नदीकाठच्या कपारीत लांब शेपटी असलेला, हिरव्या रंगाचा एक सरडा राहायचा. त्याला सगळे बुद्दू म्हणायचे. एके दिवशी सकाळी जाग आल्यावर बुद्दूने आळोखेपिळोखे देत एक मस्त जांभई दिली. गेल्या काही दिवसांत त्याने थोडय़ा फार माशा पकडणे, एक दोन किडय़ांचा पाठलाग करणे आणि झोपणे एवढेच काय ते केले होते. अशा नीरस आणि कंटाळवाण्या आयुष्यात चतन्य आणण्यासाठी त्याला त्या दिवशी कोणाची तरी गंमत करण्याची खुमखुमी आली.
त्या भागातले सगळे प्राणी आणि पक्षी रोज आपापले काम झाले की नदीकाठी गप्पा मारायला जमत असत. बुद्दू त्यांना भेटायला नदीकडे निघाला. वाटेत त्याला झाडाच्या ढोलीतून घुबडाचा घू घू आवाज आला. घुबडाकडे बघायला बुद्दूने मान वर केली तर त्याला झाडाच्या फांद्यांमध्ये लपलेले कावळ्याचे घरटे आणि शेजारी बसलेला कावळा दिसला. बुद्दू आणखी थोडा पुढे गेला तर त्याला एका घराच्या खिडकीवर कबुतर आपल्या घरटय़ातल्या अंडय़ावर बसलेले दिसले. तो सगळ्यांकडे बघून हसला आणि तसाच पुढे चालू लागला. नदीजवळ पोचल्यावर तिथे बुद्दूला वाळूतल्या एक खड्डय़ात पानांनी आणि गवताने तयार केलेले बदकाचे घरटे दिसले. त्याने आत डोकावून बघितले तर त्यात पिवळट रंगाची काही अंडी होती. चालता चालता त्याच्या लक्षात आले की वाटेत दिसलेल्या त्या सगळ्याच घरटय़ांमध्ये अंडी होती.
बुद्दूचे डोळे एकदम चमकले. त्याच्या छोटय़ाशा मेंदूत एक भन्नाट कल्पना आली. घरटय़ातले पक्षी नदीवर पाणी प्यायला किंवा आपले भक्ष शोधायला गेले की त्यांच्या घरटय़ातल्या अंडय़ांची अदलाबदल करायची असे बुद्दूने ठरवले. त्यानंतर कशी मजा येईल याची कल्पना करून तो स्वत:शीच हसला. तेवढय़ात त्याला कावळा आणि कावळी झाडावरून उडून जाताना दिसले. मग तो सपासप त्या झाडावर चढला आणि कावळ्याच्या घरटय़ात डोकावला तर तिथे पाच अंडी होती. बुद्दूने त्यातले एक अंडे उचलले आणि आपल्या शेपटीवरच्या खवल्यांमध्ये नीट पकडून तो घुबड ढोलीतून जाण्याची वाट बघत बसून राहिला. घुबड उडून गेल्यावर तो खाली आला आणि ढोलीत वाकून बघितले. तिथे त्याला बरीच अंडी दिसली. बुद्दूने मग तिथे कावळ्याचे अंडे अलगद ठेवले आणि घुबडाचे एक अंडे असेच आपल्या शेपटीत नीट पकडून आपला मोर्चा शेजारच्या घराकडे वळवला. कबुतर जागेवर नाही असे बघून त्याने घुबडाचे अंडे कबुतराच्या घरटय़ात ठेवले आणि कबुतराचे अंडे उचलून नदीकाठच्या बदकांच्या अंडय़ांमध्ये नेऊन ठेवले.
मिस्किलपणे हसून तो सगळी घरटी दिसतील अशा बेताने एका दगडामागे लपून बसला. हळूहळू सगळे पक्षी आपापल्या घरटय़ात परतले. कावळा-कावळी आपल्या घरटय़ापाशी आल्यावर त्यांच्या लक्षात आले की तिथे पाचच्याऐवजी चारच अंडी आहेत. कावळा काव काव करत इकडे तिकडे आपले अंडे शोधायला लागला. कावळी तर रडायलाच लागली. घुबड परत आले तर त्याला झाडाच्या ढोलीत एक वेगळेच अंडे दिसले. पण त्याकडे फारसे लक्ष न देता आई घुबड त्या अंडय़ावर जाऊन बसली. कबुतर जेव्हा आपल्या घरटय़ात आले तेव्हा एकच अंडे मोठय़ा आकाराचे आहे असे त्याला वाटले. तेव्हा त्याच्या मनात आले की आता आपले एक पिल्लू जरा मोठे असणार आहे; पण ते आपल्या इतर पिल्लांची छान काळजी घेईल. बदकाची अंडी गवतात लपली होती. त्यामुळे त्यातले वेगळे अंडे त्याच्या लक्षात आले नाही. ते आपल्या अंडय़ांवर जाऊन बसले.
