रात्रीचे दहा वाजून गेले होते तरी चाळीत आज एकच लगबग सुरू होती. गणपतीबाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी चालली होती. मधल्या पटांगणात मंडप बांधून तयार होता. काही जण देखावा करत बसले होते, तर कुणी मखर बनवण्यात गुंग होतं. पताका, झिरमिळ्या, दिव्यांच्या माळा लागत होत्या. गणपती जिथे विराजमान होणार होता ते टेबल सजत होतं. लहान मुले तर नुसती इथून तिथे बागडत होती; पण पराडकर काका आले आणि त्यांनी काकांच्या भोवती घोळका केला. ते मुलांचे एकदम लाडके काका होते, कारण ते छान-छान गोष्टी सांगायचे आणि निरनिराळी माहितीही द्यायचे. त्यामुळे मुलेही त्यांच्या गोष्टी खूप एन्जॉय करायची.
‘‘काय रे अमेय, अजून झाली नाही का सजावट?’’ काकांनी देखावा करत असलेल्या अमेयला विचारलं.
‘‘होतंच आलंय काका!’’ तो म्हणाला.
‘‘चालू द्या, चालू द्या!’’ काका तयारी न्याहाळत म्हणाले. मग ते घोळका घातलेल्या मुलांकडे वळले.
‘‘काका! खूप दिवसांत गोष्ट नाही सांगितली तुम्ही. आज सांगा ना एखादी.’’ घोळक्यातली एक लहान मुलगी म्हणाली. मंडपात सतरंज्या मांडून झालेल्याच होत्या. काका तिथे जाऊन बसले. सगळी चिल्ली-पिल्ली काकांची गोष्ट ऐकायला त्यांच्या समोर ठाण मांडून बसली.
‘‘आज तुम्हाला गणपतीबाप्पाबद्दल थोडं सांगतो. मला सांगा, आपण गणपतीला ‘ओंकार’ असंही म्हणतो. ओंकार म्हणजे काय?’’ काकांनी विचारलं. मुलांना सांगता येईना.
‘‘बघा, तिथे देखाव्यात अमेय दादाने ‘ओंकार’ काढलाय.’’ काका बोटाने दाखवत म्हणाले. मुलं बघू लागली.
‘‘अ-उ-म’ या स्वरांचा एकत्र उच्चार केला की ‘ओम’ तयार होतो. या ओंकाराच्या तीन मात्रा सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात- ‘अकार चरण युगुल’. ओममधला ‘अ’कार म्हणजे गणपतीचे दोन मांडी घातलेले पाय. ‘उकार उदर विशाल’, अर्थात ओम अक्षरातला ‘उ’कार म्हणजे गणपतीचे उदर, पोट. ‘मकार महामंडल’ म्हणजे गणपतीचं शीर, मस्तक. संत तुकाराम तर या ओंकार रूपाला ‘अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश’ म्हणतात. यालाही खूप मोठा अर्थ आहे- निर्माण करणारा ब्रह्मा, स्थिरता देणारा विष्णू आणि अंत करणारा म्हणजे महेश.’’ काकांनी समजावलं.
‘‘असं म्हणतात की, या ओंकाररूपी गणेशाने मोरावर बसून सिंधुरासुर आणि कमलासुर या असुरांचा वध केला. त्यामुळे संकटाचे हरण झाले, म्हणजेच सगळे मंगल झाले. ओंकाराने हे मंगल कार्य मोरावर बसून केले म्हणून प्रसन्न होऊन देवांनी ओंकाराचा आणि मोराचा एकत्र जयघोष ‘मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा करत ओंकारावर पुष्पवृष्टी केली.’’ काकांनी आणखी माहिती दिली.
‘‘पण काका, गणपती बाप्पाचं वाहन उंदीरमामा आहे नं, मग तो मोरावर का बसला?’’ एका छोटय़ा मुलीने निरागसपणे विचारलं. काकांना हसू आलं.
