पाण्यातले मासे झाले आणि घरातील कोंबडी झाली. आता स्वच्छंद आकाशातले आणि निबिड जंगलातले प्राणी-पक्षी पाहूयात. तसे काही वाघ-बिबळ्या आपल्याला शहरातसुद्धा दिसतात. अर्र्र्र, खरे नाहीत हो! चित्रातले!! आणि आता पुढील महिन्यात निवडणूक असल्याने खूप दिसतील. तर राजकीय पक्षाचा मॅस्कॉट (ओळखचिन्ह) असलेला पिवळा-भगवा आशियाई वाघाचा रागीट चेहरा आपण दरवाज्यांवर, गाडय़ांच्या काचेवर, नंबरप्लेटवर पाहतो. असा समोरून वाघ काढायला सोप्पं वाटलं तरी ते कठीण आहे. मात्र आपण ते स्टिकर पाहून कॉपी करू शकतोच. पण समोरून एखादा प्राणी काढणं किती कठीण आहे याची आपल्यासारख्या हुशार मुलांना पूर्ण खात्री आहे. आणि ही समस्या फार पूर्वीपासून चित्रकारांना भेडसावतेय.
आपल्याच महाराष्ट्रातील कोकणात सिंधुदुर्गातील कुडाळजवळील पिंगुळी गावात ‘चित्रकथी’ नावाचा पारंपरिक कलाप्रकार पाहायला मिळतो. चित्र म्हणजे चित्र आणि कथी म्हणजे गोष्ट (कथा). रामायण-महाभारतासारख्या ‘कथा’ सांगता सांगता ‘चित्र’ पाहणं किंवा क्रमाक्रमाने एकेक चित्र पाहता पाहता कथा ऐकणं, असा सरळ-सोपा अर्थ! रात्रभर चालणाऱ्या या कथा वाद्यांच्या तालावर आणि चित्र-रंगांच्या जोरावर जिवंत होत राहतात. मंदिरातील किंवा चावडीवरील मोकळ्या जागेत ही जागरणयुक्त कला सादर व्हायची. आजही आपल्या आई-बाबांना विचारलं तर ते अशा पद्धतीने एकत्र बसून सिनेमा पाहिल्याची आठवण सांगतील.
तर या चित्रातदेखील वाघ आढळतो. साधारण चित्र रंगविणे कठीण, तर चित्र काढणं सोपं असतं; पण वाघाच्या चित्राला रंगविणे सोपे तर चितारणे कठीण असते. सर्व मांसाहारी प्राण्यांचे डोळे चेहऱ्याच्या पुढील बाजूस असतात, तरी या चित्रातील वाघ आणि माणसाचा डोळा बाजूला दिसतो. तरी त्याचा डोळा मात्र आपल्याला समोरून पाहिल्यासारखा दिसतो. माणसांचेही तेच! बाकी चटकदार रंगात रंगविलेला वाघ आणि जटायू फारच नक्षीदार पद्धतीने रंगविलेले असतात. मधुबनी चित्रांची आठवण व्हावी तसे !
ही चित्र काढणं फार सोप्पय म्हणून आजचा गृहपाठही सोपा आहे- आपल्या चाळीतील, इमारतीतील मांजर किंवा कुत्रा असाच एका बाजूने काढायचा! त्याच्यावरील पोत ( टेक्श्चर ) नक्षीदार पद्धतीने काढून रंगवायचे. आणि न विसरता डोळा मात्र एका बाजूलाच काढायचा. आज रविवार असल्याने हे प्राणीदेखील मस्त रेंगाळलेले असतील. त्यांना त्रास न देता दूध, बिस्कीट देऊन पटकन चित्र काढून घ्या. आणि फोटो माझ्या खालील इमेल वर बुधवापर्यंत पाठवा.
(पिंगुळीतील ठाकर समाजातील हे कलाकार अशी एकाच गोष्टींची खूप सारे कथाचित्र-पोथी, घेऊन गावोगावी, आसपासच्या इतर राज्यातही फिरत असायचे. पुढील वेळेस याच चित्रांसारखा एक महाराष्ट्राबाहेरचा कला प्रकार पाहणार आहोत.)
क्रमश:
श्रीनिवास आगवणे – shreeniwas@chitrapatang.in