संपदा वागळे
दिवाळीच्या सुटीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. आज सगळ्या मत्रिणी भेटणार म्हणून श्रावणी आनंदात होती. तिच्या ५ वी ‘अ’च्या वर्गातील मुलामुलींचे फुललेले चेहरे हेच सांगत होते. प्रार्थना संपताच सुटीत आपण काय धमाल केली, हे एकमेकांना सांगण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली.
इतक्यात वर्गशिक्षिका स्नेहा टीचर आल्या. मुलांच्या कलाने वागणाऱ्या या बाई सर्वाच्या आवडत्या होत्या. त्यांचं मुलांशी एक हळुवार नातं होतं. मुलांचा गलका त्यांनी बाहेरून ऐकला होता. म्हणाल्या, ‘‘तुम्ही केलेली मजा मलाही ऐकायचीय. पण खरेदी, फिरणं, खाणं-पिणं.. यापलीकडे तुम्ही काही अनुभवलं असेल तर मला सांगा.’’
बाईंचे हे शब्द ऐकताच सर्वजण विचारात पडले. वर्गात क्षणभर शांतता पसरली. मिनिटभरातच श्रावणी उभी राहिली. म्हणाली, ‘‘बाई, मी सांगते.‘वसुबारस’ला म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी माझ्या पणजोबांचं (आईचे आजोबा) वर्षश्राद्ध होतं. त्यासाठी आम्ही कुटुंबातील २०-२५ जण माझ्या मामेआजोबांच्या बदलापूरच्या फार्महाऊसवर गेलो होतो. तिथे आजूबाजूला काम करणाऱ्या गरीब माणसांना आणि त्यांच्या मुलांना आजीने जेवायला बोलावलं होतं. साठच्या वर माणसं आली होती.
‘‘पण तू तिथे काय केलंस ते सांग.’’ श्रेयसीने मधेच टोकलं.
‘‘तेच तर सांगतेय.. ऐक आधी सगळं. बंगल्याच्या गच्चीवर खुच्र्या मांडल्या होत्या. त्यावर या पाहुणे मंडळींना बसवून आम्ही त्यांची पूजा केली.’’
‘‘पूजा करायला ते काय देव आहेत?’’ किमयाची शंका.
‘‘हो’’, आई म्हणाली, ‘‘आपण त्यांना आदराने बोलावलंय म्हणजे ते देवच अतिथी देव.’’
‘‘पण पूजा कशी केलीस ते तर सांग..’’ तन्वीला तिने नेमकं काय केलं ते समजून घ्यायचं होतं.
‘‘सांगते, प्रथम एका पेल्यात दूध आणि दुसऱ्या पेल्यात पाणी घेऊन आम्ही त्यांचे पाय धुतले. नंतर ते स्वच्छ नॅपकिनने पुसून त्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढलं. मग कपाळावर गंध लावून त्यांना ओवाळलं. हे झाल्यावर आम्ही सर्वानी त्या प्रत्येकाला वाकून नमस्कार केला आणि सगळ्यांनी आणलेल्या भेटवस्तूंची एक पिशवी करून ती त्यांना भेट दिली.’’
‘‘आणि जेवायला काय काय होतं?’’ ईशानच्या या प्रश्नाचं उत्तर ऐकायला सगळेच उत्सुक होते.
‘‘पुरी, बटाटय़ाची भाजी, मसालेभात, पापड आणि गोड शिरा.’’ क्षणभर थांबून श्रावणी पुढे म्हणाली, ‘‘पण जेवणापेक्षा त्यांना जो ‘मान’ मिळाला त्यानेच ते जास्त आनंदित झाले होते.’’
बाई म्हणाल्या, ‘‘खूप छान. तुझे पणजोबा जिथे कुठे असतील तिथून तुम्हा- साऱ्यांना आशीर्वाद देत असतील. आणखी कोणी केलंय का वेगळं काही, सांगा बरं पटपट..’’
मागच्या बाकावरचा एक हात वर आला. व्रात्यपणासाठी सर्व शिक्षकांची कायम बोलणी खाणाऱ्या आदित्यला ‘असं’ काही सांगायचंय हे पाहून बाईंसह सगळा वर्ग चकित झाला.
आदित्य पुढे आला आणि सांगू लागला.. ‘‘बाई, या सुटीत आम्ही दापोलीला आजीकडे राहायला गेलो होतो. तिथे जवळच मंडणगड नावाच्या गावात अंध मुलांचे वसतिगृह म्हणजे राहायची शाळा आहे. एक दिवस आजी-आजोबा आम्हा मुलांना तिथे घेऊन गेले.’’
‘‘त्या मुलांच्या खोडय़ा तर काढल्या नाहीस ना तू?’’ चत्राची रास्त शंका.
‘‘ए, तेवढं समजतं बरं मला! हं, तर त्या मुलांनी आम्हाला काय काय कौशल्यं दाखवली म्हणून सांगू. क्रिकेट, लांब उडी, उंच उडी अशा खेळांबरोबर तबला, पेटी ही वाद्येदेखील त्यांना येत होती. एवढेच नव्हे, तर पुस्तकंही काय सॉलिड स्पीडने वाचत होती ती!’’
