नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर साधारण १५ ते २० तारखेच्या सुमारास रात्री आकाशातून उल्कांची आतषबाजी आपणास दिसते. आकाशातील मघा नक्षत्रातून म्हणजे सिंह राशी विभागातून असंख्य उल्का कोणीतरी फेकीत आहे असे दिसते. अर्थात् खगोलात जसे दिसावे तसे नसावे असा नियमच आहे. या उल्कांचा उगम किंवा निर्मिती यात सिंह राशीचा काहीच वाटा नाही. टेंपल-टटल नावाचा एक धूमकेतू या उल्कांचा जन्मदाता आहे. हा धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतो. एका प्रदक्षिणेसाठी त्याला ३३ वष्रे लागतात. उल्का वर्षांवाच्या तीव्रतेचा आणि या प्रदक्षिणा काळाचा संबंध असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी विशिष्ट काळात हा उल्कावर्षांव होत असला तरी १७९९, १८३३, १९६६, २००१ इत्यादी वर्षी या उल्का प्रचंड प्रमाणात दिसल्या आहेत. ४ ते ५ तासांच्या काळात लाखो उल्का पडल्याची नोंद आहे.
एखादी उल्का सर्रकन् पडताना दिसते तेव्हा ‘तारा तुटला’ असं म्हणण्याचा प्रघात आहे. पण ताऱ्यांचा आकार, वस्तुमान, अंतर इ. गोष्टी लक्षात घेतल्या तर ‘तारा तुटणे’ ही अशक्य गोष्ट आहे, हे लक्षात येईल.
उल्केची शलाका क्षणार्धात दिसते. तिचा मार्ग तिरकस असतो हेसुद्धा पाहणाऱ्यांच्या लक्षात येते. उल्केचा आकार किती असावा? काही मिलीमीटर किंवा सेंटीमीटर. म्हणजे रस्त्यावर टाकतात त्या खडीचा तुकडाही त्यांच्यापुढे मोठा ठरतो. म्हणूनच बहुसंख्य उल्का वातावरणात शिरताना जळून नष्ट होतात.
क्वचित मोठे तुकडे पूर्णपणे जळू शकत नाहीत. ते जमिनीवर पडतात. त्यांना उल्का पाषा ण म्हणजे अशनी म्हणतात. म्हणूनच उल्का (meteor), उल्काश्म (meteroid) आणि अशनी (meteorite) यातला फरक आपण नीट समजावून घेतला पाहिजे.
उल्कांचे पडणे खाली सरळ रेषेत असत नाही. तो मार्ग वक्र दिसतो. कारण उल्का स्वत:च्या गतीने जात असते; परंतु त्याच वेळी तिच्यावर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करते. दोन्ही बलांचा एकत्रित परिणाम म्हणून पडणाऱ्या शलाकेचा मार्ग तिरका किंवा वक्र दिसतो. धूमकेतू जेव्हा सूर्याजवळ येतो तेव्हा सूर्याच्या आणि सौर वाऱ्यांच्या परिणामामुळे धूमकेतूतील द्रव्याचे कण त्यातून विलग होतात. असा कणांचा प्रचंड समुदाय मग त्याच कक्षेत, पण सूर्यापासून अलग राहून फिरतो. पृथ्वी या कणसमुदायाच्या सान्निध्यात येऊन मार्गक्रमण करीत असते तेव्हा हे अगणित कण उल्केच्या रूपाने, नव्हे उल्कावर्षांवाच्या रूपाने आपले अस्तित्व दाखवितात. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर माणसांची ये-जा असते, पण लोकल फलाटावर आली की डब्यातून माणसांचा लोंढा बाहेर पडतो, तसाच काहीसा हा प्रकार.
१५ नोव्हेंबरच्या सुमारास मघा नक्षत्र किंवा सिंह राशी विभाग मध्यरात्रीनंतर थोडय़ाच वेळात क्षितिजावर प्रवेश करतो. तेथपासून पहाटे हा भाग डोक्यावर येईपर्यंतचा काळ उल्का दर्शनास अनुकूल असतो. उल्कांची संख्या, त्यांच्या वर्षांवाचा दिवस, याबाबत निश्चित असे काहीच सांगता येत नाही. यामुळे १५ नोव्हेंबरच्या आसपासच्या रात्री दीर्घकाळपर्यंत थांबण्याची तुमची तयारी हवी. सोशिकता हवी. गेलो पटांगणात की झाली उल्कांची आंघोळ, अशा भ्रमात राहू नका. वेट आणि वॉच हे धोरण ठेवलेत तर लिओनिड्स नावाच्या या फुलबाजा तुमची अगदीच निराशा करणार नाहीत अशी आशा करू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा