शाळा म्हणजे मुलांसाठी
नुसत्या भिंती नाही..
वाटते त्याला मंदिरातल्या
गाभाऱ्यासारखे काही..
पान वहीचे त्याच्यासाठी
नुसता कागद नाही..
भविष्य साकारण्याची त्यावर
दिली असते ग्वाही..
शाळेचा गणवेश म्हणजे
नाही नुसता वेष..
पुसून टाकतो अंतरातले
सारे वाईट द्वेष..
शाळेचा बाक मुलांसाठी
नाही नुसता ठोकळा
साऱ्या आठवणी जिव्हाळ्याच्या
असतात त्यात गोळा..
शिक्षक म्हणजे शिकवण्यासाठी
नाही नुसते माणूस हे,..
गुरुब्रह्म,गुरुर्विष्णू यांचीच उपमा ते..
– तनिष्का कैलास उतेकर, सरस्वती मंदिर, (मराठी माध्यम), ठाणे</strong>
ताई
तू माझी लाडकी,
तू मजला हवीहवीशी,
दु:खाच्या वेळी समजूत घाली,
तू माझी सवंगडी जशी
चिडले जरी मी कधी तुझ्यावर,
वाईट वाटून घेत नाहीस,
चूक माझी अंगावर घेऊन,
यशात वाटा घेत नाहीस
बोलले जर कोणी तुला,
हुं की चूं करत नाहीस,
पण शब्द माझ्या विरुद्ध,
तू ऐकून घेत नाहीस
करतेस मला नेहमी मदत,
तुझी मला कायम सोबत,
असतेस तू जेव्हा बरोबर,
भीती नाही मला कसली खरोखर
अभंग असू दे आपले नाते,
रोज मी हे देवा सांगे,
तू मला हवीहवीशी,
तू माझी सवंगडी जशी
– सोहा राजेंद्र खिसमतराव, होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल