‘‘वैताग आला नुसता ते ‘अडगुलं मडगुलं’ ऐकून ऐकून. मावशीऽऽ हसू नकोस. या केतकीलाही विचार.’’ रोहन जरा कावलेल्या स्वरातच म्हणाला.
‘‘अरे रोहन, पण ते गाणं ऐकलं की बाळ रडायचं थांबतं की नाही?’’ मावशी रोहनला समजावत म्हणाली.
‘‘मावशी, रडायचं थांबतंच, पण खूप हसतंसुद्धा. पण त्याला सारखं सारखं ते नाही तर ‘आपडी थापडी गुळाची पापडी’ म्हणायला हवं असतं. काही अर्थ तरी आहे का या गाण्यांत?’’- इति रोहन.
‘‘नसू दे रोहन, पण बाळ आपल्या बोलण्याकडे लक्ष देतं. या गाण्यांतूनच सगळी बाळं भाषा शिकतात. तुम्हीसुद्धा तसेच शिकलात, कारण या बडबडगीतांना छान लय, नाद असतो. अरे, सगळ्यांनाच सुरुवातीला राजा-राणी, बिरबल, पंचतंत्र, इसापनीती, वेताळ पंचविशी, सिंदबादच्या सफरी, भुताखेतांच्या गोष्टी आवडतात; पण पुढे जसजसे मोठे होऊ लागतात तशी ही आवड बदलते.’’ एव्हाना मुलाच्या मावशीची शिकवणी सुरू झाल्याचं लक्षात आलं.
‘‘हो, मावशी! श्रावणात आजी सोमवारची, शुक्रवारची कहाणी सांगायची ना, त्याही खूप आवडायच्या, पण आता नाही आवडत.’’ रोहननं जाहीर करून टाकलं.
‘‘अशा या कहाण्यांमधून व्रतवैकल्यं, परंपरांची माहिती कळते. एक गंमत सांगू का तुम्हाला रोहन- केतकी.. आपली ती गोष्ट आहे ना कावळा चिमणीची?..’’
‘‘हो! हो! माहिती आहे तर-
‘चिमणीचं घर होतं ऽऽऽ मेणाचं!
एके दिवशी काऽऽय झाऽऽऽलं?
खूऽऽऽऽप मोऽठ्ठा पाऊस आला.’’
दोघंही एकाच सुरात म्हणाले.
‘‘अरे वा! तुम्ही दोघांनी तर साभिनय सांगितली ही गोष्ट.’’
‘‘मावशी, अगं तशीच सांगतात ही गोष्ट.’’ – केतकी.
‘‘बरोबर, पण त्यामुळे काय होतं, की जी गोष्ट बाळाची आई-आजी सांगत असतात तीच गोष्ट तशाच पद्धतीनं कुणी घरी आलेल्या पाहुण्यानं सांगितली की बाळाला तो पाहुणा आपलासा वाटतो आणि बाळ नात्यानं माणसांशी, समाजाशी या भाषेमुळे, कथांमुळे जोडला जातो.’’
‘‘एवढं सगळं होतं भाषेमुळे?’’ रोहनने जरा आश्चर्यानेच विचारलं.
‘‘मग आज ही कहाणी ऐका. खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे हजार-बाराशे वर्षांपूर्वीची गोष्ट. एक आटपाट नगर होतं. त्याचं नाव महाराष्ट्र. तिथे एक राजकन्या होती. इतकी सुंदर की, इतर लोक आपल्या ग्रंथांमधून तिचे वर्णन करीत. बाराशे वर्षांपूर्वीच्या ‘कुवलयमाला’ (इ.स. ७७८) या ग्रंथात-
‘दडमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसिले य।
दिण्णले गहिल्ले उल्लविरै तत्थ मरहट्टै।।’ असं म्हटलं आहे. कळलं नाही ना काही? अरे, याचा अर्थ असा की, ही राजकन्या ज्या महाराष्ट्र देशाची होती त्यांचे हे वर्णन- मराठी माणूस बळकट, काटक, मध्यम चणीचा, सावळ्या रंगाचा, सहनशील, पण अभिमानी, भांडखोर, दिले-घेतले असे म्हणणारा. बघा, ही आपली मराठी माणसाची ओळख, १२०० वर्षांपूर्वीपासूनची! वादविवादाला सतत उत्सुक असे आपण.
