बैठय़ा खेळांत सापशिडी, बुद्धिबळातील हत्ती-घोडे-उंटे किंवा पत्त्यांमधील मुंगूस, डॉंकी असो, आपल्याला हे प्राणी आणि खेळ लहानपणापासूनच आवडतात. पण फक्त लहानांनाच नाही तर मोठय़ांनाही डोकं शांत करायला (स्ट्रेसबस्टर) नेहमीच असा विरंगुळा लागतो. पूर्वी एकत्र बसून खेळले जायचे खेळ आता मोबाइल किंवा संगणकावर खेळता येतात.
एक कल्पक खेळ किंवा कलाप्रकार चीन या देशाने शोधला व तो आजच्या चिनी वस्तूंप्रमाणेच फोफावला. दिसायला सोपा, पण करायला कठीण असा कलाप्रकार म्हणजे टॅनग्राम! चीन देशात ४००० वर्षांपूर्वीच्या ‘टेन’ नावाच्या देवतेवरून हे नाव पडलं असावं. टॅन म्हणजे आकार!
‘ग्राम’ हा ग्रीक शब्द नंतर जोडला गेला असावा. सुंग (sung) राजवटीत टॅनग्राम चीनमध्ये लोकप्रिय झालं आणि हे लोण १८०० ते १८२० दरम्यान युरोपात पसरलं आणि लोक यासाठी वेडे झाले.
पण हे tangram आहे तरी काय?
टॅनग्राम म्हणजे एका चौरस आकाराच्या तुकडय़ात चौकोन, त्रिकोण असे ७ छोटे तुकडे असतात. चित्रात जोडल्याप्रमाणे ते एकमेकांसमोर- बाजूला लावून त्यातून विविध आकार निर्मिती करायची. आकार बनवताना ओव्हरलॅप करायला बंदी. पुन्हा जुना आकार मोडून नवा आकार शोधायला जायचं.
टॅनग्राम खेळाडूंनी किती लेव्हल पार केल्या.. सॉरी, किती आकार बनवता येतात तर ६५००! हा खेळ आहे, टाइमपास आहे, मानसशास्त्रीय तपासणी पद्धत आहे की कलाकृती आहेत?
उत्तर : हे सर्वच आहे.
सारं जग हे भौमितिक आकारात आहे असं काही चित्रकार मानायचे. आपणही बोलताना असंच म्हणतो ना- याचा चेहरा गोल आहे, याचा चेहरा चौकोनी आहे, वगैरे..
साधे भौमितिक आकार वापरून, (त्यात वर्तुळाकार नसतानाही ) आपला मेंदू नवे आकार कसा तयार करतो, झालेल्या आकारांना कसा अर्थ लावतो, हे त्यातून समोर येते.
विविध जलचर तुम्हाला चित्रात दिसतायेत. कासव, मासे, बगळे वगैरे आता कॉपी करायला सोपं आहे. पण नवीन बनवायला जरा कठीण करून बघा.
या कलेत होतं असं की, आपल्याला सर्व दृश्य सोप्या पद्धतीने पाहायची गरज असते. आपल्या मेंदूत सर्व गोष्टी प्रतिमेच्या स्वरूपात बसत असल्याने इतक्या सोप्या आकार-फॉर्मेशन त्याला सहज लक्षात राहते, पण त्याचे डिटेल मिळत नाही.
तुम्हाला केवळ आकारातून व्यक्त होता येते. म्हणजे घोडा काढलाय की झेब्रा, वाघ आहे की चित्ता हे आकारावरून कळणार. त्यात रंग, पोत असणार नाही. इथेच आपल्या कल्पनेचा कस लावावा लागतो.
हे आकार एकत्र आल्यावर त्यातले स्वत:ची ओळख विसरून ते पूर्ण आकृतीचा भाग बनते म्हणून वेगवेगळे छोटे आकार दिसत असूनही आपल्याला प्रतिमा या पूर्ण आकारच्याच दिसतात. हे कौशल्य आपल्या मेंदूचे.
जसं की तुकडय़ा तुकडय़ांतील सिनेमा पाहून आलो तरी आपल्याला स्टोरी पूर्ण कळलेली असते. आपण समोरच्याला सांगताना तुकडय़ा तुकडय़ांत सांगत नाही. अगदी तसेच!
त्यामुळे tangram समजून घेणं, त्याचा ‘आकार ओळखीचा’ सराव करणं हे बऱ्याच देशांतील मुलांच्या कलात्मक विकासासाठी वापरले जाते. आपल्याला याच खेळ वजा कला निर्मितीतून शिकायचाय..
याच्या सरावाने आपण दृश्यभाषा शिकू शकणार आहोत, समजू शकणार आहोत.
तुम्ही पण चॅलेंज म्हणून एक नवा प्राणी घेऊन सात तुकडय़ांत चित्र काढून दाखवा. चांगलं चित्र अंकात नक्की!
श्रीनिवास आगवणे
shreeniwas@chitrapatang.in