आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलेल्या पुस्तकांमध्ये एकही पुस्तक कवितांचं नव्हतं. आता मात्र मी एक कवितासंग्रहाविषयी लिहिणार आहे. तुमच्यासारखाच कविता ऐकण्याचा माझाही प्रवास ‘अडगुलं मडगुलं’ सारख्या बडबडगीतांपासूनच सुरू झाला. गंमत म्हणजे, मला खूप मोठा, तीन-चार वर्षांचा होईतो ‘डोल बाई डोला’ची म्हणत आजी-मावशी आणि मामा खेळवायचे हे आठवतंय.
माझ्या आजोळी, पुण्याला वाडय़ातल्या शेजारपाजारच्या बिऱ्हाडांत खेळताना, काम करता करता शेजारच्या काकूने म्हटलेली गाणी अंधुकशी आठवतात. माझ्या आजीला तर इतकी गाणी, कविता पाठ होत्या, की ती तिने शाळेत तिच्या तिसरीत शिकलेली कविताही तोंडपाठ म्हणत असे. मनाचे श्लोक, शंकराचार्याचे श्लोक, तुकारामांचे अभंग, देवीचा जागर, भजनं, बहिणाबाईची गाणी आणि अनेक कवींच्या रचना, विशेषत: आजीच्या लाडक्या कवी गिरीश, वसंत बापट यांच्या कविता आजी मोठय़ा गोड आवाजात मला ऐकवायची.
या संस्कारांतूनच नकळत कवितेची आवड निर्माण झाली. पद्यातली लय, शब्दांतला नाद, छंदांची सोपी रसाळ रचना हे आवडायला लागलं. आजीच्या गळ्यातून ही गाणी- कविता ऐकताना एखादी रचना कळली नाही तर आजी त्यातली गोष्ट उलगडून सांगे. हळूहळू कवितेतल्या गोष्टींची गंमत उलगडायला लागली. कविता या फक्त क्लिष्ट, अवघड रचना नाहीत तर गोष्टींसारख्याच, कदाचित त्यांपेक्षा आकर्षक, नादमय असे शब्दांचे खेळ आहेत असं मला वाटू लागलं.
मी पहिली कविता केव्हा वाचली? शाळेतच असावी बहुधा. ‘आजीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक’ ही कवी केशवकुमार अर्थात अत्र्यांची कविता आवडली होती हे आठवतंय. त्यानंतर शाळेत शांताबाई शेळक्यांची ‘पैठणी’ ही कविता भावली होती. फ. मु. शिंद्यांची ‘आई’, विंदा करंदीकरांची ‘बागुलबुवा’, कुसुमाग्रजांची ‘महावृक्ष’ या शाळेतल्या पाठय़पुस्तकांमध्ये वाचलेल्या कविता मला खूप आवडल्या होत्या. त्यामुळे शाळेतल्या वाचनालयातून घेऊन मी या कवींच्या कविता वाचल्या. काही कळल्या, काही न कळल्या, पण भारावून वाचल्या.
घरी माझ्या स्वत:च्या पुस्तकांचा छोटा संग्रह तयार झाला होता. त्यातली सारीच पुस्तकं आई-बाबांनी दिलेली होती. शाळेतल्या किंवा आंतरशालेय स्पर्धातून बक्षीस म्हणून मिळालेली होती. मी स्वत: ती विकत घेतली नव्हती. तेरा-चौदा वर्षांचा असेन, तेव्हा बाबासोबत फिरायला बाहेर पडलो असताना पुस्तकांच्या दुकानात दोघं शिरलो. आमच्या घरी पुस्तकं आणि ताजी फळ-भाज्यांच्या खरेदीवर मला अजिबात र्निबध नव्हते. सहाजिकच पुस्तकांच्या दुकानात मी माझं पहिलं पुस्तक विकत घ्यायला सज्ज झालो. शाळेत मिळालेल्या बक्षिसाची रोख रक्कम माझ्याकडे होती. पुस्तकं चाळताना मंगेश पाडगावकर हे परिचित नाव दुकानात गवसलं. पुस्तक छोटेखानीच होतं, बाहेर काढलं आणि चाळायला लागलो. धम्माल कवितांचं हे पुस्तक होतं. कविता अस्ताव्यस्त होत्या, आजी म्हणायची तशा त्या शिस्तीच्या, छंदोबद्ध वगैरे नव्हत्या. मात्र, त्या कवितांना एक नाद होता. त्यात एक लय होती. योगायोगाने मी उघडलेल्या पानावर ओळी होत्या, ‘आंदा मांदा गिर गिर चांदा, गाणं होतं बोबडकांदा! गाणं चमचम चांदीचं, हिरव्या हिरव्या फांदीचं!’ गाणं झुळझळ वाऱ्याचं, ट्विंकल ट्विंकल ताऱ्याचं! या बडबडगीतासारख्या ओळींनंतर कडवं होतं, आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे!