‘धर्मोपदेशमाला’ (इ.स. ८५९) या ग्रंथात मराठी राजकन्येला सुंदर कामिनी म्हणून तिला ‘नदीप्रमाणे सहज गतीची, सुवर्णासारख्या झळाळत्या रंगाची, मदनाने उद्दाम’, असे तिचे वर्णन केले आहे.
सोमेश्वर राजाने (इ.स. ११२९) आपल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात या देशीच्या स्त्रिया दळणकांडण करताना ओव्या गातात, असे सांगून काही ओव्या दिल्या आहेत. हे तिचे आभूषणच आहे. पुढे तिच्याच राज्यातल्या अनेकांनी राजकन्येबद्दलचा अभिमान वेळोवेळी व्यक्त केला आहे.
ज्ञानेश्वरांनी आमची मराठी राजकन्या अमृतालाही जिंकेल अशी आहे, तिच्याद्वारे मी ‘बोली अरुपाचे रूप दाविन’ असा विश्वास व्यक्त केला. म्हणजे या राजकन्येत एवढे सामथ्र्य आहे की, पंचेंद्रियांना न आकळणारे तिच्याद्वारे सर्वसामान्यांपर्यंत मी पोहोचवू शकेन, असं म्हटलं आहे. चक्रधरस्वामींनी तर या राज्यकन्येकरवीच आपले तत्त्वज्ञान मांडले आणि आपल्या शिष्यांनाही या राज्यकन्येचाच आसरा घ्यावा, असा आग्रह केला.
एकदा काय झालं, धानाईसा नावाची मुलगी रडत होती आणि तिच्या आईला तर पाण्याला जायचं होतं म्हणून तिने चक्रधरस्वामींना त्या छोटीला रिझवायला सांगितलं. तेव्हा त्यांनी याच ‘मराठी राज्यकन्ये’च्या खजिन्यातली कावळा-चिमणीची गोष्ट सांगून तिला शांत केलं. ही पहिली गोष्ट. तेव्हापासून आजपर्यंत ती तशीच चालत आली आहे.’’
‘‘म्हणजे मावशी, त्याच्या आधी गोष्टी नव्हत्याच का?’’ केतकीचा प्रश्न.
‘‘नाही हं! मराठी राजकन्या काही अशी तशी नाही. चक्रधरस्वामींनी आपल्या पंथाचं तत्त्वज्ञान ‘सात आंधळे आणि हत्ती’सारख्या कथांचे दृष्टान्त देऊनच सांगितलं आहे. आपली पुराणं, रामायण, महाभारत, पंचतंत्र, हितोपदेशपासून या कथा चालत आल्या आहेत. अनेक जण आपल्या भारतीय लोककथेला जागतिक लोककथेची जननी मानतात. अरे, या कथा पऱ्याच जणू. त्या आपल्या पंखांनी उडत उडत जगभर प्रवास करतात. आपली राजकन्यासुद्धा कथा, गीतं यांनी समृद्ध आहे. कथा होत्याच, पण लिहिलेली अशी ही पहिलीच गोष्ट. तशी अत्री ऋषींची मुलगी ‘अपाला’ हिची कथा ऋग्वेदाच्या आठव्या मंडलात एक्याण्णवाव्या सूक्तात आली आहे, म्हणजे साधारण चार-पाच हजार वर्षांपूर्वी; पण त्यापूर्वीही माणसं चटकदार गोष्टी ऐकत असणारच.. आपण पुन्हा आपल्या राजकन्येकडे वळू या. सोळाव्या शतकातील दासोपंत म्हणतात- संस्कृतमधील एका घट या शब्दाला हारा, डेरा, रांजण, सुगड, घडा, घागर असे अनेक शब्द राजकन्या मराठीच्या खजिन्यात आहेत.’’
‘‘आणि मावशी, त्या प्रत्येक शब्दामुळे आकाराचं वेगवेगळेपणही लक्षात येतं.’’ रोहनने या शब्दांमधलं वेगळेपण अचूकपणे ओळखत सांगितलं.
