माझं अक्षर चांगलं नाही, गणित जमत नाही मला, माझा रंगच चांगला नाही, मी हुशार नाही तुझ्यासारखा वगैरे वगैरै खूप कुरकुर असायची रोहनची. हे सगळं सतत ऐकून ऐकून किशोर कंटाळायचा. पण जिवलग मित्राला बोलणार कसं? काही सांगायला जावं आणि भांडण झालं तर? फट् म्हणता ब्रह्महत्या अशी अवस्था व्हायची असे अनेक विचार करून तो गप्प बसायचा. कोणताही छोटा किंवा मोठा प्रसंग असो, रोहनची ही कुरकुर कायमचीच. स्वत:ला नावं ठेवायची, स्वत:ला कमी लेखायची सवयच होती त्याला. याउलट त्यांच्या वर्गातला गौरव- त्याला काही येत नाही, जमत नाही असं मान्यच नसायचं. किशोरला समजायचं की दोघंही त्यांच्या या स्वभावामुळे प्रगती करू शकत नाहीयेत, पण तो काहीच करू शकत नव्हता.
गणपतीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली आणि दोन दिवसांतच रोहनमधील फरक किशोरला जाणवला. स्वत:ला सतत नावं ठेवणारा रोहन आता बदलला होता. तो म्हणायचा, माझं अक्षर तितकं ठीक नाही, पण मी चित्र चांगलं काढतो. माझा रंग कसाही असेना मी स्वच्छ आणि नीटनेटका राहतो. मला मित्र जोडायला खूप आवडतं. असं अनेकदा ऐकल्यावर किशोरला आश्चर्य वाटून त्यानं विचारलं, ‘‘रोहन, एवढा कसा बदललास तू.’’ त्यावर रोहन म्हणाला, ‘‘आजी द ग्रेट!’’ माझी मलाच नावं ठेवायची सवय तिच्या लक्षात आली आणि आमच्याकडे गणेशमूर्ती आणल्यावर तिने त्याचे मोठे कान, मिचमिचे डोळे, लांब नाक, लोंबणारं पोट यांबद्दल विचारत म्हटलं, ‘‘गणपती आले की हे सगळं लक्षात येत नाही आपल्या, तर लक्षात येतो आनंद, त्यांना आवडणारे मोदक, त्यांचं नेतृत्व, त्यांचं शौर्य! पण गणपतीला त्याचाही गर्व नाही त्यामुळेच ते सुखकर्ता आहेत. आपणही तसंच करायचं. बदलू न शकणाऱ्या कमतरतांबाबत दु:ख न करत बसता, आपल्यातल्या सद्गुणांवर लक्ष केंद्रित करायचं. पण… पण… कमतरता अमान्य करायच्या नाहीत तर आपणही सुखकर्ता ठरतो.’’
‘‘खरंच की रे आजीचं. झालास की तू तुझा सुखकर्ता. चल, हे सगळं गौरवला सांगून पाहू या.’’ असं म्हणत ते दोघे गौरवकडे वळले.
joshimeghana.23@gmail.com