राजश्री राजवाडे काळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता मात्र आर्याला अतिशय बोअर झालं होतं, कारण एकतर या लग्नात तिच्या बरोबरीचं कुणीही नव्हतं आणि त्यातच आईनं फोनही दिला नव्हता. आई आणि तिची दूरदूरची भावंडं सेल्फी काढत बसली होती. आर्याकडे फोन असता ना तर उलट आर्याला, ‘चल निघायचंय आता’ असं सांगायची वेळ आली असती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या होता मराठीचा पेपर! कोणत्याच विषयाचं यायचं नाही इतकं टेंशन मराठीच्या पेपरचं यायचं. तरी ती आई-बाबांना सांगत होती की मी एकटी राहीन घरी. मी आता मोठी झालेय. पण छे! दहा वर्षांच्या आर्याला घरी ठेवून ते एकदम पुण्याला लग्नाला जाणं शक्यच नव्हतं आणि लग्न म्हटलं तर जवळच्याच नातेवाईकांचं होतं. मग काय दुसऱ्या दिवशी मराठीचा पेपर असूनही आर्या मस्तपैकी सजून नटून पुण्याला आली होती. ‘दुसऱ्या दिवशी मराठीचा पेपर असूनही मी पुण्याला जाणार आहे,’ असं बोलून मैत्रिणींमध्ये भावही खाऊन झाला होता. पण आता मात्र रडायची वेळ आली होती. तीन वाजले तरी कुणी निघायचं नाव काढेना. नातेवाईकांमध्ये रमलेले आई-बाबा आर्या, तिची परीक्षा हे सगळं विसरलेच होते जणू.

इतक्यात मावशी म्हणालीच, ‘‘आम्ही निघतो. हायवेवर ट्रॅफिक लागलं तर उशीर होईल.’’ मावशीचं हे बोलणं ऐकून आर्या लगेच मावशीजवळ जाऊन म्हणाली, ‘‘मीपण जाते ना मावशीच्या गाडीतून, उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचाय. मावशी मला घरी सोडेल, शेजारच्या काकूंकडे चावी आहे, तुम्ही येईपर्यंत एकटी राहीन मी.’’ आर्याचं बोलणं सगळ्यांना पटलं.

‘‘पुस्तक घेतलं आहेस का? गाडीत वाचता येईल.’’ गणिताची शिक्षिका असलेल्या मावशीनं विचारलं.

‘‘नाही, मला मराठीचा अभ्यास करायला शांतता लागते, नाही तर चिडचिड होते माझी.’’ आर्या जरा वैतागून म्हणाली. खरं तर आईनं पुस्तक घ्यायला सांगितलं होतं, पण गाडीत मराठीचा अभ्यास! आर्याला ही कल्पनाच नको वाटत होती. आर्याच्या बोलण्यावरून मावशीनं ओळखलंच की मराठीचं आणि आर्याचं बिनसलेलं आहे.

मावशी, काका आणि आर्याचा मावस भाऊ तन्मय यांच्या बरोबर आर्या गाडीत बसली आणि गाडी सुरू झाली. कॉलेजमध्ये असलेला तन्मय फोनमय झाला होता. ते सगळे गाडीत बसले खरे, पण गाडी पुण्यातून बाहेर पडायलाच तयार नव्हती, कारण ट्रॅफिक जाम! आर्याला वाटलं, आईच्या गाडीत बसले असते तर फोन तरी मिळाला असता. मावशी म्हणाली, ‘‘जरा बाहेर बघ म्हणजे कंटाळा येणार नाही.’’

‘‘तू सेम आईसारखंच बोलत्येस की बाहेर बघ जरा. काय असतं बाहेर बघण्यासारखं? नुसती दुकानं, गर्दी, बस.’’ आर्या असं म्हणाली खरं, पण आज आईचा फोन हातात नव्हता म्हणून खिडकीच्या बाहेर ट्रॅफिककडेच बघत होती.

मावशी बाहेरचं एक दुकान बघून म्हणाली, ‘‘आपण इथून पार्सल घेऊन जायचं का? आर्या वाच बरं काय काय लिहिलंय त्या दुकानाच्या बाहेरच्या फळ्यावर.’’

‘‘ते सगळं तर मराठीत लिहिलंय.’’ आर्या असं म्हणाली खरं, तरी तिनं वाचायला सुरुवात केली.

‘‘येथे गरम पॅटिस मिळतील.’’ अशा पाटीपासून ते सुरळीच्या वड्या, उकडीचे मोदक, पोह्याचे पापड अशा अनेक पदार्थांची नावं होती. मग मावशीनं दुकानाचं नाव वाचायला सांगितलं.

