बालमित्रांनो, आपण मागे ‘फळांच्या दुनियेत’ या लेखामध्ये वेगवेगळ्या फळांच्या बीजांचे वहन कसे होते, हे पाहिले. परंतु ते केवळ मोठय़ा वृक्षांच्या संबंधित होते. सध्या पावसामुळे वातावरण अगदी हिरवे होऊन गेले आहे. काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे, तर काही भाग मात्र अजूनही कोरडेच आहेत. परंतु निसर्गाचा अस्सल अनुभव घेण्यासाठी मात्र पावसाळ्यासारखा मोसम नाही. अनेक प्रकारच्या नावीन्यपूर्ण गोष्टी या पावसाळ्याच्या सुरुवातीस घडत असतात व यामध्ये सातत्याने बदल होत राहतात. आपल्यापकी किती जणांनी याची नोंद घेतली आहे? अगदी सहजच एक प्रश्न विचारतो, पहिल्या जोरदार पावसानंतर आलेली छोटीछोटी झाडे तुम्ही पाहिली आहेत का? खरं तर या छोटय़ा झाडांमध्येही फार वैशिष्टय़पूर्ण झाडे पाहायला मिळतात. साधारणत: पावसाळा सुरू झाला की पहिल्या १० ते १५ दिवसांमध्ये छोटीछोटी झाडे उगवून येतात. परंतु ही झाडे केवळ पुढील १५ ते ३० दिवसच जगतात. जसजसा जोराचा पाऊस सुरू होतो तसतशी वेगवेगळी झाडे उगविण्यास सुरुवात होते. साधारणपणे जुल महिन्यामध्ये पावसाचा जोर मोठा असतो. दुर्दैवाने या वर्षी मात्र तो पावसाचा जोर आपणास अजूनही पाहावयास मिळालेला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम या झाडांवर झालेला दिसत आहे. परंतु तुम्ही किती प्रकारची छोटी झाडे नव्याने उगवून येत आहेत, हे पाहण्यास हरकत नाही.
ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होतो व ही सर्व झाडे फुलावर येण्यास सुरुवात होते. ऑक्टोबर अखेपर्यंत सर्व झाडे आपला जीवनकाळ संपवून पुढील वर्षांच्या पावसाची वाट बघतात. तुम्ही कधी विचार केलाय का हो, की ज्या छोटय़ा झाडांचा जीवनकाळ चार महिन्यांमध्ये संपून जातो, ती झाडे पुन्हा पुढच्या वर्षी कशी उगवून येत असतील? त्यांनी तयार केलेल्या बिया कशा पद्धतीने दूरवर जात असतील? खरे तर यासाठी तुम्ही हे चार महिने तुमचा अभ्यास सांभाळून अगदी बारकाईने या छोटय़ा झाडांचे निरीक्षण केले पाहिजे. यासाठी एक छोटासा प्रयोग करून पाहूया.
आपल्या गावात असलेल्या कोणत्याही भातशेताच्या बांधाचे निरीक्षण करा. यामध्ये आपणास मोठय़ा प्रमाणात गवत उगवून आलेले आढळून येईल. याचबरोबर अगदी छोटीछोटी पांढऱ्या किंवा गुलाबी किंवा निळसर रंगाची झाक असलेली फुले फुललेली दिसतील. डोंगरउताराचा भाग असेल तर या डोंगरउतारावरील गवतांमध्येही अशी फुले फुललेली दिसतात. अर्थात, ही फुले अगदी छोटी असल्याने आपण कधी त्याकडे बारकाईने पाहात नाही. त्यामुळे त्यांची वैशिष्टय़े आपल्या सहज लक्षात येत नाहीत. तुम्ही जर अशी काही छोटी झाडे पाहून शक्य झाल्यास त्यांचे फोटो काढून पाठविले, तर त्याची विस्तृत माहिती देता येईल.
खरे तर या प्रत्येक छोटय़ा छोटय़ा झाडांचे स्वत:चे असे वैशिष्टय़ असते. तेरडय़ाची झाडे तुम्ही कधी पाहिली आहेत का? विशेषत: श्रावण महिन्यात ही तेरडय़ाची फुले अगदी तरारून येतात. या झाडांची फळे नारळाच्या आकारासारखी, पण अगदी छोटी असतात. ही फळे तयार झाल्यावर आपण त्याला अगदी जरादेखील धक्का लावला, तर एक छोटासा आवाज येऊन फुगा फुटावा तसे हे फळ फुटते व त्यातील बिया इतस्तत: पसरल्या जातात. गंमत म्हणून जरी आपण हे करून पाहिले तरी हे आपल्या सहज लक्षात येईल. अजून एक गंमत म्हणजे, या दिवसांमध्ये काही फळांना काटेरी बिया लागतात. या बिया अनेक वेळा आपल्या कपडय़ांना चिकटून बसतात. तुम्ही अशा काटेरी बियांचे नीट निरीक्षण करून बघा. त्यातील अनेक वेगवेगळ्या बाबी दिसून येतील. तरी या पावसाळ्यात पावसाच्या सुरुवातीस येणारी व नंतर येणारी झाडांची माहिती गोळा करा व त्यांच्या फुलांच्या व फळांच्या वैशिष्टय़ांचा अभ्यास करा.
डॉ. राहुल मुंगीकर – rahumungi@rediffmail.com
निसर्ग नवलाई : पावसाळ्यातील जीवसृष्टी
बालमित्रांनो, आपण मागे ‘फळांच्या दुनियेत’ या लेखामध्ये वेगवेगळ्या फळांच्या बीजांचे वहन कसे होते, हे पाहिले.
आणखी वाचा
First published on: 26-07-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon nature