अलकनंदा पाध्ये
‘‘जय, ही खोली तुम्हा चौघांची. बाकीचे काहीजण वरच्या मजल्यावर आणि आम्ही टीचर मंडळी तिकडे समोर आहोत. तुम्ही इथं मस्तपैकी गप्पा मारा. वाटल्यास या व्हरांड्यात शतपावली घाला… काय हवं ते करा. मात्र रात्री कुठला नळ वगैरे चालू ठेवू नका आणि झोपताना दार व्यवस्थित लावून घ्या. अगदीच काही लागलं तर पलीकडे माळीकाकांचं घर आहे. खूप जागू नका. आम्ही उठवायला येऊ तेव्हा लगेच उठायचं हं. उद्या आपल्याला स्ट्रॉबेरीच्या शेतात जायचंय. गुड नाइट,’’ म्हणत प्राची टीचर त्यांच्या रूमकडे गेल्या. त्या दिसेनाशा झाल्यावर दार बंद करून ‘येस्स आता आपली धम्माल’ म्हणत सगळ्यांनी एकमेकांना हायफाय केलं. कॅम्पला निघण्यापूर्वीच प्रत्येक ग्रुपचा एक लीडर ठरवला होता. आर्यन, आयुष, आल्हाद आणि जय चौकडी शाळेत सतत एकत्र असायची. आणि कॅम्पमध्येपण एकाच ग्रुपमध्ये आल्यामुळे जाम खूश होते. जय त्याचा लीडर… दिवसभर भटकून त्यांची भयंकर दमछाक झाली होती. पहाटे लवकर उठल्यामुळे खरं तर झोपही येत होती, पण एकत्र गप्पांची संधीही खुणावत होती. दोन पलंग जोडून घेताना आयुषचं लक्ष भिंतीकडे गेलं. निळ्या भिंतीवर काहीतरी ओरखडल्यासारखं दिसत होतं. त्याला ते काहीतरी संशयास्पद वाटलं. बाकीच्यांना तिथं बोलावून ‘‘तुम्हाला काय वाटतंय हे ओरखडे कसले असतील रे?’’ आयुषने थोडं काळजीच्या सुरात विचारलं. बाकीचेही गंभीरपणे भिंतीचं निरीक्षण करायला लागले. पण खोलीतल्या दिव्याचा उजेड खूपच मंद होता. एकट्या आर्यनकडे मोबाइल होता. त्यातला टॉर्च लावून सगळ्यांनी नीट बघितलं. बराच विचार करून, ‘‘हे ओरखडे वेडेवाकडे वरखाली कसेही नाहीत, म्हणजे उगाच कुणीतरी गमतीनं खरवडल्यासारखे नाहीत. ते कुणाच्या तरी टोकदार नखांचे ओरखडे असणार. विशेष म्हणजे फक्त भिंतींवर आहेत वरती छतावर किंवा दारावरसुद्धा नाहीत.’’ वरपासून खोलीभर टॉर्च फिरवीत जयने अनुमान काढलं. त्याबरोबर ‘‘अरे, इथं कोण येणारे नखांनी भिंत खरवडायला?’’ आयुषने मुद्दा उभा केला.
‘‘हो ना! आपल्यासारखे सहलवाले कुणी आले तरच या खोल्या भरतात. नाहीतर एरवी रिकाम्याच असतात.’’ आल्हादने पुस्ती जोडली. जय त्याला थांबवत गंभीरपणे म्हणाला, ‘‘तुमच्या लक्षात येतंय का, इथं नीट बघा- आपल्या नखांचे ओरखडे असे येणार नाहीत, हे ओरखडे माणसाच्या नखांचे नाहीयेत.’’
‘‘बापरे… माणसांचे नाहीत तर मग कुणाचे? भुताचे म्हणायचंय का तुला?’’ आर्यनने विचारलं.
‘‘करेक्ट… अरे जेव्हा इथं कुणी रहात नाही तेव्हा या रिकाम्या खोल्यांत कदाचित भुतं येत असतील आणि त्यांचेच हे उद्याोग असतील. बघ ना आजूबाजूला किती दाट झाडी, जंगल आहे. शिवाय अंधारही. भूत अशाच ठिकाणी राहणार ना की आपल्या झगमगत्या कॉम्प्लेक्समध्ये… बागेत फिरायला येणार? विचार करा.’’ भुताचा विषय निघाल्यावर खरं तर सगळ्यांचीच तंतरली होती. पण बाहेरून मात्र कुणी दाखवत नव्हतं. अखेर टीचरना इथं बोलवायचं ठरलं. त्यांना ३-४ वेळा फोन लावायचा प्रयत्न केला. एकतर रेंज मिळत नव्हती आणि फोनची बॅटरीही जवळपास संपली होती. अखेर त्यांना हाक मारण्यासाठी जय दार उघडायला गेला, पण व्हरांड्यात कुणी असलं तर, या भीतीनं खिडकीतून हाक मारायचं ठरलं. सगळे जण खिडकीच्या काचेतून बघायला लागले. टीचर्सच्या रूमबाहेरच्या फिकट दिव्यात धड काहीच दिसत नव्हतं आणि अचानक खिडकीच्या खाली मोठ्याशा सावलीची हालचाल जाणवली. त्याक्षणी सगळ्यांनी शहारून एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोन मिनिटं सगळ्यांचा स्टॅच्यू झाला. नंतर मात्र जयमधला लीडर हळूहळू भानावर आला. त्याला त्याचे लाडके हिरो शिवाजी महाराज आणि हॅरी पॉटर यांचे कठीण प्रसंगांतले पराक्रम आठवले. धीर एकवटून तो म्हणाला, ‘‘दोस्तो, काही होणार नाही रे. आपल्या टीचर नेहमी सांगतात ना की भूत वगैरे काही नसतं. आपण चौघं काहीतरी आयडिया करू या.’’