‘‘वेगवेगळ्या अवतारांमध्ये गणपतीची वेगवेगळी वाहनं होती. कधी तो मोरावर बसलेला असायचा, कधी सिंहावर. तर कधी वाघ किंवा घोडय़ावर. पण त्याचं उंदीर हे वाहन सगळ्यांत प्रचलित आहे. या सगळ्या दंतकथा आहेत. मुळात गणपतीचं रूप हे प्रतीकात्मक आहे. गणपती हे सूर्याचं प्रतीक आहे. आपण म्हणतो की नाही- ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’? गणपतीमध्ये कोटी – कोटी सूर्याचं तेज आहे. त्याचप्रमाणे उंदीर हे अंधारावर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे. उंदीर हा अज्ञानाच्या अंधाराला कुरतडून टाकतो आणि ज्ञानरूपी प्रकाश दाखवतो आणि ज्ञान म्हणजे गणेश. गणपतीला चार भुजा म्हणजे हात असतात. दोनाऐवजी चार – सगळी कामं दुप्पट वेगाने व्हावीत म्हणून. चार हातांपैकी दोन हातांमध्ये प्रत्येकी पाश आणि अंकुश ही आयुधं असतात. पाश म्हणजे दोरी – दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्यासाठी. त्याने काम नाही झालं तर अंकुश – एक टोकदार अस्त्र आहेच. पण हे करत असताना चांगल्या लोकांना आशीर्वाद देण्याकरिता वरदहस्त असतोच. आणि चौथ्या हातात असतो त्याचा लाडका मोदक. ‘मोद’ म्हणजे आनंद आणि ‘क’ म्हणजे देणारा. म्हणजे आपल्याला आनंद देतो तो- मंगलमूर्ती. या गणपतीबाप्पाचं पोट खूप मोठं असतं म्हणून आपण त्याला ‘लंबोदर’ही म्हणतो. मोठं पोट म्हणजे जीवनातले चांगले आणि वाईट अनुभव पचवण्याची क्षमता असणारं. आपण त्याला ‘एकदंत’ असंही म्हणतो. त्याचा अखंड दात म्हणजे दुष्ट प्रवृत्तींवर विजय दर्शवतो. त्याला एक अर्धा तुटलेला दातही आहे. तो दात चांगल्या गोष्टींसाठी केलेल्या समर्पणाचं प्रतीक आहे.’’ काका म्हणाले.
‘‘पण मग गणपतीबाप्पाला हत्तीचा चेहरा का असतो?’’ अजून एका लहानग्याचा प्रश्न.
‘‘त्याच्याही खूप दंतकथा आहेत. गणपती म्हणजे ‘गजानन’. ‘गज’ म्हणजे हत्ती आणि ‘आनन’ म्हणजे चेहरा. या गजमुखाला शास्त्रोक्त आधार आहे. हत्ती हा एक खूप हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहे. त्याला प्रचंड स्मरणशक्ती असते. तो शक्तिमानही आहे. त्याची सोंड खूप वैशिष्टय़पूर्ण आहे. तिची रचना अशा प्रकारे असते की ती कशीही वळू शकते. ती अलगदपणे एखादं गवताचं पातंही उचलू शकते किंवा मुळापासून एखादं झाडही उखडून टाकू शकते. जमिनीला स्पर्श करताच तिला लांब असलेल्या शत्रूची चाहूल लागते. त्याचप्रमाणे त्याचे सुपासारखे कानही त्याला शत्रूची चाहूल अगदी दूरवरून द्यायला मदत करतात. त्याची नजरही खूप तीक्ष्ण असते. गणपती हा ‘विघ्नहर्ता’ आहे. विघ्नांवर मात करायला तो हत्तीप्रमाणे बलवान आणि बुद्धिमान हवा नं?’’ काकांच्या गोष्टी ऐकण्यात मुलं अगदी रंगून गेली होती.
‘‘काका, पूर्वी गणपतीचा उत्सव हा फक्त घराघरांतूनच साजरा केला जायचा ना?’’ एकानं विचारलं.
