मोहन गद्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनायक तसा बऱ्यापैकी हुशार मुलगा, अभ्याससुद्धा तसा मन लावून करायचा. पण एका गोष्टीची त्याला नेहमी रुखरुख लागून राहायची. त्याला कुठल्याच विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळत नसत. पण  त्याच्या आई-बाबांनी देखील तसा कधी आग्रह धरला नव्हता. त्यांची अपेक्षा असली तरी आग्रह मात्र अजिबात नव्हता. पण विनायकला मात्र त्या गोष्टीची खंत वाटत असे.

वार्षिक परीक्षा जवळ आली. विनायक सर्वच विषयांचा अभ्यास करण्यात मग्न होता. भूगोलाचा पेपर त्याला नेहमीच सोपा जात असे. पण दरवेळी दोन-चार मार्कानी पैकीच्या पैकी मार्कमिळण्याची संधी हुकत होती. त्याने विचार केला, आपण फक्त आणि फक्त याच विषयात कॉपीचा आधार घेतला तर? मग भूगोलात पैकीच्या पैकी मार्क मिळवणं सोपं होईल. आणि एकातरी विषयात आपण कधी तरी पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकू. पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा आनंद आणि मान एकदाच का होईना मिळायला हवा.

भूगोलाच्या पेपरच्या दिवशी त्यानं एक क्लृप्ती करायची ठरवली. भूगोलाचं गाईड मिळवलं आणि त्यातली काही पाने फाडून पॅंटच्या दोन्ही खिशांत नीट घडी करून ठेवून दिली.

भूगोलाचा पेपर सुरू झाला. वर्गातली मुलं पेपर सोडविण्यात मग्न झाली. शिक्षक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मधून फेऱ्या मारू लागले. एखाद्या मुलाचा संशय आल्यास त्याच्या पाठीमागे, गुपचूप उभे राहून, लक्ष ठेवू लागले. विनायक मनोमन घाबरला. पेपरमध्ये त्याचं लक्ष लागेना. शिक्षकांना आपला संशय येऊन आपले खिसे तपासले तर? या नुसत्या कल्पनेने त्याला पुरते अस्वस्थ करून सोडले. भूगोल त्याचा अगदी आवडता विषय, अस्वस्थ मनाने त्याला पेपरमधील सोप्या प्रश्नांची उत्तरेही  नीट आठवेनाशी झाली. त्याला घाम येऊ लागला, पण खिशातून रुमाल काढण्याचा त्याला धीर होईना. रुमालाबरोबर, गाइडची पाने बाहेर आली तर? ही भीती. त्याने भूगोलाचा पेपर कसाबसा पूर्ण केला. पेपरची वेळ कशीबशी एकदाची संपली. खिशातील गाइडची पाने शेवटपर्यंत बाहेर आलीच नाहीत. भूगोल आवडता विषय तरीही तो कसाबसा सोडवून तो शाळेतून बाहेर पडला आणि खिशात ठेवून दिलेली सर्व पानं त्यानं फाडून फेकून दिली आणि त्याला अगदी मोकळं मोकळं आणि छान वाटलं.

दुसऱ्या दिवशीपासून त्यानं सर्व विषयांचे पेपर अगदी तणावमुक्त मनाने लिहिले. त्याला आता कसली म्हणून कसलीच भीती वाटत नव्हती. येईल तो पेपर तो नििश्चत मनाने सोडवत होता. तणावमुक्त मनाने त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थित आठवत होती. आणि ती पेपरमध्ये उतरत होती.

यथा अवकाश परीक्षेचा निकाल लागला. भूगोलात हमखास चांगले मार्क्‍स मिळत असत, त्याच विषयात या वेळी मात्र कमी मार्क्‍स मिळाले. अर्थातच त्याच्या आई-बाबांना, या गोष्टीचे मोठे वाईट वाटण्याबरोबरच मोठं आश्चर्य वाटलं, पण विनायकला आता त्या एका न केलेल्या गुन्ह्याचं र्अधमरुध ओझंही मनावर ठेवायचं नव्हतं. त्यांनं आई-बाबांना, त्याचं ते अपयशी कॉपी प्रकरण सांगून टाकलं. आई-बाबासुद्धा ते ऐकून अवाक् झाले, आपल्या मुलाचा त्यांना राग आलाच, पण त्याच वेळी आपल्या मुलाला आयुष्यात एक चांगला धडा मिळाला आणि तो त्याचा त्यालाच मिळाला, या गोष्टीचं जास्त समाधान आणि आनंद झाला.

यावेळी भूगोलात कमी मार्क्‍स मिळाले म्हणून विनायकच्या एकूण गुणांक मिळवण्यात कमतरता राहून गेली. या गोष्टीचं विनायकला आणि त्याच्या आई बाबांना वाईट वाटलंच, पण जे काही यश मिळालं ते निर्भेळ असंच होतं आणि त्याचा मात्र आनंद खूप मोठा होता. आणि तोच खरा. यशस्वी किंवा अयशस्वी ठरलेल्या लहान-मोठय़ा गुन्ह्यांची बोच पुढील आयुष्यभर माणसाच्या मनाला टोचणी देत राहते. विनायक त्यातून सुटला होता.  gadrekaka@gmail.com