‘स्वाद फूड्स!’ हे नाव वाचल्यावर मग अशा दुकानांची नावं अजून काय ठेवता येतील, रुचिरा, रसना, मग त्या नावांचे अर्थ, इत्यादी… सगळं मावशीनं सांगितलं. या एका दुकानावरून चर्चा पुस्तकांच्या दुकानापर्यंत रंगली. आर्यालासुद्धा मज्जा येत होती. गाडी अजून थोडी पुढे सरकली आणि पुन्हा ट्रॅफिकमुळे थांबली. मावशीनं पुढच्या दुकानाच्या बाहेर लिहिलेला बोर्ड वाचायला सांगितला. आर्यानं तो वाचला. त्यावर लिहिलं होतं, ‘येथे हलव्याचे दागिने मिळतील.’ आर्याला तर अर्थच कळेना. मग मावशीनं संक्रांत, हलव्याचे दागिने याबद्दल महिती दिली. मावशीनं तिला गूगलवर हलव्याचे दागिने घातलेल्या बाईचा फोटोसुद्धा दाखवला. मग गाडी इतर सणांवर घसरली. आर्या म्हणाली, ‘‘उद्या लेखनकौशल्य विभागात सणाबद्दल लिहावं लागलं तर मी संक्रांतीबद्दल लिहीन. पतंग उडवतात माहीत होतं, पण आता हलव्याच्या दागिन्यांचा अजून एक पॉइंट मिळाला.’’ मावशी तिला दुरुस्त करत म्हणाली, ‘‘ मुद्दा!’’

सगळे हसू लागले. ट्रॅफिक कमी झालं आणि गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली. आता आर्या स्वत:हून दुकानांच्या पाट्या वाचत होती. सिग्नलला गाडी थांबली तर तिकडे एक मोठ्ठी कमान होती आणि लिहिलं होतं, ‘अंध मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन’. प्रदर्शनात काय काय वस्तू असतील यावर निबंध आला तर काय काय लिहिता येईल, मग अंध मुलाचे आत्मवृत्त, मग त्यावरून इतर विषयांचे निबंध, ही सगळी चर्चा होईपर्यंत गाडी हायवेला लागली आणि आर्याला झोप येऊ लागली. तिला जाग आली तेव्हा गाडी चक्क तिच्या बिल्डिंगसमोर येऊन थांबली होती.

‘‘छान झोप झाली ना, चला आता उद्याच्या पेपरची तयारी करायची आहे ना.’’ मावशी तिला उठवत म्हणत होती.

इतक्यात मागच्या गाडीतून आई-बाबासुद्धा आलेच. ‘‘तुम्ही निघाल्यावर पंधरा मिनिटांनी आम्हीही निघालोच. चला आर्या, आता मीच वाचून दाखवते धडे पटापट.’’ आई म्हणाली.

आर्या गाडीतून उडी मारत म्हणाली, ‘‘ आई, जाहिरात लेखन, निबंध, आत्मवृत्त याची तयारी केली आम्ही येताना.’’

‘‘कसं काय? पुस्तक तर घेतलंच नव्हतंस ना तू.’’

‘‘या सगळ्यासाठी पुस्तक कशाला हवंय? फोनमधून जरा डोळे बाहेर काढून आजूबाजूला बघितलं तरी लेखनकौशल्य या विभागाची तयारी होते.’’ मावशीचं हे बोलणं ऐकून आर्या खोटं रुसत म्हणाली, ‘‘आता तू सेम आईसारखं बोलतेयस.’’

मावशीने गाडीत झालेल्या सगळ्या चर्चा, गप्पा सांगितल्यावर आई म्हणाली, ‘‘मी रोज शाळेतून सोडता-आणताना कानीकपाळी ओरडत असते की डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघ, तेव्हा बाईसाहेबांना फोनवर गेम खेळत ‘जरा रिलॅक्स’ व्हायचं असतं, आता लक्षात आलं ते पेपरच्या आदल्या दिवशी, समजलं ना?’’

‘‘वार्षिक परीक्षा आहे की अजून. आणि हो, हे काही मराठीच्या पेपरसाठी नाही फक्त. तर गाडीत बसल्यावर, कोणत्या रांगेत उभं असताना, डॉक्टरांकडे आपला नंबर यायची वाट बघत असताना, कुठेही, फक्त फोनमध्ये न बघता जरा आजूबाजूला बघून जे निरीक्षण केलं जातं ना त्याचा उपयोग कुठे ना कुठे तरी होतोच.’’

आता मात्र मावशीपण आईसारखी लेक्चरमोडमध्ये जातेय हे समजल्यावर आर्या, ‘‘ हो हो’’ म्हणत घरात पळाली.

shriyakale1@gmail.com