गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला. सौरभ त्याच्या घरातल्या मंडळींबरोबर नदीवर गेला. गणपतीबाप्पांना निरोप देण्यासाठी घाटावर गर्दी झाली होती. बरेच लोक आपापल्या घरचे गणपती घेऊन तिथे आले होते.
सौरभचा दादा म्हणाला, ‘आपण होडीतून जरा पुढे जाऊया- आणि मग आपला गणपती पाण्यात सोडूया!’
सौरभच्या आई-बाबांना ही कल्पना पसंत पडली.
तिथे उभ्या असलेल्या एका नावाडय़ाला त्यांनी बोलावलं. त्याच्या होडीत सगळे बसले. गणपतीबाप्पांना सौरभच्या बाबांनी हातात धरलं होतं. होडी मध्यापर्यंत गेल्यावर बाप्पांना हळूच पाण्यात सोडलं. सौरभच्या मनात आलं, गणपतीबाप्पा आता पोहतपोहत त्यांच्या पाण्यातल्या घरी जातील. आपल्या घरी जेव्हा ते येतात तेव्हासुद्धा पोहतपोहतच येत असतील. कसं असेल गणपतीबाप्पांचं घर?
सौरभनं जरा वाकून पाण्यात बघितलं आणि काय आश्चर्य! त्याला एक सुंदर पाऊलवाट दिसली. तिच्यावर दूर्वा उगवल्या होत्या- दूर्वाचीच हिरवीगार पाऊलवाट होती ती.
ही पाऊलवाट कुठे जात असेल? आपण हिच्यावरून चालत गेलो तर ही आपल्याला कुठे घेऊन जाईल? असंच काहीतरी सौरभच्या मनात आलं. त्यानं हळूच त्याच्या आई-बाबांकडे बघितलं. कुठल्यातरी वेगळ्याच विषयावर ते बोलत होते.
सौरभ मग हळूच पाण्यात उतरला आणि त्या पाऊलवाटेवरून चालायला लागला. त्याच्याजवळून लहान-मोठे मासे सुळूसुळू पळत होते. त्यामुळे सौरभला मजा वाटत होती. एक मोठी मगरसुद्धा त्याच्याजवळ आली, पण तिनं सौरभला काहीसुद्धा केलं नाही.
ती पाऊलवाट त्याला एका भव्य राजवाडय़ापाशी घेऊन गेली. त्याच्यावर चमकदार अक्षरात नाव कोरलं होतं. ‘गणेश निवास’.
‘म्हणजे आपल्याला इतके दिवस ज्याची उत्सुकता होती तोच हा गणपतीबाप्पांचा राजवाडा दिसतोय. दरवाजाही उघडाच आहे. जाऊन बघावं आत काय आहे ते’ मनाशी पुटपुटतच सौरभ आत शिरला.
केवडय़ाचा सुगंध वातावरणात भरून राहिला होता. त्यानं इकडेतिकडे नजर फिरवली. लाल कमळांची तळी सगळीकडे दिसत होती.
आपण तोडावं का एक कमळ? काय हरकत आहे? सौरभला वाटलं. पण लगेचच त्याच्या असंही मनात आलं की, दुसऱ्याच्या घरातली फुलं कशाला तोडायची? कुणी रागावत नसलं म्हणून काय झालं? आईची शिकवण त्याला आठवली आणि तो तसाच पुढे गेला. त्या वेळी कुणीतरी पाठीवरून हात फिरवल्याचा त्याला भास झाला. अगदी शाबासकी दिल्यासारखा.
सौरभनं आतल्या दालनात प्रवेश केला. तिथे मोदकांची ताटं भरून ठेवली होती. ‘अरे बापरे! किती हे मोदक!’ सौरभ मनाशीच म्हणाला. आणि गंमत म्हणजे प्रत्येक ताटाजवळ दोन दोन उंदीर बसले होते. ते छोटे-छोटे उंदीर खूप छान दिसत होते.
मोदक न खाता हे उंदीर स्वस्थ कसे बसलेत? नाहीतर आपल्या घरातले उंदीर! सौरभच्या मनात असे विचार येत एका उंदरानं त्याच्या हातात एक मोदक ठेवला. बाप्पांचा प्रसाद मिळाला. तो आपण घरी घेऊन जावा असं सौरभनं ठरवलं.
