चंद्रकांत घाटाळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘आजोबा, आम्हाला गोष्ट सांगा ना?’’ सुट्टीत गावी आलेल्या मिनू आणि साहिलने आजोबांकडे हट्ट धरला.
‘‘ठीक आहे. तर मुलांनो, मी तुम्हाला आकाशातील सात ताऱ्यांची गोष्ट सांगतो. चालेल ना?’’
‘‘आजोबा, त्या सप्तर्षी ताऱ्यांची गोष्ट आम्हाला शाळेत भूगोलाच्या सरांनी दोन वेळा सांगितली आहे. त्यातील दोन ताऱ्यांतून एक सरळ रेषा काढली की ध्रुवतारा सापडतो. ती नको.’’ मिनू काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाली.
‘‘अरे, दोन वेळा ऐकली ना! मग परत एकदा सांगतो.’’ आजोबांच्या वाक्यावर मिनू हिरमुसली, पण त्याकडे दुर्लक्ष करत आजोबांनी गोष्टीला सुरुवात केली.
‘‘मुलांनो, त्या सात ताऱ्यांच्या गोष्टींचं नाव आहे ‘मुरीकाबुशी’.’’
‘‘मुरीकाबुशी?’’ मिनू आणि साहिलनं एकसुरात विचारलं.
‘‘होय, मुरीकाबुशी.’’
‘‘आजोबा, असं कसं नाव ?’’ मिनूनं आश्चर्यानं विचारलं.
‘‘ अरे, हे नाव आहे त्या नक्षत्राचं- ज्यात सात तारे होते असं मानतात.’’
‘‘आजोबा, सात तारे होते म्हणजे? आत्ता नाहीत?’’ साहिल विचारातच पडला.
‘‘नाही, आता फक्त सहा तारे आहेत.’’
‘‘आजोबा, असं कसं? शाळेत तर आम्हाला सात तारे आहेत असं सांगितलंय. मला तर त्यांची नावंदेखील माहिती आहेत. क्रतु, पुलह, पुलस्य, अत्री, अंगिरा, वशिष्ठ आणि मरिची.’’ मिनूनं एका दमात सगळी नावं सांगितली.
‘‘अरे वा!… शाब्बास मिनू! पण मी गोष्ट सांगतोय ती तू सांगितलेल्या सात ऋषींची नाही.’’
‘‘मग?’’ मिनूनं आश्चर्यानं विचारलं.
‘‘ मी जी गोष्ट सांगतोय ती त्यांच्या पत्नींची आहे.’’
आजोबांच्या या वाक्यावर मिनू आणि साहिल आश्चर्यचकित झाले. काही वेळ दोघांचीही बोलती बंद झाली. कारण आकाशातील सात तारे म्हणजे ‘सप्तर्षी’ इतकंच त्यांना माहीत होतं.
‘‘मुलांनो, ज्या नक्षत्रात हे तारे आहेत त्या नक्षत्राचं नाव कृत्तिका असं आहे आणि त्यांत जे तारे आहेत त्यांची नावं अंबा, दुला, नितत्नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती आणि चुपुणिका अशी आहेत. पुराणकथानुसार यांना सप्त ऋषींच्या पत्नी आहेत असं मानलं जातं. यांना सप्तमाता असंही म्हणतात. या सात मातांनी वाढवलेला मुलगा म्हणजेच कार्तिकेय अशी कथा आहे. या नक्षत्राच्या जशा भारतीय पुराणात कथा आहेत तशा इतर देशातील पुराणातही वेगवेळ्या कथा आहेत.
‘‘आजोबा, सांगा त्या कथा.’’ साहिल कान टवकारत म्हणाला.
‘‘तर मुलांनो, एका ग्रीक कथेप्रमाणे ‘ओरायन’ नावाच्या पारध्याला घाबरून या सातही बहिणी पळाल्या. मग त्यांची कबुतरे तयार झाली आणि ती आकाशात उडाली, तीच आपल्याला कृत्तिकेच्या रूपानं दिसत आहेत. तर पॉलिनेशिअन दंतकथेप्रमाणे ‘ताने’ नावाच्या एका देवानं एक अतिशय तेजस्वी अशी तारका गर्विष्ठपणाने मोडून सात भागांत विखरून टाकली. त्याच या कृत्तिका आहेत.
उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर या नक्षत्रात सहा तारका दिसतात आणि दुर्बिणीतून पाहिलं तर ताऱ्यांचा खच पडलेला दिसतो. कृत्तिकेतील प्रत्येक तारकेला स्वत:ची अशी गती आहे, त्यामुळे काही काळापूर्वी दिसणाऱ्या सात ताऱ्यांपैकी एक तारका म्हणजे चुपुणिका, ही बहुतेक दूर गेल्यामुळे अंधूक होऊन दिसेनाशी झाली असावी, असं मानतात.
कृत्तिका हा खुला तारकागुच्छ आहे. तो आपल्यापासून अंदाजे ४४४ प्रकाशवर्ष दूर आहे. हे अंतर म्हणजे सरासरी अंतर आहे. कारण या नक्षत्रात अनेक तारे आहेत आणि साहजिकच ते कमी-जास्त अंतरावर असतील. तारकासमूह किंवा दीर्घिका यांची मोजणी करण्यासाठी मेस्सीये क्रमांक दिलेले आहेत. त्यात या तारकासमूहाचा ४५ क्रमांक लागतो, म्हणून इंग्रजीमध्ये याला M45 असे म्हणतात.
‘‘आजोबा, पण ते मुरीकाबुशी म्हणजे?’’ आजोबांना थांबवत मध्येच मिनूनं विचारलं.
‘‘मिनू, जपानमध्ये येयामा नावाचं बेट आहे. त्या बेटावरील ओकिनावा लोकांच्या लोककथेप्रमाणे ‘मुरीकाबुशी’ म्हणजे कृत्तिका नक्षत्र आणि या नक्षत्राच्या आकाशातील स्थानावरून तिथले शेतकरी शेतीच्या कामाचे नियोजन करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतातून भरपूर पीक मिळतं. म्हणून आजही इथले शेतकरी मुरीकाबुशीच्या स्तुतीपर ‘मुरीकाबुशी युन्ता’ असं लोकगीत गातात.
आजोबांनी सांगितलेली ही नवीन माहिती ऐकून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
anujasevasanstha3710 @gmail.com