माझ्या बालमित्रांनो, आज ज्या पुस्तकाविषयी मी लिहिणार आहे ते पुस्तक, त्यातला विषय, माणसं, प्रदेश हे सगळंच तुम्हाला अनोळखी, अपरीचित असेल हे नक्की! मात्र, हे पुस्तक वाचल्यानंतर हे सारं तुमच्या इतक्या परिचयाचं होईल, की जेव्हा मोठेपणी तुम्ही या प्रदेशात फिरायला जाल तेव्हा या पुस्तकातल्या खाणाखुणा, त्यातली माणसं तुमच्याही नकळत तुम्ही शोधाल. त्यातल्या काही खाणाखुणा मिळतील. काही माणसंही भेटतील.
पाचवीपासून इंग्रजी शिकणाऱ्या, मराठी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला इंग्रजीतून पुस्तकं वाचायची फारशी वेळच यायची नाही. हे पुस्तक माझ्या हाती कुणी दिलं आठवत नाही, मात्र या पुस्तकातल्या वर्णनांनी मी स्तिमित झालो होतो. एक तर, विषय माझ्या आवडीचा होता- निसर्ग. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजी असूनही मला समजेल, पचेल अशा सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक त्या प्रदेशातल्या माणसांच्या नजरेतून, त्यांच्या राहणीमानाच्या, संस्कृतीच्या, भवतालाच्या संदर्भातून लिहिलेलं होतं. या पुस्तकाच्या वर्णनातून मी त्या भौगोलिक प्रदेशाच्याच नव्हे, तर माणसांच्या अंतरंगात शिरून काही नवं वाचत, अनुभवत होतो.
या पुस्तकाचा काळ ब्रिटिश इंडियातला. पुस्तकाची सुरुवातच मुळी एका छान प्रवासाने होते. विमानात बसून खालच्या डोंगरदऱ्या, नद्यांची खोरी, माणसांच्या वाडय़ा-वस्त्यांचं दृश्य पाहत प्रवास सुरू असावा अशा तऱ्हेने हा लेखक या साऱ्या भूभागाची रचना समजावून सांगतो. आत्ताच्या उत्तराखंड राज्यातला गढवाल, कुमाऊंचा सारा निसर्गरम्य परिसर पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाच्या नजरेतून अगदी बारीकसारीक ठिकाणाच्या तपशिलासह येतो. ‘‘आता एक मस्त दुर्बीण घ्या व माझ्याबरोबर ‘चिना’च्या टोकावर चला. तिथून तुम्हाला नैनिताल व आसमंताचं विहंग दृश्य दिसेल. वाट उभ्या चढाची आहे, पण जर तुम्हाला पक्षी, झाडा-फुलांमध्ये रस असेल तर ही तीन मैलांची चढण तुम्हाला कठीण वाटणार नाही. पहाट होत असताना जेव्हा चिना व इतर पहाड अजूनही अंधारातच असतात, तेव्हा या बर्फाच्छादित पर्वतरांगा निळ्या रंगापासून गुलाबी होत असे रंग बदलतात, तर जसजसा सूर्य पहिल्या शिखराला स्पर्श करतो तशा त्या क्रमाक्रमाने रंग बदलत, झळझळीत पांढराशुभ्र रंग धारण करतात.’’ ही अशी वर्णनं वाचताना पुस्तकाच्या पानापानांवर साक्षात निसर्गचित्रं दिसत राहतात.
पुढे मग इथल्या लोकांच्या स्वभावांतून, राहणीमानातून या प्रदेशाची ओळख वाढत जाते. करारीपणे, मायेने गावाचं नेतृत्व करणाऱ्या मुखियारानीची गोष्ट लक्षात राहते. तिच्याहून भिन्न कन्वरसिंग हा दुसऱ्या गावाचा ठाकूर मुखिया त्याच्या स्वभाववैशिष्टय़ांसकट आपल्यापुढे साकार होतो. मग मोती, लालू यांसारखे मित्र भेटतात. जंगलचा कायदा पाळणारं हरकुंवर आणि कुंतीचं घर मनात घर करून राहतं. एक ना अनेक व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून हा भूप्रदेश त्याच्या साऱ्या दिमाखासह आपल्यापुढे पानागणिक खुलत जातो.
