रात्रीचे दहा वाजून गेले होते. प्रसाद आपल्या खोलीत आला. तोंडावर लॉरी बेकरचं पुस्तक उपडं ठेवून दादा त्याखाली डाराडूर झोपला होता. दादाचं हे नेहमीचं होतं. दिवस-रात्र शिटस् बनवण्यात तो गढलेला असायचा. आणि मग जरा काही वाचायला घेतलं की त्याची ही अशी ब्रह्मानंदी टाळी लागायची. दादा उठणार नाही अशा बेताने प्रसादने पुस्तक अलगद उचलून ठेवलं आणि तो रायटिंग टेबलापाशी आला.
आजोबांनी वाढदिवसाला भेट म्हणून दिलेल्या डायरीत चार दिवसांपासून त्याने रोजनिशी लिहायला सुरुवात केली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या रोजनिशीतला एक भाग त्यांच्या नववीच्या मराठीच्या पुस्तकात धडा म्हणून होता. स्वमतावर आधारित प्रश्नांची चर्चा करताना बाई एक सुंदर वाक्य म्हणून गेल्या होत्या, ‘रोजनिशी ही जरी आपल्यापुरती नोंद असली, तरी पुढे जाऊन ती त्या विशिष्ट काळाचा आरसा होते. तो काळ समजावून देणारी एक महत्त्वाची नोंद ठरते.’
प्रसादला मनोमन हे पटलं होतं. म्हणूनच कालच्या दिवसाची राहून गेलेली आणि आजची नोंद तो एकदम करणार होता. आपली डायरी उघडून प्रसादने लिहायला सुरुवात केली.
दिनांक १२ सप्टेंबर
..आज सकाळी ठीक सात वाजता आम्ही सातारच्या कासच्या पठारावर पोहोचलो. प्रवेश थांब्यापाशीच मोठय़ा अक्षरात ‘जागतिक वारसा स्थळ’ अशी पाटी होती. सरांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने आम्हाला काम करायचं होतं. आमच्या भारत स्काऊटचा बालचमू आज इथे कामगिरी बजावणार होता. गाडीत बसूनच आम्ही पठारालगतचा रस्ता पार करून वाहनतळाकडे गेलो. इथे काही स्काऊट काम करणार होते. आम्ही म्हणजे, मी आणि आमचे इतर चार पेट्रोलवर पठारावर काम करणार होतो. त्याप्रमाणे आम्ही वर आलो. इथे जागोजागी तारेच्या कुंपणांनी वाटा रेखलेल्या होत्या. त्या कुंपणाच्या आत सुरेख फुलं उमललेली होती. वातावरणात छान गारवा होता. हलकंसं धुकंही होतं. ठरल्याप्रमाणे सरांनी आम्हाला कुंपणापाशी जिथे आमची डय़ुटी होती तिथे उभं केलं. ठिकठिकाणी कुंपण तोडण्याचा प्रयत्न झाला होता. आणि नेमक्या तिथेच काही कच्च्या तर काही रुंद, पक्क्या म्हणाव्यात अशा पायवाटा पडल्या होत्या. या पायवाटांवर एकही फूल उमललेलं नव्हतं. अशा अजून पायवाटा कुंपणाच्या आत तयार होऊ नयेत म्हणून आम्हाला जपायचं होतं. हीच आमची आजची डय़ुटी असणार होती. आम्ही नेमलेल्या जागी उभे राहिलो. हळूहळू गर्दी वाढायला लागली. सुट्टीचा दिवस असल्याने गाडय़ा भरभरून माणसं पठारावर येत होती. तारेच्या कुंपणापलीकडून फुलं निरखताना फोटो काढत होती. कोणतं फूल कसं दिसतं याचा विचार करण्यापेक्षा कोणता फोटो कसा आलाय यातच रस घेणारे अधिक होते. पिवळी नाजूक मिकी माऊससारखी कवळ्याची फुलं दुरूनसुद्धा देखणी दिसत होती. पण काही उत्साही वीरांना त्यांच्यामध्ये लोळत असल्याचा फोटो हवा होता. म्हणून कुठे कुठे तारा वाकवत ते आत शिरण्याचा प्रयत्न करीत होते. एका काकूंना तर आतल्या पायवाटांवर उभं राहून स्वत:चा, एकटीचा फोटो काढून डीपी ठेवायचा होता. त्या अगदी मागेच लागल्या होत्या.
