स्नेहल बाकरे
साक्षी आई-बाबांसोबत घरातलं काही सामान आणायला सुपर मार्केटमध्ये गेली होती. आई-बाबा यादीनुसार एकेक सामान घेत होते. तेवढ्यात साक्षी आजूबाजूच्या रॅकमधून तिच्यासाठी एक सुंदर फुलपाखरांचं चित्र असलेली पाण्याची बाटली, त्याला साजेसा एक छोटासा डब्बा आणि डब्यासाठी दोन-तीन प्रकारचा खाऊ असं सगळं घेऊन आली. त्या वस्तू पाहून आई म्हणाली, ‘‘अगं साक्षी, ही बाटली कशाला घेतलीस? दोन आठवड्यांपूर्वीच तू एक नवीन पाण्याची बाटली घेतली होतीस ना. आधीच घरात शाळेसाठी एक आणि बास्केटबॉलसाठी एक अशा दोन पाण्याच्या बाटल्या आहेत. त्यात आता ही तिसरी कशाला हवी आहे तुला?’’

‘‘आई, ही बाटली मी शाळेत घेऊन जाणार आहे. माझ्या वर्गातल्या एका मैत्रिणीकडेही सेम अशीच बाटली आहे. मलाही केव्हापासून असं फुलपाखरांचं चित्र असणारी बाटली हवी होती. आता ती मिळाली आहे तर राहू दे ना! यावर ऑफरही आहे. ४०० रुपयांची बाटली फक्त २०० रुपयांना मिळतेय. म्हणजे आपला फायदाच होतोय ना.’’ साक्षी नुकतंच गणिताच्या बाईंनी शिकवलेल्या नफा व तोटा याचं प्रत्यक्ष उदाहरण आईला समजावून सांगत होती.
‘‘ऑफर असू देत. पण मला सांग, तुला याची खरंच गरज आहे का? उगाचंच दुसऱ्याचं पाहून गरज नसताना एखादी वस्तू खरेदी करणं हे बरोबर नाही.’’ – इति आई.

हेही वाचा : प्रचारक… संघाचा कणा!

बाबाही आईला दुजोरा देत, ‘‘साक्षी, आई जे सांगतेय ते अगदी बरोबर आहे. तुझी आधीची बाटली अजून चांगली आहे ना. ती खराब झाली की आपण नक्की नवीन घेऊयात.’’
साक्षी जरा नाराजीच्या स्वरात, ‘‘बरं ठीक आहे बाबा, पण मग हा डब्बा आणि हा खाऊ घ्यायचाच हं. बघा ना किती छान डब्बा आहे. हे बटन दाबलं की तो उघडतो आणि या छोटासा चमचाही दिलाय त्यात. रंगही किती छान आहे. आता हा तर घ्यायचाच… मी बाटली कॅन्सल केली ना.’’
साक्षीचं हे नेहमीचंच झालं होतं की कुठेही बाहेर गेलं की काही ना काही तरी मागायचीच आणि दिलं नाही तर नाराज होऊन रुसून बसायची. आईनं तिला पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला. ‘‘साक्षी, आपण गेल्या महिन्यात तुझ्या आवडीचाच एक डब्बा घेतला होता. मग लगेचच कशाला नवीन डब्बा घ्यायचा?’’
‘‘आई, तू नेहमी असं का करतेस ग. मी काही मागितलं की लगेच नाही का म्हणतेस? एक छोटासा डब्बा तरी घेऊ दे ना. बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला.’’ साक्षीची कुरकुर सुरूच होती.
बाबांना आईची काळजी समजली. वेळ निभावून नेण्यासाठी त्यांनी तिला तो डब्बा घेऊन दिला आणि घरी गेल्यावर साक्षीच्या अशा वागण्यावर काहीतरी उपाय शोधून काढूयात असं आईला समजावलं.
हवं ते मिळाल्यानं साक्षी भलतीच खूश झाली होती. घरी आल्यावर बाबांनी कपाटातून आधीची काही बिलं काढली आणि साक्षीला विचारलं, ‘‘साक्षी, तुला शाळेत नफा व तोटा शिकवला आहे ना गं?’’
साक्षी अगदी जोरात ‘हो’ म्हणाली.

‘‘बरं, मग मी एक हिशेब सांगतो तो लिहून घे आणि मला सांग आपल्याला नफा झाला की तोटा.’’
साक्षी अगदी उत्साहात वही पेन घेऊन आली आणि म्हणाली, ‘‘सांगा बाबा.’’
बाबांनी गेल्या महिन्याभरात साक्षीनं खरेदी केलेल्या वस्तू व त्यांची किंमत सांगितली. साक्षीनंही पटापट सगळं लिहून घेतलं. तोपर्यंत आईनं त्या सर्व वस्तू गोळा करून बाजूच्या टेबलवर मांडल्या.
‘‘आता या सगळ्याची बेरीज करून सांग बरं किती खर्च झाला ते!’’ साक्षीनं अचूकपणे बेरीज केली आणि बाबांना सांगितली.
बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या वस्तूंकडे बोट दाखवत बाबा म्हणाले, ‘‘साक्षी, या गेल्या महिन्याभरात तू खरेदी केलेल्या वस्तू आहेत. सध्या तू यातल्या कोणकोणत्या वस्तू वापरतेस आणि कोणकोणत्या नाही ते सांग पाहू.’’
साक्षीनं सर्व वस्तूंकडे बारकाईनं नजर फिरवली आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या केल्या.
‘‘आता यातल्या वस्तूंची किंमत मी तुला सांगतो त्यांची नीट बेरीज कर आणि मगाशी काढलेल्या सर्व वस्तूंच्या किमतीतून ती वजा कर. ’’
साक्षी गणितात हुशार असल्यानं तिनं अगदी पटापट अचूक हिशेब करून बाबांना सांगितला.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : तिसरा डोळा…

बाबांनी सगळा हिशेब नीट तपासला आणि साक्षीला नीट समजावून सांगितला. ‘‘हे बघ, गेल्या महिन्याभरात आणलेल्या वस्तूंची किंमत होती १२५० रुपये त्यातल्या फक्त तू ७५० रुपयांच्या वस्तू सध्या वापरत आहेस. उरलेल्या ५०० रुपयांच्या वस्तू या घरात अशाच पडलेल्या आहेत. आता नीट विचार कर आणि तूच सांग पाहू हा आपला नफा आहे की तोटा?’’
आता मात्र साक्षीचा उत्साह पूर्णपणे ओसरला. हळू आवाजात ती ‘तोटा’ असं म्हणाली.

‘‘म्हणजे गरज नसताना वस्तूंची खरेदी करणं हा एक प्रकारचा तोटाच आहे की नाही. आपल्याला तोटा होणारी सवय ही आपणच बदलायला हवी ना.’’
साक्षीला बाबांचं म्हणणं पटतं आणि आपल्या चुकीची जाणीवदेखील झाली. तिनं आई-बाबांना ‘मी पुन्हा असं कधीही करणार नाही. उगाचंच गरज नसताना वस्तूंची खरेदी करून आपला तोटा करणार नाही,’ असं वचन दिलं.

bakresnehal@gmail.com