसिद्ध जुने चर्च, जुने गेईटी थेटर बघितले, सिमला हे गिरिस्थान ब्रिटिशांनी विकसित केले होते, त्यामुळे अनेक जुन्या उठावदार ब्रिटिश इमारती दिसतात.

सिमला सोडून आम्ही चंदिगढच्या दिशेने निघालो. मार्गात सोलन, परवाणू, पिंजोर, पंचकुला ही ठिकाणे येतात. रॉक गार्डन बघण्यासाठी रिक्षाने निघालो, रॉक गार्डन हे प्रामुख्याने विविध दगडांपासून बनवलेलं आहे. तेथे विविध प्रकारचे दगड व टाइल्सपासून बनवलेले छोटे छोटे मार्ग, भिंती, मूर्ती व अन्य कलाकृती आहेत. एका ठिकाणी धबधबाही तयार करण्यात आला आहे. तसंच एक मत्स्यालय व आरसालयही आहे. तिथे विविध प्रकारचे आरसे लावलेले आहेत. त्यात आपल्या विविध प्रकारच्या प्रतिमा पाहून खूप हसायला येतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ मेला सकाळी लवकर उठून आम्ही चंदिगढ ते वांद्रे टर्मिनस या रेल्वे गाडीने प्रवास सुरू केला व ९ मेला सकाळी ७ वाजता बोरिवलीला पोहोचलो. हिमाचलच्या या सर्व प्रवासात मला शांगढ, पराशर लेक, नग्गर कॅसल, रॉइरिक आर्ट गॅलरी व शिमल्याचा मॉल रोड ही ठिकाणे खूप आवडली. या सर्व प्रवासात मला खूप गोष्टी अनुभवता आल्या. काही नवीन मित्रही ओळखीचे झाले. मुंबई ते चंदिगढ रेल्वे प्रवासातही मला खूप मजा आली. भारतीय रेल्वे हे खरेच आपल्या विविधतेचे एक जणू मॉडेलच आहे. आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण, खाद्या संस्कृती, वेशभूषा यांचा सुरेख संगम बघायला मिळाला.

इयत्ता- आठवी, अभिनव विद्यामंदिर, मराठी माध्यमिक, बोरिवली पूर्व

Story img Loader