साहित्य – रिकामी काचेची/ प्लॅस्टिकची बाटली, फुगा, खोलगट कुंडा/ पातेले/ बादली, गरम पाणी, थंड पाणी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृती – प्रथम फुगा थोडा फुगवून तो रिकाम्या काचेच्या बाटलीच्या तोंडावर अडकवून घ्या. आता खोलगट कुंडय़ात थोडे गरम पाणी ओता. पाण्याचे तापमान अंदाजे अंघोळ करण्यासाठी जेवढे गरम पाणी घेतो तेवढे असावे. (पाणी उकळते असण्याची गरज नाही.) आता फुगा लावलेली बाटली कुंडय़ात ठेवा. (कुंडा पाण्याने पूर्ण भरण्याची गरज नाही. त्यात बाटली बुडवल्यावर पाणी बाहेर सांडू नये म्हणून तो कमी भरावा.) तुम्ही थोडासा फुगवलेला फुगा आणखी फुगून मोठा झालेला दिसेल.

आता बाटलीवर थंड पाणी ओता. किंवा ती बाटली थंड पाण्याच्या नळाखाली धरा. फुग्याचा आकार आपोआप कमी झालेला दिसेल.

असे का झाले?

वायू हा सूक्ष्म कणांपासून बनलेला आहे, ज्यांना रेणू म्हणतात. वायू गरम झाल्यावर हे रेणू जास्त वेगाने एकमेकांवर आपटू लागतात. यामुळेच बाटलीतील वायू प्रसरण पावून त्याचा दाब वाढतो आणि तो फुग्यात शिरून फुगा फुगतो. आपण ती बाटली थंड पाण्याखाली धरतो तेव्हा थंड पाण्यामुळे बाटलीतील वायूचे तापमान कमी होते आणि रेणूंचा हालचालीचा वेग मंदावतो व वायूचा दाब कमी होतो. फुग्याच्या स्थितीस्थापकत्वामुळे वायूचे रेणू पुन्हा बाटलीत येऊ  लागतात व फुगा पुन्हा पूर्वस्थितीत येतो.  हा प्रयोग तुम्ही या लिंकवर बघू शकता – https://www.youtube.com/watch?v=crmnfoQdBnM

मनाली रानडे  manaliranade84@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magic of hot and cold water