प्राची मोकाशी
रविवारची निवांत सकाळ. साधारण अकराची वेळ. जयदीप लायब्ररीमधून गोष्टीची पुस्तकं घेऊन घरी आला; तेव्हा सोसायटीतली तीन-चार माणसं त्याच्या बाबांशी बोलत हॉलमध्ये बसली होती. बाबा सोसायटीचे अध्यक्ष होते. सगळ्यांचा सूर जरा सिरियस होता.
हातपाय धुऊन, कपडे बदलून जयदीप स्वयंपाकघरात आईजवळ गेला. हॉल स्वयंपाकघराला लागूनच असल्यामुळे बाहेरचं बोलणं अगदी व्यवस्थित ऐकू येत होतं.
‘‘काणे, गेल्या आठ दिवसांतली ही तिसरी चोरी! देसाईंच्या गाडीमधला स्टीरिओ गेला. कारखानीसांच्या मुलाची सायकल चोरीला गेली. आणि आता हे!’’ सोसायटीचे सचिव म्हणाले.
‘‘सी.सी.टी.व्ही पण बंद आहे गेले पंधरा दिवस. त्यामुळे काही फुटेजही मिळणं कठीण! आपण सगळ्यांचीच चौकशी करूया मग.’’ काणे- म्हणजे जयदीपचे बाबा कपाळ हलकं खाजवत म्हणाले.
‘‘काणे, पोलीस..’’ एकाची शंका.
‘‘नको इतक्यात. आधी आपण तपास करूया..’’
सगळी मंडळी गेल्यावर आई आणि जयदीप हॉलमध्ये आले.
‘‘बाबा, काय झालंय?’’
‘‘सोसायटीच्या ऑफिसमधला पिट्रर चोरीला गेलाय.’’
‘‘पिट्रर? हे म्हणजे सिंहाच्याच गुहेत हात घातल्यासारखंच झालं!’’
‘‘अजबच आहे! पण पिट्रर नेला कसा चोराने?’’ आईचा स्वाभाविक प्रश्न. जयदीपला बाबांच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसलं. त्याने या सगळ्या चोरी प्रकरणाचा छडा लावायचं ठरवलं. तसंही त्याला फास्टर फेणे, फेमस फाइव्ह, हार्डी बॉइज् अशा रहस्यकथा वाचायची आवड होतीच! त्यामुळे चोरीचा छडा लावण्याची ही आयती संधी जयदीप सोडणार नव्हता..
सोसायटीच्या ऑफिसबाहेर बोलावलेल्या सगळ्यांची चौकशी सुरू होती- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, माळी सगळेच. जयदीपला घराच्या गॅलरीमधून सगळं दिसत होतं. अभ्यासाच्या पुस्तकाआडून तो सर्वाना निरखून पाहत होता. बरेच र्वष तिथेच काम करणारी सगळी जुनी माणसं होती, त्यामुळे कुणावर लगेच आळ घेणं कठीणच होतं. फक्त त्यांच्यापकी झाडूवाला ‘दिनू’ गेल्या महिन्यापासूनच कामावर येत होता. त्याचे चौकशी करतानाचे हावभाव जयदीपला काहीसे खटकले. त्याने दिनूवर पाळत ठेवायचं ठरवलं.
जयदीपने त्याच्या मित्राला- अथर्वला, त्याच्या बिल्डिंगपाशी जाऊन जोरजोरात हाका दिल्या. तोही घाईघाईने खाली आला. सोसायटीमध्ये घडलेले चोरीचे प्रकार त्याला माहिती होतेच. जयदीपने चोरीचा छडा लावण्याचा विचार अथर्वला ऐकवला. ‘डिटेक्टिव्ह’गिरी करायला मिळतेय म्हटल्यावर तोही उत्साहात आला. पण सध्या काही घरच्यांना सांगायचं नाही असं ठरलं. दोघे आपापल्या घरी गेले, जेवणानंतर भेटण्याचं ठरवून.