‘‘अरे, हीच तर या राजकन्येची गंमत आहे. तिच्याकडे खूप पर्याय आहेत. साधं प्राण्यांना हाकलायचं झालं तरी बघ- कुत्र्यासाठी ‘हाड् हाड्’, मांजरीला ‘शुक शुक’, गाढवाला ‘झ्या झ्या’ आणि घोडय़ाला ‘हॅट- हॅट’, तर म्हशीला ‘हल्याऽऽ’ अशा वेगवेगळ्या शब्दांचा वापर आपण करतो आणि हे सगळं काशिनाथ साने यांनी कवितेतून मांडलं आहे.
सोळा-सतराव्या शतकातील ‘फादर स्टीफन्स’ वेगळ्या धर्माचे वेगळ्या देशीच्या राजकन्येचे पाईक असूनही त्यांनी आपला धार्मिक ग्रंथ ‘ख्रिस्तपुराण’ लिहिण्याकरिता आपल्या मराठी राजकन्येचा आश्रय घेतला आणि त्यात ते म्हणतात- ‘फुलात फूल जसं मोगरा, सर्व पक्ष्यांमध्ये जसा मोर, सर्व सुगंधांत जसा कस्तुरीचा परिमळ तशी ही राजकन्या सर्व राण्यांमध्ये साजरी आहे.’ अशी खूप जणांनी तिची तारीफ केली असली तरी परकीयांना तिला समजून घेताना मोठे मजेदार अनुभव येतात. ‘मॅक्सिन बर्नसन’ म्हणतात- भांडखोरपणाची वृत्ती या मराठीमध्ये भिनलेली आहे आणि लिपीबरोबरच ते बाळकडू पाजले जाते. अक्षरांचे पाय मोडले जातात, तर एखाद्या अक्षराचे पोट फोडले जाते.. लोक एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसतात, आई-बाप लहान मुलांचे कान उपटतात, तर मुलं आई-बाबांच्या डोक्यावर मिरी वाटतात. खाण्याबद्दल म्हणाल तर मराठी माणसे वाट्टेल ते खातात. डोके खातात, वेळ खातात, पैसे खातात, बोलणी खातात आणि मारसुद्धा खातात. गंमत आहे नं? आपण सहज बोलतो तेव्हा लक्षातच येत नाही.’’
‘‘हो! पण मी ‘रोहन, माझं डोक खाऊ नकोस’ असं म्हटलं, की सगळ्यांना त्याचा अर्थ बरोब्बर कळतो.’’ केतकी रोहनला चिडवत म्हणाली.
‘‘मग तू आता मार खा.’’ रोहननेही केतकीला प्रत्युत्तर दिलं.
‘‘पुरे! पुरे! आता दोघं जण भांडण नका सुरू करू. आता हल्ली तुमच्या पिढीची संगणकाची वेगळीच भाषा आली आहे. कधी ती आद्याक्षरं, कधी प्रतिमा घेऊन अगदी थोडक्यात मुद्दा सूचित करते. प्रत्येक व्यवसाय, ऑफिस, शाळा यामधून त्यांची त्यांची स्वतंत्रच शब्दयोजना असते.
अनेक बोली, अनेक भाषांना आपलंसं करून, देवाणघेवाण करून या हजारभर वर्षांत प्रवास करत, समृद्ध होत, रूपं बदलत ही इथवर आली आहे. ज्ञानेश्वरांच्या काळची, शिवाजी-पेशव्यांच्या वेळची, अगदी पन्नास वर्षांपूर्वीची ती बदलत गेली. कविता, कथा, कादंबऱ्या, निबंध, चरित्र-आत्मचरित्र यांनी ती बहरत गेली. ज्ञान- तत्त्वज्ञानही व्यक्त करणारी ही राजकन्या म्हणजे आपली मातृभाषा मराठी.’’
‘‘मावशी, तिची ही कहाणी मात्र आम्हाला आवडली. आता आम्हीसुद्धा शब्द, म्हणी यांचे अर्थ शोधू, त्या वापरू. नवनव्या कथा-कविता वाचू. मराठीतंच बोलू. मावशी, आम्हाला सुरेश भट यांची एक कविता होती-
‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’
या ओळींचा अर्थ आता खरा कळलाय.’’ रोहन खुश होऊन म्हणाला.
मीना गुर्जर meenagurjar1945@gmail.com