प्राची मोकाशी

रात्रीचे जवळपास तीन वाजले होते. सुमुख खोलीतून हॉलमध्ये आला. त्याला अंधाराची फारशी भीती वाटायची नाही. आता ‘मी मोठा झालोय’ असं त्याला अलीकडे फार वाटायला लागलं होतं- तिसरीत जो गेला होता! आणि त्यात हॉलमध्ये तेवत असलेल्या समईच्या मंद प्रकाशात त्याला आज साथ होती ‘गणोबाची’. म्हणजेच गणपतीची- दरवर्षी नित्याने दहा दिवसांसाठी येणारा ‘पाहुणा’ सुमुखचा खास दोस्त ‘गणोबा’! चौरंग ओढून सुमुख गणोबाच्या पुढ्यात बसला. समईच्या मंद प्रकाशात गणोबाचे डोळे सुरेख दिसत होते- बारीक, निळसर.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!

‘‘काय गणोबा, पोट काय म्हणतंय? काल भरपूर मोदक खाल्लेत सगळीकडचे- उकडीचे, तळणीचे, खव्याचे, चॉकलेटचे!’’ बाप्पांचं आदल्या दिवशीच, म्हणजे भाद्रपद चतुर्थीला सगळ्यांच्या घरी आगमन झालं होतं.

‘‘पण तुला कुणी ‘पोटोबा’, ‘ढेरपोट्या’ वगैरे नाही म्हणत. तुला काय तर प्रेमाने ‘लंबोदर’ म्हणतात. कारण तू गणोबा नं! पण मी काल तीन चॉकलेटचे मोदक खाल्ल्यावर आई लगेच कशी म्हणाली ‘पुरे आता मोदक खाणं! पोट बिघडेल… आपल्याला ‘पोटोबा’ नाही व्हायचंय…’’’ सुमुखने आईच्या बोलण्याची ‘स्टाइल’ पकडली.

‘‘आहे मला थोडं पोट! आई काळजीनेच बोलते, पण तीच म्हणते ‘असं खाणं काढू नये कुणाचं’ आणि तीच अडवते!’’ सुमुख कुरकुरला. इतक्यात वाऱ्याची हलकी झुळूक आली तशी समईची ज्योत शहारली. सुमुखने खिडकीची राहिलेली बारीक फट बंद केली आणि तो पुन्हा चौरंगावर येऊन बसला.

‘‘गणोबा, आता तर शाळेतही मला सगळे चिडवायला लागलेत. खासकरून आदित्य! म्हणतो कसा, ‘तू बाकावर बसलास की बसायला जागाच नसते.’ तो तर मला ‘पोटोबा’बरोबर ‘जाडोबा’पण म्हणतो. इतका थोडी जाड आहे मी! परवा त्याने माझी बॅग बाकावरून खाली ढकलून दिली. आमच्या वर्गशिक्षिकांकडे मी तक्रार करायला जाणार तर त्याने मला धमकावलं की माझ्याकडून त्याने वाचायला नेलेली ‘बोक्या सातबंडे’ची गोष्टीची पुस्तकं तो कधीच परत करणार नाही म्हणून.’’ एवढ्यात बाथरूमचं दार वाजलं आणि सुमुख गप्प बसला. थोड्या वेळाने पुन्हा दार वाजलं आणि सुमुखने ‘हुश्श’ केलं.

हेही वाचा >>> बालमैफल: नवीन पुस्तक

‘‘गणोबा, हे आपलं सीक्रेट आहे, काय? आईला मी सांगणार होतो आदित्यचं धमकावणं वगैरे, पण ती आणि आजी महालक्ष्म्यांच्या तयारीमध्ये ‘बिझी’ आहेत. बाबा दिवसभर कम्प्युटरपुढे कॉल्स घेत बसलेला असतो हेडफोन लावून, त्यामुळे तोही ‘बिझी’! आजोबांना सांगू? पण ते लगेच येतील आदित्यला जाब विचारायला. नकोच ते! त्यापेक्षा आपल्या ‘लेव्हल’वर काही करता येईल तर सांग! ती पुस्तकं मला परत मिळवायची युक्ती सांग, गणोबा! ‘मामा दुर्वे स्वीट्स’च्या दुकानात नवीन ‘स्ट्रॉबेरी’ मोदक आलेत. बाबाला सांगून तुला मस्त एकवीस मोदकांचा नैवेद्या दाखवीन! पक्का प्रॉमिस! पण ‘शेअरिंग इज केअरिंग’ असतं, हे विसरू नकोस, गणोबा!’’ गणोबाशी मनांतलं बोलून सुमुखला शांत वाटलं. त्याने बाप्पापुढे डोकं टेकलं आणि तो खोलीत गेला. इतका वेळ लागत नव्हती ती झोप त्याला आता अनावर झाली आणि तो लागलीच गाढ झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमुख डोळे चोळतच हॉलमध्ये आला आणि बाप्पाकडे डोळे विस्फारून बघत राहिला. बाप्पापुढील चौरंगावर चक्क त्याची पुस्तकं होती! सुमुखने आश्चर्याने ती उचलली तर त्यांच्याखाली होती एक चिठ्ठी! सुमुखने सगळीकडे पाहिलं. आई-बाबा मावशीकडे दर्शनाला गेले होते, कारण तिच्याकडे दीड दिवसांसाठीच गणपती यायचा! आजी अंघोळीला गेली होती आणि आजोबा? अरे, हो! ते फुलबाजारात जाणार होते. मग पुस्तकं आली कुठून? आणि चिठ्ठी? पुस्तकं मिळाल्याचा जरी त्याला आनंद झाला होता तरी सुमुखच्या बुद्धीला हे काही पटत नव्हतं. त्याने लगबगीने चिठ्ठी उघडली आणि तो वाचू लागला…