‘‘हो! पण आता आपण सगळे मिळून, म्हणजेच सार्वजनिकरीत्या हा सण साजरा करतो. तुम्ही इतिहास शिकता ना शाळेत? मग मला सांगा, याची सुरुवात कशी झाली?’’, काकांनी विचारलं.
‘‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणपतीची सुरुवात केली.’’ एक मुलगी म्हणाली.
‘‘शाब्बास! १८५७ ला म्हणजे साधारण १०० – १५० वर्षांपूर्वी जेव्हा आपला देश स्वतंत्र नव्हता, तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध एक देशव्यापी बंड झाले; ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी खूप शौर्याने लढा दिला. मग अशा प्रकारे कुणीही भारतीयांनी सार्वजनिक पद्धतीने एकत्र येऊ नये, याकरिता ब्रिटिशांनी असा एक कायदाच अमलात आणला. म्हणून १८९३ मध्ये टिळकांनी त्या कायद्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याकरिता दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा मुंबईमधील गिरगावात केशवजी नाईक चाळीत आणि पुण्यामध्ये केसरी वाडय़ात केली. असं म्हणतात की, लोकांना एकत्र कसं आणता येईल याचा विचार करत गिरगाव चौपाटीवर समुद्रकिनारी बसल्या बसल्या लोकमान्य टिळक वाळूपासून गणपतीच्या मूर्ती बनवत असत.’’ काका माहिती देत होते.
इतक्यात कुणाचा तरी मोबाइल जोरात वाजला आणि सगळे भानावर आले. काकांनी घडय़ाळ पाहिलं. ‘‘अरे बापरे! चला. खूप उशीर झालाय. तुम्हीही आता घरी जा, मुलांनो. उद्या गणपती आणायला जायचंय ना?’’ काका उठत म्हणाले. ‘‘काका, थांबा. मीपण येतो.’’ अमेय काकांच्या दिशेने येत म्हणाला. तो त्यांच्याच मजल्यावर राहायचा.
‘‘अमेय! बाबा कसे आहेत रे आता?’’ इति काका. अमेयचे बाबा महिन्याभरापूर्वी लोकल ट्रेनमधून उतरताना धक्का लागून प्लॅटफॉर्मवर पडले आणि त्यांचा उजवा खांदा फ्रॅक्चर झाला होता.
‘‘आता बरे आहेत.’’अमेय म्हणाला.
‘‘आणि कारखाना?’’, काकांनी विचारलं. अमेयच्या बाबांचा गणपती बनवण्याचा कारखाना चाळीजवळच होता. चाळीतली सार्वजनिक गणेशमूर्ती आणि अनेक घरांमधल्या गणपतीच्या मूर्ती अमेयच्या बाबांच्याच कारखान्यातून यायच्या.
‘‘आई आणि मी बघत होतो बऱ्यापैकी. एरवी बाबाच सगळ्या मूर्तीचे डोळे रंगवतात. त्याचाच मुख्य प्रश्न होता. पण या वर्षी त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या आमच्या उस्मान चाचाने बरीचशी जबाबदारी उचलली. तो त्याच्या लहानपणापासून बाबांकडे कामाला आहे. आणि तसे बाबा होते सगळं सांगायला. शिवाय इतर कारागीरही होते. झालं व्यवस्थित.’’ अमेय म्हणाला.
‘‘अरे हो! तुझ्या बाबांना ‘आय स्पेशलिस्ट’ म्हणतात ना!’’, काकांनी विचारलं. अमेय त्यावर हसला.
‘‘आता उद्यापर्यंत सगळ्या मूर्ती जातीलही आपापल्या ठिकाणी. आता गणपती नेणाऱ्यांची गर्दी संपत आली होती म्हणून आलो इथे जरा मदतीला.’’ अमेय पुढे म्हणाला.
‘‘बरोबर आहे! एरवी असतोस तू इथे. पण बाबांचा हात प्लास्टरमध्ये म्हटल्यावर जबाबदारी तुझ्यावरच. हे गणपतीचं काम म्हणजे मोठय़ा जोखमीचं बाबा!’’ काका मान हलवत म्हणाले.
