कुरकुल्या बुरकुल्या
छानदार बारकुल्या
बांबूचा बिळसा
डौलदार वळसा
वीण किती झोकदार
चारी कोन टोकदार
ठमका ठुसका
नाजुक रुसका
पोरींच्या खेळातून
पोरांना हुसका
इवल्याशा खेळातल्या
लहानशा सुपल्या
चूल नि बोळकी
रंगीत सगळं
पोळपाट लाटणं
जातंही वेगळं
पोरी पिटुकल्या
भारी धिटुकल्या
भातुकलीच्या खेळात
स्वयंपाकाच्या घोळात
गूळ, खोबरं, शेंगदाणे
झालंच तर पोहे, चणे
पोह्य़ांचा भात बुरकुलीत
डाळ्याची भाजी कुरकुरीत
भात झाला गुरगुरीत
भाजी तेवढी कुरकुरीत
खोबरं नि दाणे
कुरमुरे नि चणे
मस्तच झाले
तोंडी लावणे
गुळाच्या लाटल्या पोळ्या
भातुकलीत रंगल्या सगळ्या
बुरकुल्या नि कुरकुल्या
खूप खूप मुरकल्या
इटकुल्या पोरींच्या
खेळात रंगल्या
चिटुकल्या पोरी
त्यांच्या किती परी
भातुकली संपली
मजा आली भारी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi poem