मित्रांनो, याआधीच्या लेखांकात आपण अवघड विषय सोपे करण्याबाबत बोललो होतो. अवघड विषय अवघड का वाटतो, तर तो विषय शिकून फायदा काय, किंवा त्याचा अभ्यास करून मला काय मिळणार, असा विचार! अनेकदा हा फायदा किंवा ही मिळकत मार्काशी जोडली जाते. जसे की, गणित किंवा पूर्ण संस्कृत या विषयांची ओळख दहावीच्या टक्केवारीत वाढ करणारे विषय अशी आहे. त्यामुळे ते आवडते झालेले दिसतात. पण चित्रकला, शारीरिक शिक्षण किंवा कार्यानुभव यांसारख्या विषयांचा काय फायदा? म्हणून हे विषय दुर्लक्षिले जातात. आता थोडा वेळ ही तात्पुरत्या फायद्याची गोष्ट बाजूलाच ठेवू आणि दूरगामी फायद्यांचा विचार करू.
भाषा शिकून काय मिळते, असा प्रश्न अनेकजण विचारतात. खरे तर बोलणे, ऐकणे, वाचणे, लिहिणे ही मूलभूत कौशल्ये आहेत आणि ही भाषिक कौशल्ये प्राप्त झाली की कोणत्याही शालेय विषयात सुयश प्राप्त होते. हे समजल्यावर अवघड वाटणाऱ्या भाषा जोमाने अभ्यास करून सोप्या करण्यासाठी प्रयत्न कराल ना!
अनेकदा बीजगणित व भूमितीवर ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून त्यांना वाळीत टाकले जाते. पण हेच विषय तुमचा विचार व तर्क योग्य दिशेने वळविण्यासाठी, अपयश आल्यास न हरता पहिल्यापासून पुन्हा सुरुवात करण्यासाठी, दिलेल्या माहितीचे अचूक विश्लेषण करून योग्य मार्ग निवडून अपेक्षित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोलाची मदत करतात. मित्रांनो, इतरांबद्दल चर्चा करण्यात रस असणे ही नैसगिक मानवी प्रवृत्ती आहे. पण माझं शरीर कसं काम करतं, माझ्या घरातील यंत्रे कोणत्या तत्त्वावर चालतात वगैरेंसारख्या ‘माझ्या’ प्रश्नांची उत्तरे देणारे विज्ञान फक्त मार्कासाठी अभ्यासायचे का? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांकडे साधारणत: पाठांतराचे विषय असा शिक्का आहे. पण इतिहास भूतकाळाची जाण देतो, भूतकाळात ज्या विस्मयकारी घटना घडून गेल्या असतील त्यांचा वर्तमानकाळात उपयोग करण्याची शक्ती देतो. भूगोलामुळे वेगवेगळे प्रदेश ज्ञात होतातच, पण नैसगिक, सामाजिक विविधता व एकता यांचीही जाणीव होते. आणि महत्त्वाचे म्हणजे- या दोन्ही विषयांतून कल्पकता बऱ्यापैकी विकसित होऊ शकते. सक्ती केली जाते म्हणून कार्यशिक्षण घेणारे सगळेच असतात, पण या शिक्षणातून कौशल्ये शिकणे, त्यांचा सराव करणे व पुढील आयुष्यात उपजीविकेचे साधन म्हणून ते वापरणे याचे फार महत्त्व असते. त्याबरोबरच स्वत:ची ओळख करून घेण्यासाठी व सौंदर्यमूल्यांची जोपासना करण्यासाठी हे विषय खूप महत्त्वाचे ठरतात. शारीरिक शिक्षणाचा विचार केल्यास शिर सलामत तो पगडी पचास यानुसार इतर विषयांच्या अभ्यासासाठी लागणारे शारीरिक, मानसिक व मनोसामाजिक आरोग्य त्यामुळे प्राप्त होते. हे सर्व लक्षात घेतल्यावर फायदा काय, असे म्हणून एखाद्या विषयाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याआधी ‘फायदा काय?’ हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढेल, नाही का?
मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com

Story img Loader