मेघना जोशी
एका डॉक्टरकाकांनी सुचवलेला हा हितशत्रू. ते म्हणाले होते, ‘लिहाच बरं का याच्यावर!’ पण जमतच नव्हतं पाहिजे तसं. त्यामुळे अनेक दिवस राहिलं. शेवटी काल विचार करता करता या हितशत्रूमागचं कारण समजलं आणि आज लिहायला बसले. त्यामुळे आज उलटं आहे बरं का! आधी उपाय नि मग हितशत्रू. हा हितशत्रू रुजण्याचं कारण आधी जाणून घेऊ. ते काढून टाकलं की योग्य उपाय झाला. नाही का? याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे- मला कोणीही वाईट म्हणता नये. आणि मी केलेल्या एखाद्या कृतीचा किंवा निर्णयाचा परिणाम चुकीचा, हानीकारक किंवा वाईट होता हे स्वीकारणं खूप कठीण जातं. म्हणजे समजलं ना, जर का हा हितशत्रू तुमच्यामध्ये असेल तर तो घालवून टाकण्यासाठी मला कधीतरी कुणीतरी वाईट म्हटलं तरी चालेल. आणि मी घेतलेल्या निर्णयाचे दुष्परिणाम मला किंवा इतरांनाही काही वेळा भोगावे लागू शकतात. या दोन्ही गोष्टी मान्य करायला पाहिजेत. खरंच, होतं ना असं कधीतरी सुरुवातीला. तुम्ही काहीतरी वेगळंच सांगत असता आणि जेव्हा परिणाम मनाविरोधी जातो तेव्हा तुम्ही पारडं बदलता आणि म्हणता, ‘मी तेच म्हणत होतो/होते.’ आजपासून असं म्हणू नका बरं का. जे काही म्हणायचं आहे ते आपलं म्हणा आणि त्यातून मनासारखं काही घडलं नाही तर कबूल करा की, ‘मी हे म्हणत होतो ते चूक होतं. मी तसंच म्हणायला हवं होतं. पण यानंतर मी असं म्हणूनही मी तेच म्हणत होतो..’असं अस्खलितपणे म्हणत काही नाकारू नका. थोडंसं कठीण झालंय का- समजलं नसेल तर मोठय़ांना विचारा. किंवा मलाच का नाही शंका विचारत?
joshimeghana231@yahoo.in