प्राची बोकील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संध्याकाळचे सात वाजले होते तरी अजून अंधार पडला नव्हता. लंडनमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातही आठ-नऊ वाजेपर्यंत उजेड असायचा. सुमुख त्याच्या आई-बाबांबरोबर दोन वर्षांकरिता नुकताच लंडनला आला होता. आयटी क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्याच्या बाबांना प्रोजेक्टनिमित्त ‘ऑनसाइट’ यावं लागलं होतं. तो खरं तर पुण्याचा.. एकत्र कुटुंबात राहणारा! सगळे सणसमारंभ मिळून साजरे करण्याचा घरातला पायंडा. त्यात पाच दिवसांचे गौरी-गणपती त्यांच्या घरात खूप उत्साहात साजरे व्हायचे. पण नेमकं गणपतीच्या काहीच दिवस आधी सुमुख आणि त्याचे आई-बाबा लंडनला आले होते.

सुमुख घराच्या बाल्कनीत उभा राहून उदासपणे एकटक कुठेतरी हरवल्यागत बघत होता. एवढय़ात त्याची आई तिथे आली आणि तिने हलकेच सुमुखच्या खांद्यावर हात ठेवला.

‘‘आई, घरी गणपतीची लगबग सुरू असेल नं? खूप ‘मिस’ करतोय मी सगळ्यांना..’’

सुमुख बेचैन होता. आई काही म्हणणार इतक्यात तिच्या मोबाइलवर ‘व्हॉट्सअ‍ॅप’ कॉल आला. दोघं कॉल घेतच घरात आले. समोरून अमोघदादा, गौरी आणि सिद्धी एकत्र ‘हाय..’ करत ओरडले.

हेही वाचा >>> बालमैफल : मी.. : तिरंगा!

‘‘तुम्ही अजून झोपला नाहीत? रात्रीचे बारा होत आलेत!’’ म्हणत सुमुखनेही ‘हाय’ केलं.

‘‘आला की गणपती दोन-तीन दिवसांवर.. उद्या रविवार असल्यामुळे आज बरीचशी कामं आम्ही मार्गी लावणार आहोत!’’ गौरी म्हणाली.

‘‘यंदा काय थीम?’’ सुमुखचा प्रश्न.

‘‘अमोघदादाने पालीच्या बल्लाळेश्वराचं कॅनव्हास पेंटिंग केलंय.’’ मोबाइलचा कॅमेरा ‘रिव्हर्स’ करत गौरीने पूर्ण होत आलेलं पेंटिंग सुमुखला दाखवलं. खरं तर गणपतीची आरास करण्याची पद्धत सुरू केली होती सुमुखच्या बाबांनी! पुढे सगळ्या बच्चेकंपनीलाही त्यांनी हाताशी घेतलं. कुणाला कागदाचे चौकोन काप, फेव्हिकॉलने कागद चिकटव, सोनेरी कागदाची नक्षी कर, फुलं रंगव, झिरमिळ्या लाव अशी बारीकसारीक कामं सांगत मुलांमध्ये ही आवड- हा एक संस्कारच सहजपणे त्यांनी रुजवला होता.

‘‘बाकी काय सुरू आहे?’’ सुमुखने कुतूहलाने विचारलं.

‘‘बाबा आणि काका माळ्यावरून महिरप, पाट वगैरे काढताहेत. आई-काकू बेसनाचे लाडू वळत बसल्या आहेत. आजी दूध तापवतेय. आणि आजोबांची इस्त्री सुरू आहे..’’ सिद्धीची रिनग कॉमेंट्री!

‘‘सुमुख, काका कुठाय?’’ अमोघदादाने विचारलं. त्याला सुमुखच्या बाबांना पेंटिंग दाखवायचं होतं.

‘‘बाबा गेलाय जवळच्या इंडियन ग्रोसरीमध्ये खव्याचे मोदक आणायला. छॅं:! गणपतीचा काही फीलच नाहीये इथे. आपल्या तिथल्या शाळेत कसा फील यायचा गणपतीचा!’’ सुमुख कुरकुरला. पुण्यातल्या त्याच्या शाळेमध्ये गणपती बसवायचे.

‘‘डोंट वरी! आपण करू ‘कनेक्ट’ आरती, पूजेच्या वेळी..’’ अमोघदादाने आश्वासन दिले. बराच वेळ अशा गप्पा झाल्यावर सुमुखने कॉल बंद केला, तसे त्याचे डोळे पाणावले.

‘‘दिवेलागणीला रडू नकोस बाळा..’’ म्हणत आईने सुमुखचे डोळे पुसले. तिने घडय़ाळाकडे पाहिलं. साडेसात वाजून गेले होते. देवापुढे दिवा लावायला ती लगबगीने उठली. सुमुखही आईच्या मागे स्वयंपाकघरात आला.

‘‘सुमुख, गौरी-गणपती विसर्जन झाल्यावरही तू असाच रडू रडू करतोस..’’