फिल्ड ट्रिपवर आलेल्या एका विद्यार्थ्यांला हरबेरियम करण्यासाठी फुलंच नाही तर अख्खं झाडच हवं होतं. या सगळ्यांना अडवता अडवता अगदी नाकीनऊ येत होतं. कोणी हुज्जत घालत होतं तर कोणी इतरांना सोडलं तर आम्हाला जाऊ द्या म्हणून दंडेली करत होतं. काही चक्क नजर चुकवून आत घुसत होते.
खरं तर या भागात वाहनांना पूर्ण बंदी होती. पण त्या तेवढय़ाशा तारेच्या कुंपणाच्या मधल्या रस्त्याने एखादी चारचाकी घुसतच होती.
आम्ही आमची डय़ुटी इमानेइतबारे बजावत होतो. पण सारखी एक गोष्ट मात्र मनाला सलत होती. ही मोठी माणसं अशी का वागतात?
काल इथे कामाला येण्याआधी आम्हाला एक सुरेख फिल्म दाखवली गेली होती. त्यात या फुलांचं महत्त्व सांगितलं होतं. ही फुलं म्हणजे जैववैविध्याचा ठेवा आहेत. दरवर्षी नेमाने ती इथे उमलतात. त्यावर अवलंबून असणाऱ्या विविध कीटकांचे जीवनक्रम या फुलांच्या आधाराने पूर्ण होतात. अनेकांना अन्न मिळतं. कीटकभक्ष्यी वनस्पती तर इथे खूप प्रकारच्या आहेतच, पण भुई आमरीसारख्या जातीही इथे आहेत. इवलाली गवतफुलं तर इथलं वैभव आहेतच, पण या भागात जमिनीवर उगवणारी उपकारक बुरशी हीसुद्धा शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. या फिल्ममध्ये अनेक वनस्पती आणि कीटकांचं चित्रण केलं होतं. पण शेवटी एक चिंता व्यक्त केली होती की, हे सृष्टिवैभव जर आहे तसं जपलं नाही तर मात्र ते एक दिवस नाहीसं होईल.
दिवसभर इथं या फुलांच्या संगतीत राहताना मला ते म्हणणं पटलं होतं. आपण किती क्षुल्लक आनंदासाठी निसर्गाचा नाश करतोय. आपल्या सेल्फींपेक्षा सृष्टीचं चक्र अधिक महत्त्वाचं नाही का? का आपण त्याला असं पायदळी तुडवतोय?असे अनेक प्रश्न मनात येत होते. आमच्या सारख्या स्काऊटनी एक दिवस काम करून किंवा इथल्या वन खात्यातल्या लोकांनीच फक्त कष्ट घेऊन हा प्रश्न सुटणार नव्हता. त्यासाठी सगळ्यांनीच सहकार्य करायला हवं..
आज रोजनिशीत नोंद करताना मला एका बाजूला चांगलं काम केल्याचा आनंद वाटतोय, पण दुसऱ्या बाजूला हा जागतिक वारसा नष्ट झाला तर? अशी काळजीही वाटतेय. तसं झालं तर माझी ही नोंद बाई म्हणतात तशी पुढच्या पिढीसाठी एक कुतूहलाची नोंद ठरेल. पण सच्चा निसर्गप्रेमी म्हणून मी असं होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही सगळ्या स्काऊटस्नी एक शपथ घेतलीय. कास पठार किंवा त्यासारख्या इतर महत्त्वाच्या वारसास्थळांना जाणाऱ्या सहलीतील पर्यटकांना आम्ही त्याची जपणूक करण्याचे आवाहन करणार आहोत. त्यासाठी whats up, instagram आणि facebook सारख्या साधनांचा वापर करणार आहोत. आम्ही छोटेच आता हे मोठं काम हाती घेणार आहोत.
..शेवटचं वाक्य पूर्ण करून प्रसादने रोजनिशी बंद केली. तेव्हा एवढा वेळ मागे उभं राहून कौतुकाने वाचणाऱ्या आजोबांच्या नजरेत समाधान होतं आणि प्रसादच्या पाठीवरून त्यांचा थरथरणारा शाबासकीचा हात फिरत होता.
मैत्रेयी केळकर
mythreye.kjkelkar@gmail.com