पहिल्या लेखांकानंतर तुमच्या एका काकांनी सुचवलेला हा महत्त्वाचा हितशत्रू. त्यांनी सुचवल्यावर मला आठवलं, वर्गात आरुणिमा सिन्हाच्या एव्हरेस्ट चढाईबद्दल सांगत असताना वर्ग भावुक झाला होता. त्यावेळी एकाने सहजच ‘त्यात काय एवढं?’ असं म्हटलं आणि आम्ही सारे भांबावलो. नंतर लक्षात आलं, हे मुद्दामहून केलं नव्हतं, तर ते सवयीतून झालं होतं. असा विचार करणं आणि त्याची सवय स्वत:ला लावणं हे दोन्हीही हितशत्रूच. म्हणून त्याबद्दल लगेचच बोलायचं ठरवलं.
आपल्याव्यतिरिक्त इतरांनी केलेली कोणतीही छोटी किंवा मोठी गोष्ट ‘त्यात काय एवढं?’ म्हणून सोडून देण्याची वृत्ती काही जणांपाशी असते, तर काही जण यशस्वी लोकांना अनुल्लेखानं मारून मानसिक त्रास देण्यासाठी सहजगत्या ‘त्यात काय एवढं?’ म्हणून जातात. काही मात्र आत्मप्रौढीपायी मीही ते करू शकतो असं सांगताना ‘त्यात काय एवढं?’ म्हणतात. अनेकदा ते बोलबच्चनच ठरतात, हा भाग वेगळा. दुसऱ्याचं यश पाहणं, आपण त्यात सहभागी होणं, त्याला त्याच्या यशाचं श्रेय देणं आणि त्यातून आपला आनंद द्विगुणित करणं हे निरोगी मनोवृत्तीचं द्योतक आहे. तर ‘त्यात काय एवढं?’ असं म्हणून त्याच्या आनंदावर पाणी ओतणं हे आपली मनोवृत्ती संकुचित असल्याचं द्योतक. त्यामुळे असा विचार करू नकाच आणि करतच असाल तर वाक्य थोडंसं बदला, स्वरात थोडा बदल करा. म्हणजे खालच्या स्वरात सरळ भावनेने विचारा, ‘एवढं काय बरं आहे त्यात?’ जे विशेष गुण दाखवणारं उत्तर मिळेल तेच असेल यशाचं वा प्रगतीचं गमक.
joshimeghana231@yahoo.in