उच्चवर्णीय, गरीब-आदिवासी, मध्यमवर्गीय, सधन, शेतमजूर अशा अठरापगड प्रकारच्या एतद्देशीय लोकांमध्ये रमणारा हा लेखक म्हणजे जिम कॉर्बेट. या लोकांच्या भवताली असणाऱ्या निसर्गावर जिवापाड प्रेम करणारा हा उत्कृष्ट निसर्गवाचक म्हणजे जिम कॉर्बेट. भारतातला कदाचित सर्वात नावाजलेला नरभक्षकांचा शिकारी म्हणजे हा जिम कॉर्बेट. आणि या गढवाल-कुमाऊ लोकांच्या, विशेषत: गोरगरीब, आदिवासींना आपल्यातलाच वाटणारा त्यांचा गोरा साधू म्हणजे जिम कॉर्बेट.
एका मध्यमवर्गीय ब्रिटिश कुटुंबात १८७५ साली भारतातल्या नैनिताल इथे जिमचा जन्म झाला. वयाच्या जेमतेम अठराव्या वर्षीच शाळेचं शिक्षण सोडून देऊन जिम रेल्वेमध्ये नोकरीला लागला. विसाव्या वर्षी मोकामेह घाटमध्ये तो रेल्वेत रुजू झाला, मात्र वेळोवेळी आपल्या नैनितालच्या लोकांच्या मदतीला येत राहिला. त्यांच्या जिवाच्या, घरादाराच्या सुरक्षेकरता आपला जीव जोखमीत घालून नरभक्षकांची शिकार विनामोल करू लागला. या शिकारींकरता जंगलं तुडवू लागला. या लोकांच्यात मिळूनमिसळून राहू लागला. त्यांच्यातलाच एक होऊन गेला, इतका की हा देश, इथली माणसंही त्याला आपली वाटायला लागली. साहजिकच आपल्या आठवणींच्या आधारे त्याने या देशाविषयी, त्यातल्या माणसांविषयीचं पुस्तक लिहिलं तेव्हा त्याला अतिशय साधं तरी जिवलग शीर्षक दिलं- ‘माय इंडिया.’
‘माय इंडिया’च्या आधी जिम कॉर्बेटची शिकारकथांची पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. ती अतिशय लोकप्रियही झाली होती. मात्र १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर जिम त्याची बहीण मॅगीसोबत केनियामध्ये स्थलांतरित झाला आणि तिथून त्याने १९५२ साली ‘माय इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध केलं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी, १९५५ मध्ये निधन होईतोवर जिम कॉर्बेटने आणखी दोन शिकारकथांची, आणि त्याला प्रिय अशा जंगल कथांची पुस्तकं प्रसिद्ध केली.
जिम कॉर्बेट तसा सोपा, साधा माणूस होता. लोकांत मिसळणारा, त्यांच्यावर जीव असणारा होता. एकीकडे नरभक्षकांची शिकार करणारा, तर दुसरीकडे निसर्गावर, प्राण्यांवर जिवापाड प्रेम असलेला हा अवलिया होता. ‘माय इंडिया’चं वाचन म्हणजे या अलिबाबाच्या गुहेचा जादुई मंत्रच ठरला. या पुस्तकाने भारावलेला मी, त्यानंतर जिमच्या इतर पुस्तकांच्या मागेच लागलो. सारी पुस्तकं वाचून काढली. या ब्रिटिश लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक पानातून मला माझ्या देशातला एक कोपरा, तिथलं जीवन, निसर्ग खूप जवळचा होत गेला. पुढे जेव्हा मी स्वत: एक निसर्गप्रेमी म्हणून या भागात भेटी दिल्या, त्यानेच स्थापन केलेल्या आणि पुढे त्याचंच नाव दिमाखाने मिरवणाऱ्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातला निसर्ग पाहिला तेव्हा माझ्या समोर असलेला माझा देश मला जिमच्याच शब्दांतून दिसत राहिला. आणि त्यानंतर नेहमीच आम्हा दोघांचा, तब्बल आठ-दहा दशकांचं अंतर असणारा इंडिया एकमेकांत मिसळत राहिला. जिम कॉर्बेटच्या ‘माय इंडिया’ची ही ताकद आहे, की तो शब्दांतून आणि प्रत्यक्षातही खुणावत राहतो, मनात घर करतो आणि काळजाचा ठाव घेतो.
हे पुस्तक कुणासाठी? इंग्रजी वाचू शकणाऱ्या प्रत्येक लहान दोस्तासाठी.
‘माय इंडिया’, जिम कॉर्बेट,
प्रकाशक : ऑक्स्फर्ड,
अनुवाद : विश्वास भावे
आरती प्रकाशन.  
ideas@ascharya.co.in