|| सुचित्रा साठे
‘‘आजी, माघी गणेशोत्सवात पाठांतर स्पर्धा होती. मनाचे दहा श्लोक पाठ करायचे होते. मला त्यात पहिलं बक्षीस मिळालं.’’ बऱ्याच दिवसांनी आजी भेटल्यामुळे आराध्य खुशीत येऊन सांगत होता.
‘‘कसे केलेस रे पाठ तू?’’ आजीने त्याला चढवायचा प्रयत्न केला.
‘‘आई मला रोज लवकर उठवायची. तेव्हा मला खूप राग यायचा. पण माझ्या दोन्ही मित्रांनी स्पर्धेत भाग घेतला होता. म्हणून मलाही घ्यायचा होता. उठताना अगदी जीवावर यायचं, पण बक्षीस घेताना खूप भारी वाटलं गं.’’ आराध्याने खरं खरं सांगितलं.
‘‘कोणी लिहिले रे हे मनाचे श्लोक?’’ आजीने विषय वाढवायला सुरुवात केली.
‘‘तुला माहिती आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिले आहेत. तू आमची मजा करते आहेस, होय ना!’’ ओंकार गोडीत कुरकुरला.
‘‘बघ आराध्यने लवकर उठून श्लोक पाठ केले, त्याला बक्षीस मिळाले. तू उठतोस का लवकर ओंकार? समर्थानी सांगितलं आहे, प्रात: काळी उठावे। काही पाठांतर करावे। यथाशक्ती आठवावे। सर्वोत्तमासी। सकाळच्या वेळी सगळीकडे शांतता असते. मध्येमध्ये कोणताही त्रास नसतो. आपणही ताजेतवाने असतो. त्यामुळे अभ्यासात, पाठांतरात मन एकाग्र होतं. बरोबर लक्षात राहतं. स्मरणशक्तीला काम मिळतं. ती गंजून जात नाही. ‘विसरलो’ हा शब्दच आपण विसरून जातो.’’
‘‘अगं पण आम्ही रात्री किती उशिरा झोपतो. मग सकाळी कशी जाग येईल? झोप पुरी झाली नाही तर शाळेत डुलक्या येतील ना!’’ ओंकारने आपली बाजू मांडली.
‘‘जेवणं झाली की टीव्ही बघण्यात वेळ कशाला घालवायचा, पटकन् झोपून टाकायचं.’’ आजीची सूचना ऐकून खरंच टीव्ही बंद ठेवायला लागला तर.. या विचाराने तोंडं बघण्यासारखी झाली.
‘‘ठीक आहे, कधीपासून उठायचं ते आपण नंतर ठरवू. त्याआधी समर्थ रामदास स्वामी आणखीन काय सांगतात ते बघू या.’’ इति आजी.
‘‘थांब मी वाचतो गं. धकाधकीचा मामला। कोणा पुसे अशक्ताला। नाना बुद्धी शक्ताला। म्हणोनि सिकवाव्या। आराध्यची वाचनातील प्रगती बघून आजी खूश झाली.
‘‘रति, याचा अर्थ कळतोय का बघ.’’ आजीने गप्पा मारत बसलेल्या रति, मुक्ताचे लक्ष आपल्याकडे वेधले.
‘‘शक्ती नसली की अभ्यासही केला जाणार नाही. कोणतंच काम करावंसं वाटणार नाही. माझी एक मैत्रिण खूप हुशार आहे. पण तिला सारखं काही ना काही होत असतं. कधी कधी तिची परीक्षासुद्धा बुडते.’’
‘‘अगदी बरोबर. रोज जॉगिंग, सूर्यनमस्कार, योगासनं असा काही ना काही व्यायाम करायलाच हवा. सकाळची वेळ त्यासाठी उपयुक्त असते. म्हणून या वयातच लवकर उठण्याची सवय लावून घेतली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणत असत, की हे जग दुबळ्या लोकांसाठी नाही. येथे आपण मनाने बलसंपन्न होण्यासाठी येतो. समर्थ रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत. म्हणजे, आधी केले मग सांगितले. खरं ना!’’
‘‘पटतं ग हे सगळं, पण.. उठताना जरा कंटाळा येतो.’’ रतिने प्रामाणिकपणे कबुली दिली.
‘‘ओंकार तू वाच बघू पुढची ओवी. स्वच्छ, स्पष्ट न अडखळता, योग्य ठिकाणी अर्थानुसार शब्दावर जोर देत चार माणसांसमोर छान वाचता यायला हवं बरं का!’’
‘‘आलस्य अवघा दवडावा, येत्न उदंडचि करावा।
शब्द मत्सर न करावा। कोणी येकाचा।’’ ओंकारला ओवीचा अर्थही कळला आणि आजीने आपल्याला का वाचायला सांगितलं तेही न सांगता कळलं. त्याच्या चेहऱ्यावर ते उमटलंसुद्धा.