‘‘पण भिंतीवर हे भुताचंच काम वाटतंय ना.’’ आयुषने विचारलं.
‘‘माहीत नाही रे पण… माझी आज्जी नेहमी म्हणते की रामाचं नाव ऐकलं की भूत, राक्षस जर कोण असतील तर ते घाबरून पळून जातात. मला थोडी थोडी रामरक्षा पाठ आहे. ज्यांना पाठ आहे त्यांनी म्हणू या. जेवढी येते तेवढी म्हणायची, नंतर सगळे राम राम म्हणत राहू या. चालेल ना?’’ जयने सुचवलं. रामनामाचा जप करता करता हळूहळू सगळ्यांमध्ये जांभयांची चढाओढ सुरू झाली. झोप तर येतेय, पण भुताच्या भीतीने सुचत नव्हतं. झोपल्यावर कुणी आलं तर? इतक्यात जयची नजर समोरच्या तलवारीकडे गेली. आज संध्याकाळी बाजारातून फिरताना मोठ्या हौसेने त्यांनी सोनेरी बेगड लावलेल्या खोट्या तलवारी विकत घेतल्या होत्या. ‘‘आयडिया… आता आपल्याला शत्रूची काहीच भीती नाही. रात्रभर आपण दोन-दोन जणांनी या खोलीत तलवार हातात धरून फेऱ्या मारत पहारा करू या. कारण फिरताना झोप येणार नाही. आधी आर्यन आणि आल्हाद झोपतील. आम्ही पहारा देऊ. दोन तासांनंतर मी आणि आयुष झोपू, तुम्ही पहारा द्या. मस्त आहे ना आयडिया?’’
‘‘अरे पण जय, या तलवारी खोट्या आहेत ना?’’आल्हादचा प्रश्न.
त्यावर ‘‘हो, पण ते भुताला कुठं कळणार आहे?’’ जयचं उत्तर.
अखेर ‘जागते रहो’ चा पुकारा करत जय आणि आयुष हे दोन तलवारधारी शूरवीर खिडकीकडे नजर ठेवत खोलीत फेऱ्या मारायला लागले. इकडे आर्यन आल्हादनी निर्धास्तपणे स्वत:ला पांघरुणात गुरफटून घेतलं. पण सुरुवातीचा ‘जागते रहो’ चा जोश आणि फेऱ्यांचा वेग हळूहळू मंदावत चालला. कारण दिवसभराच्या दगदगीने त्यांनाही झोपेने घेरलं. अखेर तलवारी टाकून तेही दोस्तांच्या शेजारी लवंडले. पाहता पाहता मंद दिव्याच्या प्रकाशात चौकडी डाराडूर झाली.
सकाळी उठवायला आलेल्या टीचर आणि माळीकाकांना जयने भिंतीकडे बोट दाखवून भुताबद्दल विचारलं तेव्हा ते खो खो हसत म्हणाले,‘‘अरे पोरांनो, एवढी वर्षं आम्ही या जंगलात राहतोय. उन्हाळ्यात आम्ही पोराबाळांसकट अंगणात खाटा टाकून झोपतो. पण आजवर आम्ही कुणी भूत पाहिलं नाही आणि तुम्ही बंद खोल्यांत बसून घाबरलात का? गेल्या महिन्यात या खोल्यांना रंगवताना इथं माकड घुसलं. इकडून तिकडे पळताना ओल्या रंगावर त्याच्या नखांचे ओरखडे पडले. ही भुताची नाहीत, माकडाची नखं आहेत. काय रे तुम्ही घाबरट शहरी पोरं? लक्षात ठेवा, जगात भूत वगैरे काही नसतंय. चला पळा आता.’’ चौकडीने सुटकेचा नि:श्वास टाकत चोरट्या नजरेने टीचरकडे बघितलं.
‘‘आता तरी तुमच्या मनातल्या भीतीचं भूत पळालं की नाही? चला आता आपापल्या तलवारी घेऊन स्ट्रॉबेरी फार्ममध्ये युद्ध करायला.’’ टीचर हसत हसत म्हणाल्या.
alaknanda263 @yahoo.com