सुंदर, सुंदर फुलपाखरं, रंगीबेरंगी फुलपाखरू… फुलपाखरू तर सर्वांनाच आवडतं. पण हल्ली मला फुलपाखरू जरा जास्तीच आवडायला लागलंय. आता नुसतं फुलापखरू तर मी बघतेच, पण मला हल्ली अंड, अळी, कोश या गोष्टीतही फारच रस निर्माण झालाय. त्याचं असं झालं की…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक दिवस आम्ही ओवळेकर गार्डनला गेलो. ते फुलपाखरू उद्यान होतं. माझी रविवारची झोप मोडल्यामुळे मी वैतागलेच होते. मला वाटलं होतं, फुलपाखरू उद्यान म्हणजे काय असणार एवढं? पण तिथे गेल्यावर कसलं भारी वाटलं. केवढी ती झाडं! आणि महत्त्वाचं म्हणजे केवढी ती फुलपाखरं! तिथे ज्यांनी ती झाडं लावली होती त्यांनी आम्हाला माहिती दिली- ‘‘आपल्याला वाटतं की फुलपाखरं कोणत्याही फुलावरचा’ मकरंद पितात. कोणत्याही/ झाडावर जन्माला येतात. पण तसं नसतं, प्रत्येक फुलपाखराची ठरलेली झाडं असतात. फुलपाखरं ज्या झाडावरअंडी घालतात, जन्माला येतात त्या झाडांना ‘फूड प्लांट्स’ असे म्हणतात. तसेच फुलपाखरू कोणत्या झाडाच्या फुलांचा रस पिणार हेही ठरलेले असते. अशा झाडांना नेक्टर प्लांट म्हणतात.’’ भारीच वाटलं मला. वाटलं की, आपणसुद्धा असंच मोठ्ठं गार्डन तयार करावं. मी त्या काकांना मग विचारलं, ‘‘पानफुटी घेऊ का थोडी घरी न्यायला?’’ मग मी पानफुटी घेतली घरी गेल्यावर ती कुंडीत लावली आणि तो विषय तिथेच सोडून दिला!

हेही वाचा…भारतीय वास्तव; वैश्विक दृष्टी…

l

काही महिने उलटून गेले. ओवळेकर गार्डनला गेल्यापासून झाडांना पाणी मीच घालत होते. लिंबाची फार दुर्दशा झाली होती. तर मला एक छोट्टी अळी दिसली. राग येऊन लगेच तिला चिरडून टाकलं. पण मी हे आईला सांगितल्यावर आई मला म्हणाली, ‘‘अगं ती फुलपाखराची अळी होती.’’ मला इतकं वाईट वाटलं, की एका फुलपाखराने इथे अंड घातलं- तेसुद्धा ठाण्यासारख्या रहदारीच्या ठिकाणी सातव्या मजल्यावर आणि आपण तिला चिरडून टाकलं?

हेही वाचा…लोभस आणि रसाळ!

पण फुलपाखरांचे इतके शत्रू असतात त्यामुळे फुलपाखरू आधीच वीस – पंचवीस अंडी घालतं की त्यातून एक तरी जगेल. तसंच झालं की, मला पुन्हा एक अळी पाहायला मिळाली. या वेळी मी गुगल लेन्सवर सर्च केलं तर तिचं नाव ‘कॉमन मॉरमॉन’ असं कळलं. मग काय मी खूशच झाले. तिच्यावर बारीक लक्ष ठेवलं. तिने मग तिसऱ्या दिवशी गंमतच केली. आमच्या जाळीवर जाऊन बसली. मी म्हटलं, ‘‘पानं खाऊन झाली आता जाळी खाणार वाटतं.’’ मग तिने तिच्या अंगावर जाड पापुद्रा तयार केला. तो तिचा कोश होता. आणि तो दिवस उजाडला. पावसामुळे शाळेला सुट्टी मिळाली असली तरी आई मला का उठवत होती? हेच विचारण्यासाठी मी डोळे उघडले. तर आई म्हणाली, ‘‘अगं मैत्रेयी ऊठ, कोषातून फुलपाखरू बाहेर पडलंय!’’ मी धावतच खिडकीकडे गेले. आणि मला दिसलं… दिसलं! सुंदर सुंदर फुलपाखारू! मनमोहक फुलपाखरू! रंगीबरेंगी फुलपाखरू! इयत्ता ४ थी, सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा,नौपाडा, ठाणे</p>

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokstta lokrang balmaifil article on butterfly sud 02