‘‘आळशीपणाने लोळत जांभया देत टाईमपास केला तर परीक्षेत चांगले गुण कसे मिळणार, म्हणून सतत काहीतरी करत रहावे. आपली वह्यपुस्तकं, कपडे नेहमी आवरून ठेवावे. उद्याची तयारी आजच करावी म्हणजे फजिती होत नाही. दुसऱ्याकडे काही मागायची वेळ येणार नाही. बससाठी लागणारे पैसे घ्यायला विसरलं की हेलपाटा पडतो, शाळेला उशीर होतो की नाही ओंकार.’’ ओंकारची मान एकशे ऐंशी अंशातून हलली. घाईघाईने ओवी वाचावीशी वाटली.
‘‘रूप लावण्य अभ्यासता नये। सहजगुणास न चले, उपाये।
काहीतरी धरावी सोये। अगांतुक गुणाची’’ ओंकारने विजयी मुद्रेने सगळीकडे पाहिले.
‘‘समर्थाना असं सांगायचंय की, नुसते भारी किमती कपडे घालून, नट्टापट्टा करून तुमची योग्यता सिद्ध होत नाही. तुमच्यातले गुण महत्त्वाचे. रूप ही देवाकडून मिळालेली देणगी आहे. त्यात आपलं कर्तृत्व काहीच नाही. वाईट सवयी किंवा गुण प्रयत्नाने घालवून चांगले गुण, सवयी, नवीन गोष्टी आपण ठरवून अंगी बाणवू शकतो. दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं आहे. ही आपली मुक्ता आहे ना, ती अभ्यास तर करतेच, पण गाणंही शिकते. राज्य नाटय़स्पर्धेत ती भाग घेते. रात्री उशिरा पोहण्याच्या क्लासला जाते. इतक्या उशिरा झोपूनही सकाळची शाळा असल्यामुळे टुणकन् सहा वाजता उठते. आणि हे जबरदस्तीने नाही हं, तिला आवडतं म्हणून. आहे की नाही कौतुकास्पद.’’ -इति आजी. मुक्ता हळूच लाजली. रतिने अंगठा दाखवला.
‘‘आता मी बरं का!’’ म्हणत रतिने पुढची ओवी वाचली. वय श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे। बरे बोलणे सत्य जीवी धरावे. म्हणजे वयोवृद्ध माणसांना मदत करावी. ते सांगतील ते ऐकावे. त्यांना उलट उत्तरे देऊ नये. नेहमी सगळ्यांशी चांगलं बोलावं. केव्हा कोणावर कोणाची मदत घ्यायची वेळ येईल ते सांगता येत नाही. श्रीरामांना वानरांची मदत घ्यावी लागली, असं तू सांगितलं होतंस.’
‘‘अरे वा, बरंच लक्षात राहायला लागलं आहे की. समर्थ काय करावे हे जसं सांगतात, तसंच काय करू नये हेसुद्धा सांगतात. वाट पुसल्याविण जाऊ नये। फळ ओळखल्याविण खाऊ नये। पडिली वस्तू घेऊ नये। एकाएकी।
कोणत्याही गोष्टीची नीट माहिती करून घ्यावी. रस्त्यात पडलेली वस्तू छान दिसली तरी घेऊ नये. त्यामध्ये धोका असू शकतो. फळ विषारी असू शकतं. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा।,अभ्यासाने प्रगट व्हावे।, क्षणाक्षणा रुसो नये। अशा कितीतरी गोष्टी सांगून समर्थ आपल्याला शहाणे करत असतात. पण एकदम सांगितल्या तर डोक्यात कशा मावतील? समर्थ मूर्ख कोणाला म्हणतात सांगू का? दंत, चक्षु आणि प्राण। पाणी वसन आणि चरण। सर्वकाळ जयाचे मलिन। तो येक मूर्ख। म्हणजे काय मुक्ता सांग बघू.’’
‘‘दात, डोळे, नाक, हात, पाय आणि कपडे ज्याचे घाणेरडे आहेत तो एक मूर्ख. म्हणून बाहेरून घरात आल्यावर हात-पाय स्वच्छ धुऊन घरात यायचं असतं.’’ मुक्ताची कळी खुलली होती.
‘‘अशी मूर्खाची कितीतरी लक्षणं समर्थानी सांगितलेली आहेत. आपल्याला कोणीही मूर्ख म्हणू नये असं वाटत असेल तर तुम्हाला ती वाचून लक्षात ठेवावी लागतील, आहे कबूल!,’’ असे आजीने विचारताच ‘होऽऽऽऽ’ करत सगळेच दासबोध वाचायला धावले.
suchitrasathe52@gmail.com