आता लवकरच परीक्षा संपतील! कार्टूनच्या नवीन सीडी, मॉलमधील खरेदी, नवीन चित्रपट, मित्रांबरोबर धिंगाणा अशा अनेक गोष्टी तुम्ही ठरवल्या असतील. पण मी तुम्हाला एक वेगळी गंमत सुचवणार आहे. या सुट्टीत आई-बाबांबरोबर जवळच्या जंगलात फेरफटका मारून या! विविध प्रकारची फुलं, पानं, सुंदर पक्षी, नाजूक फुलपाखरं, दिमाखदार प्राणी, करवंदासारखी गोड फळं, गार वारा आणि मनाला आनंद देणारी शांतता, अशी खूप मौज तिथे असते.
मुंबईजवळ असाल तर बोरिवली राष्ट्रीय उद्यानात शिलोंढा, कान्हेरी, नागला, येऊर, मानपाडा किंवा बीएनएचएस अशा जंगलाच्या निरनिराळ्या भागांत तुम्ही अध्र्या दिवसात जाऊन येऊ शकता. तिथे चितळ हरण, सांबर, वानर, माकड आणि खारूताई असे प्राणी दिसण्याची शक्यता आहे. सोबत हळद्या, भारद्वाज, तांबट, कुतुर्गा, नाचण, स्वर्गीय नर्तक, सर्पगरुड, करडा धनेश, दयाळ व कवडा असे पक्षी दिसतील किंवा ऐकायला मिळतील. तुंगारेश्वर, तानसा, माथेरान, कर्नाळा, उत्तन, गोराई, शिवडी, खारघर, निळजे व पडळे अशा ठिकाणीसुद्धा रानांत किंवा पाणथळीत खूप पक्षी दिसतील.
पुण्यामध्ये तळजाई, वेताळ, एमआयटी, सिम्बायोसिस, कात्रज व पाषाण तलाव अशा टेकडय़ांच्या प्रदेशात पानगळी जंगलातून फेरफटका मारताना माकड, खार, ससा किंवा मोर सहज दिसू शकतात. त्याशिवाय सातभाई, पोपट, मुनिया, वटवटे, धोबी, खंडय़ा, कवडा, चंडोल, कोतवाल व घारीसारखे पक्षी दिसतात. थोडं दूर जाता येत असेल तर भिमाशंकर, सिंहगड, मुळशी, ताम्हिणी, खंडाळा, लोहगड व राजगडसारख्या ठिकाणच्या रानांत संध्याकाळच्यावेळी भेकर, डुक्कर, तरस व कोल्हा दिसू शकतात. सह्य़ाद्रीच्या सदाहरित जंगलात कदाचित शेकरूसुद्धा दिसेल.
नाशिकजवळ असाल तर घोटी, त्र्यंबकेश्वर, बोरगड, मुल्हेर, भंडारदरा, हरिश्चंद्रगड किंवा गंगापूर धरणाजवळच्या रानांत भटकंती करता येईल. नगर व औरंगाबादचे लोक अजिंठा, गौताळा किंवा लोणार येथील रानांत निसर्ग अनुभवायला जाऊ शकतात. रेहेकुरीच्या गवताळ प्रदेशांत काळवीटं दिसू शकतात. नागपूरजवळ असाल तर मग मज्जाच आहे! ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव किंवा नागझिरा अशा ठिकाणी वाघ, बिबटय़ा, सांबर, चितळ, हरण, गवा, रानकुत्रा, अस्वल असे विविध प्राणी तुम्हाला पाहता येतील.
रानात जाताना सोबत ओळखीची व माहीतगार माणसं हवी. अंधार पडल्यावर चालत रानात जाऊ नका. रानात कचरा टाकू नका व प्राणी किंवा वनस्पतींना इजा करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भटकून आलात की काय पाहिलं ते मला कळवायला विसरू नका!

Story img Loader