राच्या कुंपणापलीकडून रंगा जोरजोरात हाका मारत होता, ‘‘काकू…काकू…’’ एरवी अशा हाका ऐकल्यावर वेदा धावत गेली असती आणि कमरेवर हात घेत तिने रंगाला जाब विचारला असता, ‘‘काय रे रंगादादा, कशाला हाका मारतोयस रे जोरजोरात आईला?’’ पण आज मात्र तिनं डोक्यावरून पांघरुण ओढून घेत आणखीनच गाढ झोपेचं सोंग केलं. रंगाच्या हाका जोरजोरात चालू होत्या पलीकडून. आई कोणत्यातरी कामात एवढी गढली होती आणि स्वयंपाकघरातून मिक्सरचा आवाज येत होता, त्यामुळे रंगाच्या हाका तिच्या कानावर पडल्याच नाहीत. शेवटी बाबाच बाथरूममधून तरातरा बाहेर आले आणि म्हणाले, ‘‘अगं स्नेहा, किती वेळ झाला रंगा तुला हाका मारतोय. लक्ष कुठे आहे तुझं?’’
‘‘हो का! ऐकूच आलं नाही मला. पाहते, पाहते.’’ असं म्हणत घाईघाईनं हात पुसत आई दरवाजा उघडायला गेली तोपर्यंत कुंपणावरून हाका मारून कंटाळलेला रंगा दारात येऊन पोहचला होता.
‘‘काकू, वेदा उठली नाही का अजून?’’ रंगानं आश्चर्यानं विचारलं.
‘‘नाही रे,’’ असं म्हणत आई गालातल्या गालात हसली. पांघरुणाआडून वेदाही हसली.
‘‘ये ना, रंगा, आत ये.’’ आई असं म्हणेपर्यंत रंगा आत येऊन सोफ्यावर बसलाच होता. आई त्याच्यासाठी चहा घेऊन आली. कपबशीच्या आवाजावरून वेदानं ओळखलं, पण तोच आवाज ऐकून रंगा म्हणाला, ‘‘काकू, चहा नको मला, कडुलिंबाची पानं न्यायला आलोय. आजी तिकडे जिरं, हिंग, मिरी, ओवा, मीठ, साखर वगैरे तयार ठेवून वाट बघतेय. तुमच्याकडे आहे ना कडुलिंबाचं झाड?’’
‘‘झाड आहे रे, पण तुला कडुलिंबाच्या चटणीत काय घालतात ते माहीत आहे?’’
‘‘अहो काकू असं काय, मी आता बारावीची परीक्षा झाल्यावर आजीला मदत करतो बरं स्वयंपाकघरात. त्यात आज पाडवा, मग आजी मला कशी सोडेल.’’ रंगादादाच्या घरीही कडुलिंबाची चटणी असते आज, इकडे वेदाचे कान टवकारले, पांघरुणातल्या पांघरुणात.
‘‘आज पाडव्याच्या दिवशी वेदा उशिरा उठेल ना, सकाळी सकाळी ती कडू चटणी खावी लागेल म्हणून, मीही असंच करायचो लहानपणी.’’ रंगादादा हे सांगत असतानाच बाबा पूजा करून आले.
‘‘अरे बाबा, सतरा तरी हाका माराव्या लागतील आणि उठल्यावर नाक दाबून ती चिमूटभर चटणी भरवावी लागेल तिला. त्यातही हजार नाटकं करील ती.’’ बाबांचं हे बोलणं ऐकून हसण्याचा खळखळाट झाला.
‘‘लहानपणी रंगाही पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी शेजारच्या मोरेकाकांकडे जायचा आणि लपून बसायचा. आठवतं का रे रंगा तुला?’’
‘‘हो, हो, चांगलंच आठवतं.’’ खो खो हसत रंगा म्हणाला, ‘‘आणि तिथेही मोरेकाकू मला कडुलिंबाची चटणी खायला द्यायच्या.’’ परत सगळे जोरजोरात हसायला लागले.
‘‘रंगादादा…’’ म्हणत वेदा पांघरुण जोरात बाजूला झटकत बाहेर आली. अजूनही आई, बाबा आणि रंगा जोरजोरात हसतच होते. हे पाहून वेदा दरवाजाआडच थबकली. ‘‘पण मी थोडा मोठा झाल्यावर हे सगळं थांबलं काका. मी आपणहून आजीला मदत करायला लागलो कडुलिंबाची चटणी करायला. मला कडुलिंबाच्या चटणीचं महत्त्व समजलं. आमच्या शाळेत आम्ही सातवीत असताना एक आयुर्वेदिक डॉक्टर आले होते त्यांनी आहारातलं कडू रसाचं स्थान आम्हाला सांगितलं. ते म्हणाले, शरीरातील पचन न झालेल्या घटकांचे पाचन करणारा, तोंडाला चव आणणारा असा का कडू रस असतो. हा कडू रस खाल्ला की जंत होत नाहीत आणि हो, हा अगदी कमी प्रमाणातच खायचा असतो. एवढं तरी त्यांनी सांगितलेलं आज मला आत्ता आठवतंय. ते ऐकल्यापासून मी पाडव्याच्या दिवशी सकाळी मोरेकाकांकडे जाऊन लपून बसणं बंद केलं आणि घरी थोडीशी कडुलिंबाची चटणी खायला लागलो, बरं का काका.’’
आता चटणी खाताना आई, बाबा आणि आजी आणखी काही कडू गोष्टींचं महत्त्व सांगतात. ते म्हणतात, ‘‘अयोग्य गोष्टींना वेळीच नाही म्हणणं, उगाचच कोणी आग्रह केला तर मनाविरुद्ध एखादी गोष्ट न करणं अशा अनेक गोष्टी असतात ज्या कोणालातरी कडू वाटत असतील. त्या आपण सुरुवातीलाच केल्या तर पुढे होणारा त्रास आपोआप वाचतो. म्हणून आजी म्हणत असते सुरुवातीलाच कडू खावं मग शेवट आपोआपच गोड होतो. बाबा तर म्हणतात, कष्टाचं तसंच आहे, कोणत्याही कष्टाचा नेहमी अनेकांना कंटाळा येतो, काम करण्याचा आळस येतो, पण जर जिद्दीनं आणि संयमानं हा कष्टाचा कडू घोट सातत्यानं घेतला तर यशाचं गोड फळ चाखता येतं आणि हे फळ खाताना तो कडू घोट लक्षातही येत नाही.’’
‘‘खरंय तुझ्या घरच्यांचं म्हणणं. आज दुपारी श्रीखंड खाल्ल्यावर हा कडुलिंब लक्षात तरी असतो का आपल्या?’’ कडुलिंबाची पानं रंगाच्या हातात देत बाबा म्हणाले. रंगाचं हे बोलणं संपतं न संपतं तोच वेदा बाहेर येत म्हणाली, ‘‘आई, मला कडुलिंबाची चटणी देतेस ना? रंगादादा मला भरव ना चटणी.’’
‘‘द्या, द्या काकू चटणी माझ्याकडे.’’ आईनं रंगाच्या हातात कडुलिंबाच्या चटणीची वाटी ठेवली. रंगानं भरवलेली चटणी वेदा आनंदानं खात असताना पाहून आई-बाबा दोघांनाही खात्री झाली की, आपलं लेकरू आता खरं समजूतदार झालं. कडू घास आनंदानं गिळताना न रडणारं. त्यामुळे वेदासाठी नवं वर्ष आनंदाच्या गोड क्षणांनी ओसंडून जाणारं असेल.
joshimeghana.23@gmail.com