‘‘पण खूप मज्जा येते काका. मी इतके र्वष बाबांना बघतोय ना मूर्ती घडवताना! तसे साचे असतात. त्यामुळे मूर्ती झटपट बनतात. फक्त शाडूच्या मूर्तीना रंग देण्याचं काम थोडं काळजी घेऊन करावं लागतं. पण शाडूची मूर्ती दिसतेही एकदम सजीव. मूर्ती तयार झाल्यानंतर जेव्हा गणपतीचा शेला, कद, मुकुट, दागिने वगैरे रंगवून आणि सोंडेवरचं नक्षीकाम करून तयार होतं ना, तेव्हा एकदम सुरेख आकार येतो मूर्तीला.’’ अमेय सांगत होता.
‘‘मला सांग, गणपती बनवताना तुला सगळ्यात जास्त काय आवडतं?’’ काकांनी मुद्दामच विचारलं.
‘‘डोळे रंगवायला. मूर्तीचा सगळा जीव त्यातच असतो. मी तासन्तास बाबांना डोळे रंगवताना पाहिलंय. प्रेम, राग, माया हे सगळे भाव डोळ्यांतून लगेच प्रकट होतात. समजा, एखाद्या मूर्तीचे डोळे पाणीदार करायचे असतील तर आम्ही त्यांना एक निळसर रंगाची झाक देतो, की तो इफेक्ट बरोब्बर मिळतो. लोकंही बऱ्याचदा डोळे बघूनच मूर्ती निवडतात.’’ अमेय चटकन म्हणाला.
‘‘तुला खूपच माहिती आहे की! आता आठवीला आहेस ना? तूही बनवतोस मूर्ती?’’ काकांनी आश्चर्याने विचारलं.
‘‘नाही अजून, पण माती गाळून देणं, मळणं, गोळे करून देणं वगैरे कामं करतो मी. तयार मूर्तीना बॉडी कलर देणं, मुकुट, दागिने रंगवायचं सोनेकामही केलं मी या वर्षी. त्यात परीक्षाही होती. मग दुपारी शाळेतून आलो की पटकन अभ्यास करून घ्यायचो आणि नंतर लागायचो कामाला. मला मोठं होऊन बाबांसारखं हेच करायचंय. आणि फक्त गणपतीच नाही, इतरही मूर्ती घडवायच्या आहेत. मला जाम आवडतं.’’ अमेय उत्साहाने म्हणाला.
‘‘छान! गणपती ही कलेची देवता आहे. तुझ्यात ही कला आहे. ती नक्की जोपास.’’ काका म्हणाले.
‘‘होय काका!’’ अमेयने दुजोरा दिला.
‘‘पण काय रे, तुम्ही इतक्या मूर्ती बनवता. त्या तुमच्या कारखान्यातून जेव्हा जातात, किंवा त्यांचं विसर्जन होतं तेव्हा वाईट नाही वाटत?’’ काकांनी कुतूहलाने विचारलं.
‘‘हो! वाटतं की! आपण प्रत्येक मूर्तीवर इतकी मेहनत घेतो आणि त्यांचं दहा दिवसांनी विसर्जनसुद्धा होतं! पण खरं सांगू? जेव्हा आमच्या या मूर्ती आम्ही घराघरांतून, मंडपांतून दिमाखात विराजमान झालेल्या पाहतो तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो. आणि एरवी बाप्पालाही आपण ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणतोच की!’’ अमेय अगदी सहजपणे म्हणाला.
लहानपणी काकांकडे ‘गोष्ट सांगा’ म्हणून हट्ट करणारा अमेय आज अगदी मोठय़ा माणसांप्रमाणे बोलत होता. काका हसले आणि नकळत त्यांनी अमेयच्या डोक्यावर हात ठेवला.
प्राची मोकाशी – mokashiprachi@gmail.com