माधुरी पुरंदरे हे मराठी बालसाहित्यातील एक महत्त्वाचं आणि मानाचं नाव. लहान मुलांचं भावविश्व अचूक आणि अलगद आपल्या चिमटीत पकडून ते शब्दरूपात अनोख्या पद्धतीने मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्यांच्या लेखनाने मराठी बालसाहित्य आणि बालविश्व अधिक समृद्ध झालं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मराठी बालसाहित्याला प्रगल्भ दृष्टी देण्याचं आणि ते एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं मोलाचं काम माधुरी पुरंदरे यांनी केलं. राधाचं घर, मुखवटे, लालू बोक्याच्या गोष्टी, किकिनाक.. अशी त्यांची खूप मोठी पुस्तक यादी आहे. ‘राधाचं घर’ तर लहानग्यांसोबत मोठय़ांनाही भुरळ पाडणारं. याच धाटणीचं ‘किती काम केलं!’ आणि ‘हॅत्तेच्या!!’ ही दोन पुस्तकं अलीकडे प्रकाशित झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही गोष्ट आहे लहानग्या आरवची! त्यात त्याचे आजी-आजोबा आहेतच; पण त्याचा लाडका निळूही आहे. या छोटेखानी गोष्टींमधून निर्जीव वस्तूंशीही लहानग्या आरवचं असलेलं भावनिक नातं, आपलेपण यांत वाचकही गुंगून जातो.  लहानग्यांच्या या निर्जीव वस्तूंशी असलेली  जवळीक समजून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. या गोष्टीत काय काय आहे? तर रंगीबेरंगी दोऱ्यांची रिळं, सुया, छत्री आहे. ही छत्री म्हणजे आरवचं पॅराशूट आणि तंबूही.. या गोष्टींमधून उभं राहणाऱ्या छोटय़ा आरवच्या विश्वात वाचक रमून जातो. सहज सुंदर शब्दांच्या जोडीला माधुरी पुरंदरे यांची खास चित्रे गोष्टींमध्ये अधिकच रंगत आणतात.

‘हे छोटेसे पुस्तक अगदी रांगत्या बाळांनाही वाचता यावे..’ या पुस्तकांमागचा हा विचार विशेष वाटतो. अनेकदा मुलं पुस्तकं फाडतात म्हणून त्यांना ती हाताळायला दिली जात नाहीत.  पण या पुस्तकांची गंमत म्हणजे, ही पुस्तकं जाड पुठ्ठय़ांची आहेत. त्यामुळे मुलं ती फाडण्याची काळजी नाही. आता, मुलं पुस्तक फाडतात या भीतीने त्यांना पुस्तकांपासून दूर ठेवण्याचा विचार मनातून पार पुसून टाका आणि या पुस्तकांचं बोट धरून त्यांना पुस्तकांच्या अफाट विश्वात पहिलं पाऊल टाकू द्या. रांगत्या बाळांनाही वाचता यावं ही कल्पनाच खूप छान वाटते.

लेखिकेने या पुस्तकाच्या मलपृष्ठावर पालकांसाठी एक कानमंत्र दिलाय. तो असा- पुस्तक आधी बाळाला वाचू द्या. त्याला त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा आणि मगच आपण अलगद त्यात नाक खुपसावे. म्हणजे असे की बाळाच्या हाती कधीही लागेल अशा ठिकाणी पुस्तक ठेवावे. कुणाच्याही मदतीशिवाय बाळाला पुस्तक नावाची ही वस्तू सर्व प्रकारे पाहू द्यावी- हातांनी, डोळ्यांनी, तोंडानेसुद्धा.

बाळ का पाहते? पुस्तकाशी कसे वागते? त्याच्यासमोर आपण एखादे पुस्तक वाचत असतो तेव्हा बाळ ते पाहते का? ते आपली नक्कल करते का? पुस्तकाने त्याच्या वागण्यामध्ये काही फरक पडत जातो का?

कदाचित याच टप्प्यावर त्याच्या वाचनखेळात सामील होण्याची संधी आपल्याला मिळू शकते. त्याचे चित्रे वाचणे आणि आपले शब्द वाचणे हा अनुभव त्याला आणि आपल्याला आयुष्यभर सोबत करू शकतो..

‘किती काम केलं!’, ‘हॅत्तेच्या!!’

माधुरी पुरंदरे

ज्योत्स्ना प्रकाशन,

पाने-११ (प्रत्येकी),

मूल्य- १०० रुपये  (प्रत्येकी)

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta balmafil article marathi story book for children