माधवी वागेश्वरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळय़ाच्या सुट्टीत मी आणि आई आजीकडे गेलो. माझ्या आजीचं गाव पैठण. आजीकडे जाणाऱ्या गाडीचं नाव ‘लालपरी’ आहे. दुसऱ्या दिवशी आजीनं मला गोदावरी नदीवर नेलं. घरी आल्यावर भूक लागली म्हणून मी मॅगी मागितली तर आईनं मला डोळे वटारले. मी आईवर रुसले तेव्हा आजी म्हणाली, ‘‘तुझे गाल पुरीसारखे टम्म फुगलेत.’’

‘‘आजी गं, खोकला झालाय म्हणून आई मला पुरीपण देत नाही आणि आवडती मॅगीसुद्धा नाही.’’

‘‘मग आपण घरीच मॅगी तयार करू.’’

‘‘तुला येते?’’

‘‘हो.’’

मग आजीनं आणि मी शेतकरी ताईकडून गहू आणले. शेतीच्या शाळेत जाऊन शेती करणारी ती ताई शूर आहे असं आज्जीनं सांगितलं. आम्ही उन्हातून घरी आलो. आजीच्या घरात आलं की थंड माठात बसल्यासारखं वाटतं. आजीनं गहू परातीत घेतले आणि एका बाजूला केले. बाकीची परात रिकामीच. ती होती गव्हातल्या खडय़ांसाठी. गव्हातले खडे मी तुळशीच्या कुंडीत टाकले.

आजी म्हणाली, ‘‘चल, आता गहू पाण्यातून उपसू.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘बुचकळायचे.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘तू पोहायला जाती की नाई तिथं कधी कधी पटकन बुडी मारून वर येती की नाही तसं.’’

‘‘तसं का!’’

‘‘हा.’’

आजीनं गहू उपसले. आजोबांच्या पांढऱ्या स्वच्छ धोतरावर पसरले. दुपारी मी आजीच्या कुशीत आणि गहू धोतरावर झोपी गेले. उठल्यावर गहू छान वाळले. आजीनं त्यावर थोडंसं मीठ भुरभुरलं आणि गहू दिले गिरणीत दळायला. गिरणीच्या चोचीत गहू जात राहिले आणि पीठ खाली पडू लागलं. गिरणीत सगळीकडं पांढरं होतं. गिरणीवाल्या काकांचं नाव पिठाळमामा होतं. गव्हाचं पीठ मऊ मऊ होतं.

‘‘आजी, कधी तयार होणार मॅगी? तुझी २ मिनिटांत नाही का होत?’’ मी विचारलं.

‘‘जगात २ मिनिटांत काही नसतं होत सोनपिल्ल्या..’’  आजी म्हणाली. आजीला वाटतं मी सोनेरी पिल्लू आहे. आजीनं मग चाळणीनं ते पीठ आणखीन चाळलं आणि म्हणाली, ‘‘जा हे तांबट गोठय़ातल्या वासराला घालून ये.’’

‘‘तांबट म्हणजे?’’

‘‘भुसा गं भुसा’’

‘‘दादा मला म्हणतो डोक्यात भुसा भरलाय, तो हा असतो का गं?’’ आजी हसायला लागली. मला कळलंच नाही ती का हसतीये..

वासराला मी तांबट घातलं, त्यानं ते चुटुचुटु चाटलं. आजीनं पीठ भिजवलं

‘‘आता चांगलं ितबून घ्यायचं.. हे अस्सं.. आता याच्या तू आणि मी बोटय़ा बनवू..’’ बोटय़ा बनला गोल गोल माझ्या फ्रॉकच्या बटनासारखा. आणि मग तर आजीनं जादूच केली. मी तिला विचारलंसुद्धा, ‘‘तू हॅरी पॉटरमधल्या हर्मायनीची आजी आहेस का?’’

तिनं चक्क त्या बोटीतून बारीक धागा बाहेर काढला.. आणि मग ती तो काढतच राहिली.. लांब लांब गव्हाचा धागा.. आजीला हॅरी, हर्मायनी आणि रॉन माहित नाहीत. मी तिला त्यांची गोष्ट सांगणार आहे.

आता हे सूत या बोटावरून त्या बोटावर पुन्हा त्या बोटावरून या बोटावर..

‘‘आजी गं, दोऱ्याच्या खेळासारखं आहे ना..’’

‘‘बरोबर, हे गव्हाचं सूत आहे बकरू.’’ आजीला मी बकरीचं पिल्लूसुद्धा वाटते.

मग आजीनं ते सूत आडव्या काठीवर वाळत घातलं आणि सूत कातता कातता मला गोष्टी सांगितल्या.  रात्री मी आजीच्या कुशीत आणि आजीची मॅगी काठीवर झोपी गेलो. दुपारी आजीची मॅगी कडकडून वाळली. मला आजीनं पोटभर तिची मॅगी खाऊ घातली. ही मॅगी आईनंसुद्धा चाटून-पुसून खाल्ली.

आजीची मॅगी बनवायला मदत करणाऱ्या शेतकरी ताईला, आजोबांच्या धोतराला, उन्हाला, पिठाळ मामाला, चाळणीला, तांबट खाणाऱ्या वासराला, सूत वाळवणाऱ्या काठीला आणि आजीला मी  ३ँंल्ल‘ ८४ म्हणाले.  आजीच्या मॅगीचं नाव ‘शेवई’ आहे.

ही दोन मिनिटांत नाही बनत.. खूप वेळ घेते म्हणूनच एकदम टेस्टी लागते.

madhavi.wageshwari@gmail.com