‘‘गणोबा उवाच…’’ सुमुखने शीर्षक वाचलं. ‘‘आईल्ला… सॉरी… म्हणजे, अरे, बापरे! बाप्पाला मी ‘गणोबा’ म्हणतो कसं माहीत? आणि ‘उवाच’ म्हणजे? हा! ‘म्हणाले’… नाही का आजी विष्णुसहस्रानामांत म्हणते- ‘युधिष्ठीर उवाच’ वगैरे… तर गणोबा उवाच…’’ सुमुख पत्र वाचू लागला…

‘हाय, सुमुख! खरं सांगू? मोदक खाऊन-खाऊन पोटाला तडा गेलाय माझ्या, पण सांगणार कुणाला? दरवर्षी एकदा येतो तुमच्या भेटीला त्यामुळे सगळ्यांनाच मला खाऊ-पिऊ घालायचं असतं. त्यांची मनं कशी मोडायची? मग लागतात खायला तुमचे वेगवेगळे मोदक! एका मोदक बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये तर माझ्यासाठी एकशेएक मोदकांचा नैवेद्या असतो दरवर्षी… आता बोल! असो.

तुझी पुस्तकं आदित्यकडे आहेत माहीत होतं मला. कसं? अरे, तुम्ही एकाच ठिकाणहून गणपती ‘बुक’ करता नं! त्याचा गणपती तो कमळावर बसलेला, संपूर्ण लाल शाडू मातीचा, हा! तो आपला मित्र! त्याला मी सांगून ठेवलं होतं तुझी पुस्तकं परत करायला. त्याने केली ती परत, आदित्यला थोडं बाबापुता करत! मला ठाऊक आहे आदित्य थोडा भांडकुदळ आहे. मैत्रीमध्ये चिडवाचिडवी होतेच. तू त्याला आदित्य ऐवजी ‘सन’ म्हणतोसच की आणि चिडवतोस- ‘ओह सन, लेट्स हॅव फन’. मग तोही चिडतो. कुणी एकाने शांत राहायचं, तरच मैत्री टिकते. आणि आदित्यचा बाप्पापण समजावणार आहे त्याला व्यवस्थित! सो, डोंट वरी.

हेही वाचा >>> बालमैफल: सोनाराने टोचले कान

आता राहिला प्रश्न मी ‘लंबोदर’ आणि तू ‘पोटोबा’ असण्याचा! तुझे आई-बाबा ‘फिटनेस फ्रिक’! त्यांचं रोज चालणं, धावणं नित्याचं. तू खेळायला जातोस संध्याकाळी, पण व्यायाम? जेमतेम दोन सूर्यनमस्कार जमतात तुला घालायला, की लगेच ‘दमलो बुवा’चा धोशा! आदित्य कसा सडसडीत आहे! तुलना म्हणून नाही, पण ज्याचं चांगलं ते घ्यावं रे. आत्तापासूनच सूर्यनमस्कार घालायला सुरुवात कर. पुढच्या वर्षी मी येईन तेव्हा आरामात बारा नमस्कार घालता आले पाहिजेत, काय?

आणि त्या स्ट्रॉबेरी मोदकांचं लक्षात असू दे. मी माझा शब्द पाळलाय, आता तुझी टर्न. मोदकांशिवाय कसला आलाय रे नैवेद्या? मोद म्हणजेच आनंद देणारा माझा हा मोदक तुम्ही मुलांनीच नाही खाल्ला तर काय मज्जा? आणि सगळ्यांत महत्त्वाचं- नेहमी हसत राहा. तुझं ‘सुमुख’ हे नाव माझ्याच नावांपैकी एक आहे!

चल, आज इतर मंडळांमध्ये आहे दिवसभर, ठणठण लाऊडस्पीकरच्या आवाजात मोदकांची पंगत. थोडा व्यायाम करेन म्हणतो आणि मग जाईन. बाय!’

पत्राच्या शेवटी सही केली होती गणोबा! बाप्पाचं पत्र सलग वाचत जाणारा सुमुख सहीपाशी मात्र थोडा अडखळला. ‘गणोबा’ शब्दातील ‘बा’ अक्षरातून गणोबाची सोंड बनली होती- वेटोळा घातलेली! ‘ही तर आजोबांची स्टाइल!’ सुमुखच्या कपाळावर आठ्या पडल्या.

सुमुखचे आजोबा आर्टिस्ट होते. त्यांचं नाव ‘विनायक’. ते प्रत्येक चित्राखाली ‘विनोबा’ अशी सही करायचे आणि ‘बा’ अक्षरातून सोंड काढायचे. आता सुमुखची ट्यूब पेटली. आजोबा नेहमी म्हणतात, ‘चौसष्ट कलांची देवता असलेल्या गणपतीने मला चित्रकलेचा आशीर्वाद दिलाय. त्याला ‘थँक यू’ म्हणायला ‘विनोबा’तल्या ‘बा’ला ‘गणोबा’ची सोंड!’

इतक्यात किल्लीने दार उघडत आजोबा घरात आले. हातांतल्या पिशव्या ठेवेपर्यंत सुमुखने त्यांना घट्ट मिठी मारली होती. विनोबांच्या लगेच लक्षात आलं, त्यांचा ‘गणोबा’ पकडला गेला होता.

mokashiprachi@gmail.com