आणि नंतर त्याला वाटलं एवढय़ा मोठय़ा राजवाडय़ात गणपतीबाप्पा कुठेच कसे दिसत नाहीत? तेवढय़ात त्याचे लक्ष उजव्या बाजूला असलेल्या दालनाकडे गेलं. त्याच्यावर लिहिलं होतं- ‘विद्यादान कक्ष’.
सौरभ जरा वेळ बाहेरच्या दारापाशीच घुटमळला. तेवढय़ात कुणीतरी म्हटलं, ‘ये रे, आत ये!’
तो जरा बिचकत बिचकतच आत गेला तर काय! तिथल्या नक्षीदार चौरंगावर साक्षात गणपतीबाप्पाच बसले होते. तेच त्याला म्हणत होते- ‘ये रे, आत ये!’ बोलताना त्यांची सोंड हलत होती. त्या दालनात लाल फुलांच्या पाकळ्यांचा मोठाच्या मोठा गालिचा अंथरला होता.
‘बस इथे-’ गणपतीबाप्पांनी त्याला तिथे बसायला सांगितलं. फार छान वाटत होतं तिथे त्याला. पाकळ्यांचा मऊमऊ स्पर्श.
‘शाळेत रोज जातोस ना? अभ्यास करतोस ना?’ बाप्पांनी विचारलं. सौरभ मानेनंच हो म्हणाला.
‘तुला कुठला विषय आवडत नाही? गणित आवडत नाही ना?’
बाप्पांना कसं कळलं आपल्याला गणित आवडत नाही ते? सौरभ विचारात पडला.
‘अरे, गणित म्हणजे काही तुझा शत्रू नाही- गणिताशी मैत्री कर, म्हणजे बघ गणितातले आकडे तुझ्याशी बोलायला लागतील. आत्ता तुला ते राक्षसांसारखे वाटतायत, पण मैत्री झाल्यावर ते तुला देवदूतांसारखे वाटतील.’
बोलता बोलताच बाप्पांनी हातात पाटी घेतली आणि ते सौरभला म्हणाले, ‘तुला गणित शिकायची इच्छा आहे, हे चांगलं आहे. अशी मुलं मला आवडतात, पण ज्या मुलांना शिकावंसंच वाटत नाही ती मुलं मात्र मला आवडत नाहीत.
सौरभ गणपतीबाप्पांचं बोलणं ऐकत होता. त्याच्या मनात येत होतं, बाप्पांचा आवाज अगदी आपल्या बाबांसारखा कसा येतोय?
‘सौरभ, अरे लक्ष कुठे आहे तुझं? हे घे प्रसादाचे चुरमुरे!’ बाबांनी सौरभला भानावर आणलं. सौरभनं एकदम दचकून इकडे तिकडे बघितलं. तो त्याच्या घरात होता. म्हणजे आपण गणपतीबाप्पांच्या घरातून लगेचच इकडे आलो तर! त्याच्या मनात आलं आणि त्यानं स्वत:च्या कपडय़ांना हात लावून बघितला, ते अजिबात ओले लागत नव्हते.
‘बाबा, मी मघापासून बघतोय, हा तंद्रीतच आहे! आपण गणपती पाण्यात सोडला ना तेव्हा हा वाकून पाण्यात बघत होता.’ दादा चेष्ठेच्याच मूडमध्ये होता.
‘दादा मी साक्षात गणपती बाप्पांच्या घरी जाऊन आलो. तिथे गेल्यावर त्यांच्या उंदरानं माझ्या हातावर एक मोदक ठेवला. अजून तो माझ्या हातात आहे.’ सौरभ असं काहीतरी म्हणणार होता तेवढय़ात त्याचं लक्ष स्वत:च्या हाताकडे गेलं. उंदरानं दिलेला तो मोदक कुठे गेला? का पाण्यात पडला? त्याला काहीच कळेना.
तो सगळं दादाला सांगणार होता, पण त्याच्या तोंडून वेगळंच बाहेर पडलं. तो म्हणाला, ‘दादा, मी आता गणिताशी मैत्री करणार आहे. गणित म्हणजे आपला काही शत्रू नाही!’
‘सौरभ, ही सुबुद्धी तुला कशी काय सुचली? असं काय बोलतोयस तू?’
‘अरे, गणपतीबाप्पाच असं म्हणाले!’
सौरभ असं म्हणाला आणि सगळे हसायलाच लागले!

Story img Loader