‘‘लहानपणापासून सवयीचं आहे नं- घरात गौरी-गणपती असणं.. गणपती विसर्जन करून आल्यावर कसं ओकंबोकं वाटतं.. तसंच वाटतंय आज. काही लगबग नाही, कुणी येणार नाही, आपणही कुठे जाणार नाही..’’

‘‘तो झाला सेलिब्रेशनचा भाग. एरव्ही बाप्पा आपल्या मनात नेहमी असतोच.’’ आईने देवासमोर दिवा लावला.

‘‘अथर्वशीर्ष म्हणू या? ‘हरी ओम नमस्ते गणपतये..’ ’’ सुमुख डोळे मिटून मनोभावे अथर्वशीर्ष म्हणू लागला. आईला सुमुखची घालमेल समजत होती. त्याला सगळ्यांपासून लांब.. इथे एकटं एकटं वाटत होतं.

हेही वाचा >>> बालमैफल : उदकाचा महिमा

‘‘..ओम शान्ति: शान्ति: शान्ति:’’ पाचएक मिनिटांनी अथर्वशीर्षांच्या फलश्रुतीचं शेवटचं वाक्य म्हणत सुमुखने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो एकदम शहारला. समोर देव्हाऱ्यावरच्या लाकडी कपाटाच्या शटरवरच्या ‘ग्रेन्स’मध्ये त्याला गणपतीचा आकार दिसला.. सोंड, मुकूट आणि तुटलेला दात! त्याने पुन्हा नीट पाहिलं आणि आईचं लक्ष तिथे वेधलं. लाकडाच्या नैसर्गिक नसांमधून दिसणारी ती आकृती त्याने बोटाने गिरवली.

‘‘इतके दिवस मी या कपाटाची उघडबंद करतेय, मला कधीच दिसलं नाही हे. अथर्वशीर्षांत आपण गणपतीला ‘त्वं शक्तित्रयात्मक:’ म्हणतो.. इच्छा, क्रिया आणि ज्ञान या शक्तींचा विधाता. आज तुझ्या तीव्र इच्छाशक्तीमुळे बाप्पा तुलाच बरोबर दिसला.’’

आईलाही भारावल्यासारखं झालं. सुमुख सुखावला. त्याने बाप्पाला कुंकू लावायला कोयरी घेतली.

‘‘नको..’’ आईने थांबवलं.

‘‘का?’’

‘‘हा मनातला भाव आहे. मनातच असू दे. अशा गोष्टी घडतात. ज्याला विश्वास असतो त्याला जाणवतात. आम्ही लहान असताना आमच्या चाळीतले एक काका दररोज तिथल्या मंदार वृक्षाला देवाची पूजा झाली की तीर्थ वाहायचे. अशी बरीच वर्ष त्यांनी नियमितपणे केलं- अगदी अनवधानाने. एक दिवस जमिनीतून वर आलेल्या त्या झाडाच्या काही मुळांनी गणपतीचा आकार घेतला होता.’’

‘‘पुढे काय केलं त्यांनी? शेंदूर वगैरे..’’

हेही वाचा >>> बालमैफल : आजीच्या सुटकेची गोष्ट

‘‘काहीच नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत सूक्ष्म अंतर असतं. ते जपायचं. मन आणि बुद्धी स्थिर ठेवणं हेच तर अथर्वशीर्ष शिकवतं. आजच्या या प्रसंगाने आपल्या मनाला उभारी मिळाली खरी; पण त्याचं अवडंबर न करणं ही बुद्धीची जबाबदारी. ‘भक्तानुकम्पिनं देवं’ म्हणजेच आपल्या भक्तांप्रति नेहमी अनुकंपा दाखवणाऱ्या या गणपतीबाप्पाचं स्मरण करत मन आणि बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा..’’

‘‘..आणि रडू रडू न करता इथे आपण जितके दिवस आहोत, ते आनंदाने घालवायचे.’’

सुमुखने आईला मिठी मारली.

bokilprachi12@gmail.com

रंगांची न्यारी संगत..

रंगांची न्यारी संगत

भारी आवडे साऱ्यांना

निसर्ग आणि रंगांचा

अद्भुत आहे याराना!

डौल हिरव्या रंगाचा

गवताच्या पात्यांतून

झाडांतून पानांतून

अवघ्या निसर्गातून!

थेंब रूपेरी सुंदर

येती पाऊस घेऊन

छटा रूपेरी रंगाची

मन घेतसे वेधून!

आणि मुलांनो, बघा ही

जादू सोनेरी रंगाची 

काळ्या अंधाराची हार

जीत सूर्यकिरणांची!

रंगीबिरंगी फुलांची

ओढ वाटे प्रत्येकाला

नानाविध रंग त्यांचे

लाल- गुलाबी- पिवळा!

सप्तरंगी रथातून

खुणावते इंद्रधनु

रंगांची न्यारी संगत   

किती-किती कशी वर्णू?

गौरी कुलकर्णी