‘‘त्यांची पुस्तकं आपल्यासारखी नसतात बरं! त्यांना स्पर्शाने जाणवेल अशा ब्रेल लिपीतून ती लिहिली जातात.’’ बाईंनी माहिती पुरवली.
आदित्य पुढे म्हणाला, ‘‘आम्ही त्या मुलांबरोबर खेळलो, गाणी म्हटली, खाऊ खाल्ला.. एका दिवसात आमची त्यांच्याशी गट्टी जमली.. घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी मामीने आमचा एक खेळ घेतला. एकेकाचे डोळे बांधले आणि काल त्या मुलांनी जे जे केलं त्यापैकी काही ना काही गोष्टी आम्हाला करायला सांगितल्या. तेव्हा आम्हाला त्यातली एकही गोष्ट करता आली नाही..’’
‘‘त्यावेळी कळली असेल ना स्वत:च्या डोळ्यांची किंमत?’’ बाईंचा हा प्रश्न खरं तर सगळ्या वर्गाला उद्देशून होता.
सगळ्यांच्या माना डोलल्या.
बाई म्हणाल्या, ‘‘बाळांनो, यावरून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. देवाने धडधाकट शरीर दिलंय यासाठी त्याचे आभार तर मानायचेच. त्याबरोबरच एखाद्याकडे कसलीही कमी असेल तर त्याला आपणहून मदत करायची. आपल्या शाळेची प्रार्थना काय सांगते सांगा बघू?’’
‘‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे..’’ सगळ्यांचा सूर लागला.
त्यांना थांबवत बाई म्हणाल्या, ‘‘चला तर, या प्रार्थनेतील शिकवण आपण सर्व आचरणात आणू या. आजपासून आपण एक नियम करू या की, एका तरी व्यक्तीला आनंद दिल्याशिवाय झोपायचं नाही. अंथरुणावर पडल्यावर आठवलं पाहिजे आपण आज कोणतं चांगलं काम केलंय ते! कबूल?’’
‘‘कबूल.’’ एकमुखाने गर्जना झाली.
तेवढय़ात तास संपल्याची बेल झाली. पुढचा तास सुरू झाला. पण आर्याच्या मनातून पहिला तास काही जात नव्हता. इतक्यात तिच्या सुपीक डोक्यात एक आयडिया आली. हायस्कूलमध्ये आल्यापासून ५वी, ६वीच्या मुलांना महिन्यातून एक दिवस- चौथ्या शुक्रवारी शाळेच्या कँटीनमधून खाऊ घेऊन खाण्याची मुभा होती. बहुतेक मुलं या दिवशी घरून पैसे घेऊन येत आणि वडापाव, सामोसा पाव, दाबेली, मिल्क शेक, सरबत.. असं काय हवं ते घेऊन खात. पण यांच्या वर्गातील पाच-सहा मुलं गरीब होती. ती कायम आपला पोळीभाजीचा डबाच खात. एरवी फारसं लक्ष न दिलेली ही गोष्ट त्या दिवशी आर्याच्या बरोबर ध्यानात आली. नेमका तो दिवसही कँटीनमध्ये खाण्याचा होता. तिच्या मनात आलं, ‘सगळ्यांचे पैसे एकत्र करून अख्ख्या वर्गासाठी सारखा खाऊ आणला तर?’
तिची ही कल्पना सर्व मुलांनी उचलून धरली.. अर्थात ‘त्या’ मुलांना सुगावा लागू न देता!
आणलेले पैसे भराभरा एकत्र गोळा झाले. कोणाचे दहा, कोणाचे वीस, कोणाचे पन्नास, तर काहींचे शंभरदेखील. जमा झालेल्या रकमेत काय येऊ शकतं याचा हिशेब झाला. दोघांनी छोटय़ा सुटीत कँटीनमध्ये जाऊन ५० वडापाव आणि ५० ग्लास सरबताची ऑर्डर दिली आणि मधली सुटी होताक्षणी दहा जणांची टीम सगळी ऑर्डर घेऊन यायला धावलीदेखील.
एवढं होईस्तोवर या मुलांनी ‘त्या’ मुलांना मात्र कसलाच सुगावा लागू दिला नव्हता. त्यांनी नेहमीप्रमाणे आपला डबा बाहेर काढला. पण वडापाव येईपर्यंत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवण्यासाठी एक टीम सज्ज होती. पाच मिनिटांतच वडय़ांचा तोंडाला पाणी आणणारा वास सर्वाच्या नाकात शिरला.
ती मुलं असं ‘फुकटचं’ घ्यायला अजिबात तयार नव्हती. तेव्हा आर्या त्यांच्याजवळ जाऊन प्रेमाने म्हणाली, ‘‘आजपासून आपलं काय ठरलंय.. कोणाला तरी आनंद दिल्याशिवाय झोपायचं नाही.. आज आपण सर्व मिळून खाण्याचा आनंद घेऊ या. आज आणि आजपासून दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी! चलो, तो शुरू हो जाय!’’
त्या मुलांच्या हातात वडापाव होता आणि डोळ्यात पाणी! तोवर काही गुप्तहेरांकडून बातमी पोहचल्याने स्नेहा टीचरही तिथे येऊन थडकल्या. त्याही या खाद्यजत्रेत सामील झाल्या. पण आज खाण्याआधीच सर्वाचं पोट आणि मन दोन्ही भरलं होतं.
waglesampada@gmail.com