हे थोडंसं मोठय़ा ताई-दादांसाठी आहे बरं का! पण ते तुम्हालाही लागू पडणारं आहे. जेव्हा आपण लहान असतो ना, तेव्हा सगळं म्हणजे अगदी सगळ्ळं ..जसं- आज शाळेत काय घडलं, कोणी मला मारलं, कोणी अजून काय केलं, नवीन काय घडलं, टीचर काय म्हणाल्या, ग्राऊंडवर काय घडलं.. असं सगळं घरी येऊन सांगायला आणि घरच्यांना ऐकायलाही खूप गंमत वाटत असते. शाळेत काही मनाविरुद्ध घडलं तर आई-बाबांनी त्याचा जाब विचारावा, मित्रांनी काही कागाळी केली तर त्याबाबत त्यांना समज द्यावी.. वगैरे अपेक्षित असतंच तुम्हाला.
पण जसजसे तुम्ही मोठे होत जाता, तसतसे आई-बाबांपेक्षा मित्रमंडळी जवळची वाटायला लागतात. त्यांच्याबरोबर राहणं आवडू लागतं आणि हळूहळू आई-बाबांना काही सांगणं बंद तरी होतं किंवा कमी कमी तरी होत जातं. मोठय़ा आणि छोटय़ा गोष्टीही त्यांना सांगणं बंद करता. ‘सांगायचंय काय त्यात?’ हा त्यामागे असणारा विचार. घरातून बाहेर पडताना कुठे जाणारेय, कुणाबरोबर जाणारेय, कधी परत येणार, काय काम आहे.. वगैरे म्हटल्या तर रोजच्या गोष्टीही सांगणं का कोण जाणे जिवावर येतं की नाही या विचारापायी? आणि नकळत तुम्ही तुमच्या जवळच्यांना दुखावता. त्यांच्या तुमच्यावरच्या प्रेमाचा अपमान करता, हे तुमच्या लक्षातच येत नाही. घरात जर आजी-आजोबा असतील आणि त्यांनी या संदर्भात काही प्रश्न विचारले तर अनेकदा तुमचा राग अनावर होतो. पण एकच विचार करा- ‘सांगायचंय काय त्यात?’ असं म्हणून सांगणं टाळलेल्या एखाद्या तुमच्या कृत्यामुळे तुमची हानी झाली, अनवस्था प्रसंग ओढवला, तुम्ही संकटात सापडलात, तर याच वडीलधाऱ्यांनी ‘मोठय़ांनी लहानांना समजून घ्यावं,’ असं म्हणत तुम्हाला मदत करावी अशी अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून ठेवताच ना! मग तसंच, तुम्ही काय करताय हेही त्यांना समजू दे ना! त्यासाठी ‘सांगायचंय काय त्यात?’ हे बाजूलाच काढून ठेवून महत्त्वाच्या गोष्टी वडीलधाऱ्यांना सांगत जाणं, हेच बरं नाही का!
joshimeghana231@yahoo.in