दुपारी ऑफिसजवळच्या बिल्डिंगच्या लॉबीमध्ये दोघे क्रिकेट खेळण्याचं नाटक करत दिनूवर पाळत ठेवून होते. दोन-तीन वेळा त्यांनी आळीपाळीने सोसायटीतच त्याचा लपतछपत पाठलागही केला, पण शंका घेता येईल असं काहीच घडलं नाही. शेवटी बोअर होऊन ते आपापल्या घरी निघून गेले..
संध्याकाळी बाल्कनीमध्ये उभा असताना मात्र जयदीपला दिनू सोसायटीच्या बाहेर जाताना दिसला. आईला खेळायला जाण्याचं कारण सांगून तो लगबगीने दिनूच्या पाठीमागे गेला.
तीन-चार गल्ल्या सोडून, दिनू एका अरुंद गल्लीत शिरला. तिथल्या एका कम्प्युटर रिपेरिंगवाल्याच्या दुकानासमोर तो थांबला. रिपेरिंगवाल्याने त्याला काही पसे दिले. दिनूने ते मोजून खिशात ठेवले आणि तो पुन्हा सोसायटीच्या दिशेने वळला. जयदीप थोडय़ा अंतरावर लपून हे सगळं पाहत होता. दिनू गेल्यानंतर जयदीप लगेच त्या दुकानावर गेला.
‘‘काका, त्या निळ्या शर्टवाल्याला तुम्ही कशाचे पसे दिलेत?’’ जयदीपचा प्रश्न ऐकून रिपेिरगवाला जरा आश्चर्यचकित झाला.
‘‘सकाळी पिट्रर विकायला आला होता. मी नव्हतो दुकानावर म्हणून इथल्या पोराने घेतला. आत्ता पसे घ्यायला आला होता.’’ रिपेरिंगवाल्याने सांगितलं.
‘‘पिट्रर दाखवता जरा?’’
‘‘का रे, बाबा?’’
‘‘तो पिट्रर बहुतेक आमच्या सोसायटीच्या ऑफिसमधून चोरलाय त्याने!’’
‘‘अरे देवा!’’ असं म्हणत रिपेरिंगवाला पिट्रर घेऊन आला.
‘‘हाच! तुम्ही त्याला किती पसे दिलेत?’’
‘‘दोन हजार. दोन दिवसांपूर्वी याने एक भारीतला स्टीरिओपण विकला मला एक हजारला. दाखवू?’’
‘‘आत्ता नको! त्याला पकडण्यासाठी तुम्ही आमची मदत कराल?’’
‘‘नक्की! मी पण कधी बेइमानीचा धंदा नाही केला.’’ जयदीपने रिपेरिंगवाल्याचा नंबर हातावर लिहून घेतला आणि दुकानातल्या फोनवरूनच अथर्वच्या घरी फोन करून केसच्या ताज्या घडामोडी थोडक्यात सांगितल्या.
सोसायटीमध्ये शिरताना जयदीपला नेमका गेटपाशीच अथर्व भेटला.
‘‘काही अपडेट?’’ जयदीपने दम खात विचारलं.
‘‘दिनू थोडय़ा वेळापूर्वीच बाहेरून आलाय. आत्ता ऑफिसमध्ये गेलाय. काय झालंय?’’ अथर्व म्हणाला.
‘‘सांगतो सगळं. पण त्याला आता पकडलंच पाहिजे. तू दिनूला ताब्यात घे, मी बाबांना बोलावतो.’’ जयदीपने घराकडे धाव घेतली आणि अथर्वने ऑफिसच्या दिशेने..
पंधरा-वीस मिनिटांतच सोसायटीच्या कमिटीचे सगळे ऑफिसच्या बाहेर जमले होते. वॉचमनकाकांनी आणि अथर्वने मिळून दिनूला धरलं होतं. तो सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत होता. एव्हाना जयदीप आणि त्याचे बाबा आले. ‘‘दिनू, तू चोऱ्या करत होतास तर!’’ जयदीपचे बाबा चिडून म्हणाले.
