|| मेघश्री दळवी

अवकाळी पाऊस, ऐन थंडीत घामाच्या धारा, तुफानी वादळं ही आपण अलीकडे खूपदा ऐकतो. हे सगळे विचित्र बदल होत आहेत ग्लोबल वॉर्मिगमुळे. आणि तेही मुळात हवेत कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण प्रचंड वाढत चालल्याने. शिवाय हवेच्या या प्रदूषणाचे आपल्या सवरंच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात, ते वेगळेच.

हवेच्या प्रदूषणाला तोंड देण्यासाठी कोणते कल्पक उपाय वापरायचे यावर अभ्यासजगात सगळीकडे काम सुरू आहे. त्यात एकटेदुकटे उत्साही संशोधक आहेत, संशोधकांच्या मोठमोठय़ा टीम्स आहेत आणि अनेक खाजगी कंपन्यासुद्धा आहेत.

अभ्यासात कधी ना कधी तुम्ही मॉस म्हणजे शैवाल वनस्पतीचा अभ्यास केला असेल. संधी मिळाली की ओलसर जागी शैवालाची जाळी भराभर वाढून पूर्ण पृष्ठभाग व्यापून टाकते. एरवी बुळबुळीत, निसरडं म्हणून आपण शैवालापासून दूर राहतो. पण आता आपण याच शैवालाची मदत प्रदूषण कमी करायला घेत आहोत.

भरपूर झाडं लावून हवेतील कार्बन डायऑक्साइड कमी करणे हा प्रदूषणावर एक उत्तम तोडगा असतो. पण शहरांमध्ये झाडं लावायला जागा अपुरी पडते. झाडं लावली तरी ती जगवणं एवढं सोपं नसतं. तेव्हा काही तरुण संशोधकांच्या मनात त्या जागी शैवाल वापरायचा विचार आला. आणि त्यातून उभी राहिली शहरी झाडाची.. म्हणजेच सिटी-ट्रीची कल्पना.

शहरात कमी जागेत हा सिटी-ट्री उभा राहू शकतो. ट्री म्हटला तरी तो दिसतो जाहिरातींसाठी उभ्या केलेल्या फलकासारखा. त्याच्या दोन्ही बाजू हिरव्या शैवालाने मढवलेल्या आहेत. सोबत आहे सौरऊर्जेवर चालणारी सेन्सर्सची यंत्रणा आणि पाणी पुरवण्याची सोय. बस्स! एवढय़ा थोडय़ा सामग्रीत हा सिटी-ट्री हवेतला बराच नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि दूषित कण शोषून घेऊ  शकतो. शैवालामुळे एक सिटी-ट्री अडीचशे झाडांचं काम करू शकतो!  अनेक युरोपियन आणि काही आशियाई शहरांमध्ये सिटी-ट्री दिसायला लागले आहेत. आपल्याकडेही ते लवकर दिसू देत आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवू देत!

meghashri@gmail.com

Story img Loader