माधवी सामंत
एका गावात धोंडिबा नावाचा एक कुंभार राहायचा. धोंडिबा अतिशय कामसू होता. दूर डोंगरावर जाऊन माती आणायची, ती छान मळायची आणि त्यापासून घडे, मडकी वगैरे बनवून विकणं हे त्याचं काम. धोंडिबा स्वत: काम करायचा आणि आपल्याबरोबर गाढवालापण कामाला जुंपायचा. सबंध दिवस काम करायचं आणि आठवडी बाजारात गाडगी- मडकी वाहून न्यायची हे काम सतत सुरू असायचं. कधी कुठे जाणं नाही की येणं नाही. बोलायला मित्र नाहीत की खायला चटक – मटक स्पायसी टेस्टी खाऊ नाही. सारा दिवस ओझी वाहून मिळायचं काय तर उरली – सुरली शिळी कोरडी भाकर! बस्स! गाढव अगदी कंटाळून गेलं होतं, पण करणार काय? जाणार कुठे? कुठेही गेलं तरी या कामातून सुटका होणं शक्य नव्हतं.

धोंडिबाकडे एक मस्त तुरेवाला कोंबडा होता. एकदम कुर्रेबाज अन् ऐटदार! डोईवर जास्वंदीच्या फुलागत लालभडक तुरा, हळदीसारखी पिवळीधम्मक, बाकदार मान, अन् लाल, चॉकलेटी मोरपंखी रंगाचे चकचकीत पंख बघत आपणच मालक असल्यासारखा तो मोठय़ा झोकात चालायचा. असा हा कोंबडा एवढा लाळघोटा अन् चोंबडा होता की कुंभार आला की कुचकुच कुचकुच करत त्याच्या मागे फिरायचा आणि गाढवाच्या खोटय़ानाटय़ा चुगल्या करायचा. आपल्या ऐटदार तुऱ्याची अन् दिमाखदार रूपाची त्याला जरा जास्तच घमेंड होती. सारा दिवस दाणे टिपत िहडायचं, मजामस्ती करायची अन् गाढवाकडे बघून फिदीफिदी हसायचं एवढंच त्याचं काम. कोंबडय़ाच्या या चोंबडेपणामुळे धोंडिबा गाढवाला उगाचच मारायचा, उपाशी ठेवायचा. बिच्चारं गाढव फार दु:खी व्हायचं. खाली मान घालून मुळुमुळु रडायचं आणि संध्याकाळी काम आटपलं की उपाशीपोटी कोपऱ्यात जाऊन चूपचाप बसायचं.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
Stone pelted on Prof Laxman Hake vehicle in Nanded news
नांदेडमध्ये प्रा. लक्ष्मण हाकेंचे वाहन फोडले
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?

एक दिवस कामाने अन् उपासाने बेजार झालेलं गाढव भयंकर संतापलं. मारकुटा धोंडिबा अन् चोंबडा कोंबडा यांच्यावर कधी नाही एवढं वैतागलं. ‘‘नको हे काम अन् नको ही बोलणी! जातोच आता मी इथून. ही दोघंही अगदी वाईट आहेत. कुस्के कुठले!’’ संतापाच्या भरात गाढव जे बाहेर पडलं ते तडक जंगलाच्या दिशेने तरातरा चालू लागलं. चाल – चाल चाललं आणि जंगल येताच दमून एका झाडाखाली गाढ झोपलं.

सकाळ झाली. पक्षी उठले, चुळबुळ करीत किलबिलू लागले. त्यांच्या किलबिलाटाने गाढव जागं झालं. त्याने पाय ताणून मस्त आळोखापिळोखा दिला. थोडा वेळ मऊ – मऊ हिरवळीवर लोळलं आणि तळय़ाकडे जाऊन पाहतो तर काय समोरच्या गारेगार तळय़ात हत्तीदादा अंघोळ करत होते. फुर्र फुर्र करत पाणी उडवत खेळत होते. कान हलवत झुलत होते आणि मनात आलं की सोंडेने पाणी उडवत सर्वाना भिजवत होते.

व्वा! व्वा! कित्ती छान! गाढव पण रंगात आलं. हॅ हॅ हॅ करत गाऊ लागलं. फेंगाडे पाय उडवत अन् मान हलवत उडय़ा मारू लागलं. त्याचं ते वेडंगबाळं ध्यान अन् भसाडा आवाज ऐकून सारे हसू लागले. वात्रट माकडं झाडावरून पटापट खाली आली अन् गाढवाच्या पाठीवर बसून मजेत सर्कस करू लागली. त्यांची ही धमाल बघून ससुला, हरीण, खारुटली, अस्वलभाऊ सारे जमा झाले. हरणाने आणलेल्या काकडय़ा, सशाचं गाजर व खारूटलीच्या शेंगांमध्ये केळय़ाचे काप घालून अतिशहाण्या माकडांनी मस्तपैकी फ्रुट सॅलेड बनवलं. इकडे जंगलात गाढव धमाल करत होतं आणि घरी धोंडिबा गाढवाच्या आठवणीने बेजार झाला होता. त्याचं सारं काम ठप्प झालं होतं आणि ऐतखाऊ कोंबडा कोणत्याच कामाचा नव्हता. त्यामुळे त्याला गाढवाची खरी किंमत समजली होती. ‘‘अरेरे, काय केलं मी हे? खूप छळलं मी त्याला. सारा दिवस कामाला जुंपलं, पण कधी प्रेमाने थोपटलं नाही. उलट काहीही चुका नसताना उगाचच मारलं, उपाशी ठेवलं. चूक झाली माझी.’’ धोंडिबाचं मन त्याला खाऊ लागलं. त्याने बायकोकडून गरम भाकऱ्या आणि बटाटय़ाची भाजी करून घेतली आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला.

गाढवाला शोधत – शोधत तो नेमका तळय़ापाशी आला. तिथेच एका झाडाखाली गाढव शांत झोपलं होतं. त्याला बघून धोंडिबाला खूप बरं वाटलं. त्याने त्याला जवळ घेतलं, चुचकारलं आणि भाजी-भाकरी प्रेमाने खाऊ घातली. गाढवपण खूश झालं अन् आनंदाने घरी परतलं. आता मात्र धोंडिबा पूर्णपणे बदलला होता. गाढवाचे लाड करू लागला. थोडं थोडं काम देऊन प्रेमाने वागू लागला. धोंडिबाचं वागणं बघून चोंबडा कोंबडाही बदलला. आता त्या लुच्च्या कोंबडय़ाची अन् गाढवाची छान मैत्री झालीय. संध्याकाळी काम संपलं की दोघंही नदीकडे फिरायला जातात अन् खूप गप्पा मारतात.
अधूनमधून गाढव रजा घेऊन जंगलात जातं. आपल्या साऱ्या दोस्तांना भेटून येतं. त्यांच्याबरोबर खेळतं, मस्ती करतं, तळय़ात डुंबतं अन् ताजंतवानं होऊन घरी येतं. गाढवाचं मन प्रसन्न झाल्यामुळे त्याचा कामाचा वेगही वाढलाय; त्यामुळे धोंडिबा त्याचे खूपखूप लाड करतो. वेडोबा गद्धोबा आता लाडोबा झालेत.

wlokrang@expressindia.com