‘‘साहेब, मी नाही केली चोरी!’’ दिनू त्याची बाजू सावरत म्हणाला.
‘‘सगळे चोर असंच म्हणतात. बाबा, मी सांगतो काय घडलंय ते! आम्ही ‘इन्व्हेस्टिगेट’ केलंय. प्लीज, बाबा!’’ बाबांनी जयदीपला बोलायची परवानगी दिली.
‘‘दिनूने पिट्रर कचरा नेण्याच्या निळ्या ड्रममधून सोसायटीबाहेर नेला. आज सकाळी त्याच्या नेहमीच्या ऑफिसची साफसफाई करण्याच्या वेळी. तेव्हा फारसं कुणी नसतं इथे.’’
‘‘दिनू, तू तर नाइट शिफ्टला होतास ना या आठवडय़ात?’’ सोसायटीच्या सेक्रेटरींचा प्रश्न.’’
‘‘तेच तर साहेब!’’
‘‘साहेब, काल नाइटला मी होतो. त्याची डय़ुटी संपली परवाला.’’ वॉचमनकाका म्हणाले.
‘‘..कचऱ्याचा ड्रम ऑफिसबाहेर ठेवल्याचं निशाण आहे अजून, त्या पायरीवर! ड्रमला बाहेरच्या बाजूने लागलेली माती पडलीये तिथे! एरव्ही ड्रम इथे येण्याचं काहीच कारण नाही. ते नेहमी पलीकडे गेटपाशीच ठेवलेले असतात.’’ जयदीप निशाणाकडे बोट दाखवत म्हणाला.
‘‘म्हणून मी चोरलाय थोडीच! तुम्ही आधी गरिबावरच आळ घेणार!’’ दिनू बचावाच्या स्वरात म्हणाला.
‘‘मला ड्रममध्ये दिनूची तांब्याची अंगठी सापडलीये.’’ जयदीपने त्याच्या खिशातून अंगठी काढून दाखवली.
‘‘ही माझी अंगठी नाहीये.’’
‘‘मग तू आत्ता गवतांत काय शोधत होतास?’’ अथर्वचा प्रश्न.
‘‘दिनू, तुझ्या डाव्या हाताच्या करंगळीवर तू नेहमी अंगठी घालत असल्याची खूण आहे. आणि तू कुठल्याशा बाबाची अंगठी घालतोस हे इथे बऱ्याच जणांना माहितीये.’’ यावर दिनू काहीच म्हणू शकला नाही.
‘‘जयदीप, तुला हे कधी कळलं?’’ अथर्वने आश्चर्यचकित होऊन विचारलं.
‘‘आपण त्याचा दुपारी पाठलाग करत असताना मी ड्रम तपासले.’’
‘‘आणि स्टीरिओ?’’
‘‘देसाईकाकांची गाडी जुनी आहे. त्यामुळे कुणी ‘टेंपिरग’ करताना दरवाजाचा अलार्म वाजायची सिस्टम कारला नाहीये. अथर्व, तुला आठवतंय दिनू एकदा आपल्याला म्हणाला होता की तो काही दिवस एका गाडी मेकॅनिकच्या हाताखाली कामाला होता? मी दोन्ही गोष्टी ‘िलक’ केल्या.’’ जयदीपचा फोन गेल्यामुळे रिपेरिंगवालाही एव्हाना तिथे पोहोचला होता. त्याला पाहून दिनू थबकलाच. रिपेिरगवाल्याने दोन्ही वस्तू दिनूकडून विकत घेतल्याचं कन्फर्म केलं.
‘‘ए-वन! आणि सायकल?’’ अथर्वचा पुन्हा प्रश्न.