तेरा-चौदा वर्षांच्या त्या आडनिडय़ा वयात या कवितांनी जादू केली. या कवितासंग्रहात चारोळ्यांसारख्या चिमुकल्या कविता होत्या, दोन-तीन पानं ऐसपैस पसरलेल्या कविता होत्या, प्रेमाच्या कविता होत्या, आजोबांवरच्या कविता होत्या, विनोदी, उपहासात्मक अशा अनेक वेगवेगळ्या कविता होत्या. माझ्या बालपणाच्या भावविश्वाशी नातं सांगणाऱ्या, निसर्गात नेणाऱ्या कविता होत्या. त्याचप्रमाणे त्या वयात आकर्षण वाटतील अशा प्रेमाच्या अलगद कविता होत्या. स्वत:च्याच प्रेमात पडायला लावणाऱ्या कविता होत्या. ‘बोलगाणी’ हा कवितासंग्रह त्या दिवसांपासून माझा झाला..
‘बोलगाणी’पासून पाडगावकरांच्या कविता वाचायला सुरुवात झाली. मग शाळेच्या वाचनालयात त्यांची बालकवितांची पुस्तकं सापडली- सुट्टी एके सुट्टी, आता खेळा नाचा, चांदोमामा.. ती एकामागून एक वाचून काढली. तोपर्यंत आठवी-नववी-दहावीच्या वर्गात बसायला लागलो आणि पुन्हा एकदा बोलगाण्यांचं पारायण झालं. प्रेमाच्या कवितांचे अर्थ नव्याने उलगडले, पावसातला रोमान्स नव्याने कळला, आणि तरुणपणाच्या उंबरठय़ावरचं पहिलं पाऊल पाडगावकरांच्या साथीने, त्या वयातला रोमान्स अनुभवत पडलं. मग धारानृत्य, जिप्सी, उत्सव, उदासबोध, छोरी, मीरा असे एकामागून एक, पाडगावकरांचे कवितासंग्रह वाचत गेलो. पुढे महाविद्यालयात त्यांना भेटण्याचे अनेक योग आले. त्यांच्या जवळ बसून कवितावाचनाचा आनंद लुटला. त्यावेळी लक्षात आलं, की पाडगावकर हा अत्यंत साधा सोपा माणूस होता. आनंदी असायचे. मिश्किल हसायचे. पोटभर बोलायचे. मनमोकळ्या कविता करायचे. मी त्यांचा चाहता झालो तो काही त्यांची बालगीतं वाचून नव्हे, तर माझ्या अल्लड अनघड वयातही त्यांच्या कवितेने मला आनंद दिला, संस्कार केले. त्यामुळे कविता सुचणाऱ्या त्या वयात या बोलगाण्यांमुळेच अशी कविता आपल्यालाही जमू शकते, चांगलं लिहिता येऊ शकतं हा आत्मविश्वास दिला. एक महत्त्वाची गोष्ट बोलगाण्यांनी केली, त्या अडनिडय़ा वयातल्या भावनांना विद्रुप-विरूप आकर्षणांपासून दूर ठेवत सुंदरतेचा, प्रेमाचा साज चढवला. तरुणपणाच्या उंबरठय़ावरचे ते बालपणाचे दिवस खूप साजरे-सुंदर केले.
हे पुस्तक कुणासाठी? कविता आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या छोटय़ा तरुण वाचकांसाठी.
पुस्तक : बोलगाणी
लेखक : मंगेश पाडगावकर
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
श्रीपाद ideas@ascharya.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा