राधिका विंझे
स्विमिंगक्लासहून रोहन घरी आला आणि आजोबांना म्हणाला, ‘‘आज मी स्विमिंगटँकमध्ये मोठ्ठी उडी मारली.’’
आजोबा म्हणाले, ‘‘अरे वा!’’
रोहन म्हणाला, ‘‘पण आजोबा, उडी मारल्यावर पाणी एकदम वरती आलं आणि डोळ्यात गेलं. एवढं सगळं पाणी कसं काय वरती आलं?’’ रोहनचं हे ऐकून आजोबा त्याला बिल्डिंगखालच्या बगीच्यात घेऊन गेले. झाडांना पाणी घालण्यासाठी एक छोटी बादली तिथे भरून ठेवली होती. आजोबांनी रोहनला सांगितलं, ‘‘तो समोर ठेवलेला मोठा दगड आण आणि या पाण्यात टाक.’’ रोहनने तसं करताच पाणी उसळून वर आलं नाही; परंतु पाण्याची उंची वाढली. नंतर आजोबांनी त्यांच्या खिशातून घराची किल्ली काढली व पाण्यात टाकली. पण तेव्हा पाण्याची उंची विशेष वाढली नाही.
रोहन चक्रावला. त्यानं आजूबाजूचे दगड बादलीतल्या पाण्यात टाकले. मोठे दगड टाकल्यावर पाण्याची उंची लगेच वाढली. पण छोट्या दगडांनी विशेष फरक पडला नाही. मग आजोबांनी त्याला समजावलं : दगड जेवढा मोठा तेवढं पाण्याचं आकारमान वाढतं. जसं स्विमिंगटँकमध्ये तू उडी मारल्यावर तुझ्या आकारमानानुसार पाणी बाहेर पडलं. तुमच्या पाठ्यपुस्तकात याला आर्किमिडीज तत्त्व म्हणतात. स्थायू पदार्थ द्रवात पडला असता त्याच्या आकारमानानुसार द्रव पदार्थाचं आकारमान वाढतं किंवा द्रव पदार्थाचं विस्थापन होतं.
दोघे घरी आले. आजीने नाश्त्याला गरमागरम इडली सांबार केलं होतं. आजीने एका मोठ्या बाऊलमध्ये दिलेल्या सांबारात रोहनने इडलीचे तुकडे घातले आणि आजोबांना म्हणाला, ‘‘बघा… आर्किमिडीज तत्त्व!