‘‘सायकल अजून दिनूच्या खोलीवर आहे. आत्ता इथे येण्यापूर्वी मी गेलो होतो तिथे. ती कशी नेली ते दिनूच सांगेल आपल्याला!’’
‘‘दिनू, सगळं कबूल कर, नाहीतर पोलिसांत देऊ तुला!’’ सेक्रेटरी जरा ओरडून म्हणाले. आता दिनूकडे पर्यायच नव्हता.
‘‘मीच केली चोरी. गेल्या शुक्रवारी वॉचमनकाका आठवडय़ाची रजा घेऊन गावी गेले. सेक्रेटरींनी त्यांच्या जागी मला थांबायला सांगितलं. रान मोकळं होतं. एका रात्री उचलली सायकल. एकदा स्टीरिओ चोरला. मला विचारलं गेलं, पण सुदैवाने शंका कुणीच घेतली नाही. त्यात सी.सी.टी.व्ही. बंद होते हे माहीत होतं. आठवडा झाला तरी काही हालचाल नाही म्हटल्यावर आज पिट्रर उचलला. पण या जयदीपने..’’ दिनूने एकदाची कबुली दिली.
‘‘चोऱ्या मुळात केल्यासच का?’’ देसाईकाकांनी पोटतिडिकीने विचारलं.
‘‘स्मार्ट फोन मिळत होता, सेकंड-हँड. थोडे पसे कमी पडत होते. बरीच उधारीपण झाली होती.’’ दिनू मान खाली घालत म्हणाला.
‘‘परमेश्वरा! या गॅजेट्सनी डोकं फिरवलंय भल्याभल्यांचं! तू शहरात शिकतोयस म्हणून गावी तुझी आई खस्ता खातेय! त्यांच्या गावचा म्हणून देसाईंनी तुला ही नोकरी दिली तर तू त्यांच्याच घरात चोरी केलीस?’’ जयदीपचे बाबा हताशपणे म्हणाले.
‘‘एकदा माफ करा, साहेब. पुन्हा असं नाही होणार. मला पोलिसांत देऊ नका..’’ दिनू विनवण्या करू लागला.
‘‘..ठीक आहे. तुझ्या भविष्याचा विचार करून सोडतोय तुला या वेळी. पण ती सायकल, स्टीरिओ आणि पिट्रर ज्याचे-त्याला परत द्यायचे. सगळ्यांचे पसे परत करायचे. कबूल आहे?’’ बऱ्याच विचारांती सर्वानुमते झालेला निर्णय जयदीपच्या बाबांनी सांगितला. दिनूने त्यांचे पाय धरले, सगळ्यांची माफी मागितली..
‘‘जयदीप, छान कामगिरी बाजावलीस!’’ सगळं प्रकरण मिटल्यावर देसाईकाकांनी जयदीपची पाठ थोपटली.
‘‘थँक यू, काका. मला अथर्वनेपण खूप मदत केली.’’ पण जयदीपचे बाबा काहीच म्हणाले नाहीत. घरात कुणालाही न सांगता त्याने असा पराक्रम केल्यामुळे ते जरा रागावले होते. जयदीपच्या ते बरोब्बर लक्षात आलं. तो बाबांजवळ गेला.
‘‘बाबा, सॉरी! तुम्ही टेन्शनमध्ये होतात, म्हणून मला वाटलं..’’ जयदीपने मान खाली घातली.
‘‘अरेच्या! मान काय खाली घालतोयस! वेल डन, डिटेक्टिव्ह साहेब!’’ बाबा म्हणाले.
‘‘काका, डिटेक्टिव्ह नाही! हा तर आपला ‘सुपरडुपर काणे’ आहे! अध्र्या दिवसांत केस सॉल्व!’’ अथर्व टाळ्या वाजवत म्हणाला.
जयदीप हसला. समोरच असलेल्या एका गाडीच्या आरशात बघून त्याने उजव्या हाताची पिस्तूल करत फक्कडपकी ‘पोझ’ घेतली..
mokashiprachi@gmail.com