काही दिवसांनंतर झाडाच्या ढोलीजवळ खूप गोंधळ चाललेला दिसला. बुद्दू पळतपळत दगडामागे जाऊन लपला आणि काय चालले आहे ते बघायला लागला. घुबडाच्या अंडय़ातून सहा तपकिरी रंगाची आणि एक काळेकुट्ट पिल्लू बाहेर आले होते. आपले पिल्लू असे कसे दिसत आहे हे त्याला काही कळेना. ते घू घू करून ओरडून पिल्लांच्या वडिलांना बोलावू लागले. त्याचा आवाज ऐकून कावळा तिथे आला आणि काय झाले विचारू लागला. ते काळे पिल्लू बघून कावळा म्हणाला, ‘हे बाळ माझे आहे. ते इथे कसे आले? तू माझ्या घरटय़ातून अंडे घेतलेस.’
घुबड म्हणाले, ‘मग माझे एक अंडे कुठे गेले?’ कावळा आणि घुबडाचे चांगलेच भांडण जुंपले. शेवटी कावळी आपल्या पिल्लाला उचलून आपल्या घरटय़ात घेऊन गेली आणि वडील घुबड आपले हरवलेले अंडे शोधायला गेले.
हे बघितल्यावर इतर घरटय़ात काय चालले असेल याची बुद्दूला खूपच उत्सुकता वाटायला लागली. तो मग पुढच्या झाडाशेजारच्या दगडामागे जाऊन लपून बसला. खिडकीवरचे कबुतर आपल्या अंडय़ातून बाहेर आलेल्या बाकदार चोचीच्या तपकिरी रंगाच्या पिल्लाकडे आश्चर्याने बघत होते. असे कसे झाले हे त्याला काही कळत नव्हते. हा प्रकार इतर पक्ष्यांना सांगण्यासाठी ते नदीवर गेले. तिथे कावळा आपले पिल्लू घुबडाच्या घरटय़ात कसे सापडले ते सगळ्यांना सांगत होता. कबुतराच्या घरटय़ातल्या पिल्लाचे वर्णन ऐकून घुबड म्हणाले, ‘अरे, ते पिल्लू माझे आहे. ते मी घेऊन जातो.’ कबुतराला मग त्याचे एक अंडे कुठे गेले ते कळेना. तेवढय़ात बदक तिथे आले आणि म्हणाले, ‘‘माझ्या पांढऱ्याशुभ्र आणि पिवळ्या चोचीच्या पिल्लांबरोबर एक करडय़ा रंगाचे छोटेसे पिल्लू आहे. ते कुठून आणि कसे आले मला काही कळतच नाही.’’ हे ऐकून कबुतराच्या लक्षात आले की त्याचे पिल्लू वाळूत बदकाच्या पिल्लांमध्ये आहे.
सगळ्या पक्ष्यांच्या घरटय़ात एक वेगळेच पिल्लू होते. काही तरी गोंधळ आहे हे एव्हाना सर्वाच्याच लक्षात आले. अंडय़ांची अदलाबदल कशी झाली हे कोणाला कळत नव्हते; पण आपापली पिल्ले परत मिळाल्यावर त्या सर्वाना इतका आनंद झाला होता की त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. सगळ्या पक्ष्यांची दुसऱ्याच कोणी तरी खोडी काढली आहे हे कळल्यावर कावळा आणि घुबडाला वाटले की आपण एकमेकांशी उगीचच भांडलो.
बुद्दू हे सगळे बघत होता. त्याला कळून चुकले की आपण गंमत म्हणून अंडय़ाची अदलाबदल केली ती त्या पक्ष्यांच्या बाबतीत अजिबातच गंमत नव्हती. त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास झाला. बुद्दूला खूप अपराधी वाटू लागले. तो पळतपळत नदीवर गेला आणि त्याने सगळ्या पक्ष्यांची माफी मागितली. अशी गंमत मी परत कधीही करणार नाही असे सांगितले. पक्ष्यांनीही आपल्या मित्राला मोठय़ा मनाने माफ केले.
काही दिवसांनंतर बुद्दू नदीवर चालला होता तर वाटेत त्याला घुबडाची पिल्ले खेळताना दिसली. घुबड त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते. कावळा-कावळी आपल्या पिल्लांना चारा भरवत होती, कबुतरे आपल्या पिल्लांना दाणे टिपायला शिकवत होते, तर बदक आपल्या लहानग्यांना पोहायला शिकवत होते. ते बघितल्यावर शहाण्या झालेल्या बुद्दूला खूप आनंद झाला आणि त्याने खुशीत एक मस्त शीळ घातली.
mrinaltul@hotmail.com